अमरावती : धामणगाव रेल्वे मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे सातव्यांदा निवडणूक रिंगणात उतरलेले वीरेंद्र जगताप यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. यावेळी भाजपचे प्रताप अडसड हे पुन्हा त्यांच्या विरोधात लढतीत आहेत. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सभा, जातीय समीकरणे या बळावर ते भाजपच्या हातून हा मतदारसंघ पुन्हा हिसकावून घेतील का, हा प्रश्न चर्चेत आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नीलेश विश्वकर्मा हेसुद्धा २०१९ प्रमाणेच रिंगणात आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील लढत रंगतदार ठरली. विशेष म्हणजे, वीरेंद्र जगताप १९९५ पासून या मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २००४, २००९ व २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सलग तीनवेळा विजय मिळवून प्रा. जगताप यांनी या मतदारसंघात वर्चस्व प्रस्थापित केले होते. १९९५ मध्ये या मतदारसंघात भाजपचे अरुण अडसड, काँग्रेसचे वीरेंद्र जगताप व जनता दलाचे पांडुरंग ढोले यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी पांडुरंग ढोले विजयी झाले होते.
हेही वाचा – चिपळूण, राजापूरमध्ये वडिलांसाठी लेकी प्रचाराच्या मैदानात
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे नीलेश विश्वकर्मा यांनी रिंगणात उडी घेतल्याने या मतदारसंघाची लढत तिरंगी झाली व त्यातूनच वीरेंद्र जगपात यांची चौथ्यांदा विजयी होण्याची संधी हुकली, असे मानले जाते. यावेळीही भाजपचे प्रताप अडसड, काँग्रेसचे वीरेंद्र जगताप तसेच वंचित बहुजन आघाडीचे नीलेश विश्वकर्मा हे रिंगणात आहेत. वंचित बहुजन आघाडी किती मते खेचणार यावर काँग्रेस आणि भाजप दोघांचेही भवितव्य अवलंबून आहे.
गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात या मतदारसंघातील निकाली निघालेले प्रश्न, प्रलंबित मुद्दे तसेच राजकीय घडामोडींचा परिणाम निवडणुकीत दिसून येणार असल्याचे मानले जात आहे. तेली आणि कुणबी मते या मतदारसंघात निर्णायक ठरत आली आहे. वीरेंद्र जगताप, प्रताप अडसड आणि नीलेश विश्वकर्मा यांनी सातत्याने मतदारसंघात जनसंपर्क ठेवला. धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे व नांदगावखंडेश्वर या तीन तालुक्यांत विस्तारलेला हा मतदारसंघ अतिशय मोठा असून शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणे हे उमेदवारांसाठी अतिशय जिकरीचे काम आहे. त्यामुळे संघटनेचे मजबूत जाळे ही उमेदवारांसाठी जमेची बाजू ठरणार आहे. वंचित बहुजन आघाडी कुणाचे किती नुकसान करणार हा औत्सुक्याचा विषय आहे.
हेही वाचा – विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
दीर्घकाळ काँग्रेसचे वर्चस्व
धामणगाव मतदारसंघावर काँग्रेसचे दीर्घकाळ वर्चस्व राहिले आहे. १९५२ ते १९९० पर्यंत येथे काँग्रेसचेच आमदार होते. १९९० मध्ये हा मतदारसंघ भाजपकडे गेला. त्यानंतर १९९५ च्या निवडणुकीत जनता दलाने येथे विजय मिळविला. १९९९ साली परत भाजपने बाजी मारली. २००४ पासून २०१४ पर्यंतच्या तिन्ही निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळविला, तर २०१९ मध्ये हा मतदारसंघ परत भाजपकडे गेला.