राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जपान दौऱ्यावर असले तरी, कृषिमंत्री धनंजय मुंडे दिल्लीत कांद्याच्या प्रश्नावर कसा तोडगा काढतात याकडेच बहुधा असावे! फडणवीसांनी परदेशातूनही मुंडेंवर (अजित पवारांवर!) कुरघोडी करण्याची संधी सोडली नाही. केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयुष गोयल यांच्याशी चर्चा करून मुंडेंनी ‘ऐतिहासिक खरेदीदरा’ची घोषणा करण्याआधीच ती फडणवीसांनी जपानहून केल्यामुळे मुंडेंच्या श्रेयावर पाणी फेरले गेले.
केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयुष गोयल यांच्या दिल्लीतील तीन मूर्ती मार्गावरील सरकारी निवासस्थानी मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता मुंडे कांदाप्रश्नी चर्चा करत होते. या चर्चेनंतर मुंडे व गोयल पत्रकारांशी बोलतील असे सांगण्यात आले होते. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू असतानाच फडणवीस यांनी जपानहून साडेदहा वाजता कांदा खरेदीचा आणि दराच्या प्रश्नावर तोडगा निघाला असल्याची परस्पर घोषणा ट्वीटद्वारे केली. फडणवीस यांच्या सविस्तर ट्वीटनंतर मुंडे यांना कांद्याच्या प्रश्नावर बोलण्याजोगे काही उरले नाही.
हेही वाचा – समर्थकांची काँग्रेसवापसी, ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर मोठे आव्हान
‘महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी आज (मंगळवार) आमचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच, केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्याशी जपानहून दूरध्वनीवरून संपर्क केला. केंद्र सरकारने २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्रे सुरू करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली आहे. २,४१० रुपये प्रतिक्विंटल दराने ही खरेदी करण्यात येईल. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल’, अशी सविस्तर माहिती देणारे ट्वीट फडणवीस यांनी केले. या ट्वीटमध्ये फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशीही चर्चा केल्याचा विशेष उल्लेख केला आहे.
कांदा उत्पादकांच्या हिताची घोषणा फडणवीस यांनी गोयल आणि मुंडे यांच्या संयुक्त घोषणेआधीच करून टाकली. राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक असणारे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पुढाकार घेऊन कांद्याच्या खरेदीचा प्रश्न सोडवण्साठी दिल्ली गाठली खरी, कांद्याचा प्रश्नही सुटला. पण, श्रेय मात्र फुटीर राष्ट्रवादी काँग्रेसला न मिळता, भाजपचे उपमुख्यमंत्री घेऊन गेले! राज्याच्या युती सरकारमध्ये सत्तेसाठी होत असलेल्या रस्सीखेचीमध्ये फडणवीस यांनी पुन्हा भाजपसाठी आपली उपयुक्तता सिद्ध केली अशी चर्चा रंगली होती.
फडणवीसांच्या वर्मी घावातून कसेबसे सावरल्यानंतर मुंडेंनी पत्रकारांशी बोलताना, गेले तीन दिवस कांदाप्रश्नी केंद्र सरकारकडे त्यांनी कसा पाठपुरावा केला याची माहिती दिली. ‘मी तीन दिवसांमध्ये गोयल यांच्याशी दूरध्वनीवरून १५ वेळा बोललो आहे. आत्ता दिल्लीत गोयल यांच्याशी चर्चा झाली असून कांद्याला ऐतिहासिक भाव मिळालेला आहे. यापूर्वी कधीही ‘नाफेड’ने प्रतिक्विंटल २,४१० रुपयांचा भाव देऊन कांद्याची खरेदी केलेली नाही. त्यामुळे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवावे’, असे मुंडे म्हणाले.
हेही वाचा – पेण बँक घोटाळ्यातील आरोपी शिशिर धारकरांच्या प्रवेशाचा ठाकरे गटाला फायदा किती?
केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातशुल्कात ४० टक्के वाढ केल्यामुळे कांद्याचे भाव कोसळले. या निर्णयामुळे राज्यातील कांदा उत्पादकांचे आर्थिक नुकसान होत असल्याने हा प्रश्न गंभीर बनला. त्यावर युद्धपातळीवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या प्रयत्नांची माहिती मुंडे यांनी दिली.
‘उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज (मंगळवारी) सकाळी साडेसहा वाजता गोयल यांना फोन केला होता. मी गोयल यांच्याशी चर्चा करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तीनवेळा फोन गोयल यांना आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जपानमध्ये असले तरी त्यांच्याशीही मी संपर्कात होतो. शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहांशीही चर्चा केली. आम्ही सगळेच कांद्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील होतो’, असे मुंडे म्हणाले.
मुंडेंशी चर्चा केल्यानंतर केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयुष गोयल यांनी ‘नाफेड’कडून कांदाखरेदीची अधिकृत घोषणा केली. ग्राहक व शेतकरी दोघांचेही नुकसान होऊ नये, यासाठी नाशिक, लासलगाव, अहमदनगर या भागांमध्ये २ लाख टन कांदा खरेदी केला जाईल. प्रतिक्विंटल २४१० रुपये दराने कांद्याची खरेदी आज (मंगळवारी) दुपारी १२ वाजल्यापासून सुरू होईल, अशी माहिती गोयल यांनी दिली.