नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि निलंबित पोलीस उपनिरीक्षक सचिन वझे यांचे त्रिकुट एकत्रच काम करत होते. त्यामुळे अँटिलिया बॉम्बस्फोट प्रकरणातील मनसुख हिरेन याच्या हत्येबाबत फडणवीसांना कल्पना असणे स्वाभाविकच आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते अनिल देशमुख यांनी गुरुवारी नागपुरात सांगितले.
फडणवीस यांनी बुधवारी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना हिरेनची हत्या होणार हे अनिल देशमुखांना माहिती होते की नव्हते, याचे उत्तर आधी त्यांनी द्यावे असे म्हटले होते. त्यावर देशमुख म्हणाले, हिरेनचा मृतदेह सापडल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना बोलावण्यात आले. जोपर्यंत मृत व्यक्तीच्या कुटुंबातील मंडळी मृताची ओखळ पटवत नाहीत, तोपर्यंत पोलीस खात्याला त्याबाबत जाहीररित्या सांगता येत नाही. गृहमंत्री असलेल्या फडणवीसांना याची माहिती नाही, याचे आश्चर्य वाटते, असेही देशमुख म्हणाले.
हेही वाचा :विदर्भात भाजप-काँग्रेसमध्ये ३६ जागांवर थेट लढत
परमबीर सिंहांची अटक फडणवीसांमुळे टळली
अँटिलिया बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना एनआयएकडून अटक होणार होती. पण फडणवीसांनी त्यांना संरक्षण दिल्यामुळे अटक झाली नाही. हा सर्व घटनाक्रम बघता हिरेनच्या हत्येबाबत फडणवीसांना आधीच माहिती असावी. फडणवीसांनी परमबीर सिंह यांना माझ्याविरुद्ध खोटे आरोप करण्यास सांगितले. त्यानंतर ईडी, सीबीआयच्या चौकशीची ससेमिरा लागला. फडणवीसांनी त्यांच्या पक्षातील वरिष्ठाच्या मदतीने मला खोट्या आरोपात फसवले, असा आरोपही देशमुख यांनी केला.