Eknath Shinde Took Oath as Deputy CM: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. जनतेनं तब्बल २३५ जागांचं घवघवीत यश महायुतीच्या पारड्यात टाकलं. महाविकास आघाडीला अवघ्या ४९ जागा मिळाल्या. त्यामुळे सरकार पुन्हा महायुतीचंच येणार हे निश्चित झालं. पण मुख्यमंत्रीपद कुणाकडे जाणार? याबाबत मोठी उत्सुकता आणि त्यापाठोपाठ चर्चा घडून आली. अखेर निकाल लागल्यानंतर १० दिवसांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालं. पण त्यानंतरही ही संदिग्धता संपली नाही. एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी अनेकदा मनधरणी झाली. शेवटी शपथविधीच्या अवघ्या दोन तास आधी म्हणजे दुपारी ३ च्या सुमारास एकनाथ शिंदेंनी आपला होकार कळवला!
देवेंद्र फडणवीसांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित होण्यात २३ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर अशा १० दिवसांत जशा अनेक घडामोडी घडल्या, तशाच त्या समांतरपणे उपमुख्यमंत्रीपदाबाबतही घडत होत्या. अजित पवारांनी निकालाच्या दुसऱ्याच दिवशी भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाला पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे ते सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होणार हे तेव्हाच जवळपास निश्चित झालं. पण एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार की सरकारमध्ये महत्त्वाचं खातं स्वीकारणार की शिंदे गटाकडून आणखी कुणी उपमुख्यमंत्रीपदावर बसणार? अशा अनेक शक्याशक्यतांवर चर्चा होत असल्याचं पाहायला मिळालं. पण नेमक्या या चर्चा शपथविधीच्या दोन तास आधीपर्यंत का ताणल्या गेल्या?
गेल्या तीन दिवसांपासून भाजपा नेत्यांकडून सातत्याने एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याबाबत आग्रह केला जात होता. त्याचबरोबर खुद्द त्यांच्या पक्षातूनही आमदार, पदाधिकारी व नेते त्यांना सरकारमध्ये सहभागी होण्याचा आग्रह करत होते. शेवटी सामंत यांनी जरी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार हे जाहीर केलं असलं, तरी काही तास आधीच त्यांनीच “जर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नसतील, तर शिवसेनेकडून कुणीही सरकारमध्ये सामील होणार नाही”, अशी थेट भूमिका घेतली होती. त्यामुळे ही संदिग्धता अधिकच गडद झाली.
‘ती’ महत्त्वाची खाती संदिग्धतेसाठी कारणीभूत?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही संदिग्धता उपमुख्यमंत्रीपदामुळे नव्हतीच! चर्चांचा हा सगळा खटाटोप काही महत्त्वाच्या खात्यांवरून चालला होता. त्यामुळेच एकनाथ शिंदेंनी फक्त शिवसेनेकडून कुणीतरी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेईल, एवढंच मान्य केलं होतं. ते स्वत: शपथ घेतील हे त्यांनी मान्य केलं नव्हतं. या खात्यांमध्ये प्रामुख्याने उपमुख्यमंत्रीपदाबरोबरच गृह खात्याचा समावेश होता. भाजपातील अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘एकनाथ शिंदेंना हे कळवण्यात आलं होतं की जर त्यांना गृहखातं हवं असेल, तर नगरविकास खातं सोडावं लागेल. कारण मग नगरविकास खातं मुख्यमंत्र्यांकडे अर्थात देवेंद्र फडणवीसांकडे जाईल. आता निर्णय एकनाथ शिंदेंना घ्यायचा आहे’.
खातेवाटपाची चर्चा होत राहील…
दरम्यान, गृहखात्याबरोबरच एकनाथ शिंदेंना आणखीही एक संदेश देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. सध्या एकनाथ शिंदेंनी अजित पवारांसोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी. त्यानंतर खातेवाटपाबाबत चर्चा होत राहील, असं त्यांना सांगण्यात आलं आहे. आधी सरकार स्थापन होऊ द्या, नंतर खात्यांबाबत चर्चा करू, असं शिंदेंना भाजपाच्या पक्षश्रेष्ठींकडून कळवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिंदे गटातूनही एकनाथ शिंदेंना आग्रह
दरम्यान, शपथविधीच्या आदल्या दिवशी एकनाथ शिंदेंना पक्षातील अनेक नेतेमंडळी, पदाधिकारी व आमदार यांनी भेट घेऊन उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची गळ घातली. त्यांनी नंतर पदाधिकारी, नेते व आमदारांची वर्षावर बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावेळी आमदारांनीही त्यांना सरकारमध्ये सहभागी होण्याची विनंती केल्याचं सांगितलं जातं.
“आम्ही त्यांना सांगितलं की एक माजी मुख्यमंत्री म्हणून जर ते सरकारमध्ये सहभागी झाले, तर ते पक्षासाठी फायद्याचं ठरेल. जर त्यांनी सरकारमध्ये सहभाग घेतला नाही, तर शिवसेनेच्या आमदारांकडे कदाचित दुर्लक्ष होऊ शकेल किंवा सरकारमध्ये त्यांच्या मताला फारशी किंमत उरणार नाही”, असं एका शिवसेना नेत्याने सांगितलं.
देवेंद्र फडणवीसांनीही घेतली भेट
दरम्यान, शपथविधीच्या आदल्या दिवशी देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याचा उल्लेख केला. “मी त्यांना काल त्यांच्या निवासस्थानी भेटलो. मी त्यांना सांगितलं की पक्षाच्या सर्व नेत्यांचं मत आहे की त्यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावं. मला आशा आहे की त्यांच्याकडून सकारात्मक उत्तर मिळेल”, असं फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर गेल्या २४ तासांत अनेक नेते-पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर शेवटी त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची तयारी दर्शवली!