छत्रपती संभाजीनगर : बीडमधील भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघातील शिंपोरा ते खुंटेफळ योजनेतील बोगद्याच्या कामाचे आणि श्री मच्छिंद्रनाथ समाधी मंदिर बांधकामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी होत आहे. या संदर्भातील माहिती स्वत: आमदार धस यांनी दिल्यानंतर कार्यक्रमाची आणि मुख्यमंत्र्यांचा जिल्ह्यातील पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम म्हणून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी झाली आहे. मात्र, कार्यक्रमापासून जिल्ह्यातील नेते, मंत्री पंकजा व धनंजय मुंडे यांना दूर ठेवल्याचे चित्र असून, आमदार धस यांच्या मुंडे भावंडांसोबतच्या वादातून पक्षाच्या शिष्टाचारालाही मूठमाती दिलेली दिसते आहे.
या संदर्भाने आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघाच्या भाजप शाखेकडून प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांनाच कुठेही स्थान दिल्याचे दिसत नाही. तसेच महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अ. प.) पक्षाचे नेते, मंत्री धनंजय मुंडे यांनाही छायाचित्रांमध्ये स्थान देण्यात आलेले नाही. मात्र, विरोधी पक्षातील नेते, खासदार बजरंग, सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर यांना सत्तेत सहभागी पक्षांच्या नेत्यांसोबतच्या छायाचित्रांमध्ये स्थान प्राधान्यक्रमाने देण्यात आले आहे. या छायाचित्रांमध्ये केजच्या आमदार नमिता मुंदडा, गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके यांनाही स्थान देण्यात आले असले तरी पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांचेही कुठेही छायाचित्र नाही की नावांचा उल्लेखही दिसत नाही. जाहिरातीत भाजपचे चिन्ह आणि अन्य पक्षआेळखीचे संकेत आहेत. विशेष म्हणजे त्यात पंतप्रधान, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, कार्याध्यक्ष, शिवसेनेचे (शिंदे) प्रमुख एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे (अ. प.) राष्ट्रीय नेते अजित पवार यांच्यासह दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याही छायाचित्रांना स्थान देण्यात आले आहे. मच्छिंद्रनाथ गडाच्या कार्यक्रमापासूनही मुंडे भावंडांना दूर ठेवण्यात आले असून, जिल्ह्याबाहेरील लोकप्रतिनिधी आमदार मोनिका राजळे-पाटील, आमदार संग्राम जगताप यांना निमंत्रित करण्यात आलेले आहे.
आमदार सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांच्यातील वाद विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच चव्हाट्यावर आला होता. विजयी मिरवणुकीतूनच आमदार धस यांनी थेट नामोल्लेख करूनच पंकजा मुंडे यांच्यावर मते बंडखोर उमेदवाराकडे वळवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून आमदार धस यांनी धनंजय मुंडे यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्या संबंधांचे अनेक पुरावे सादर करून आणि कराडवर त्याच्या कोट्यवधीच्या संपत्तीची माहिती जाहीरपणे देऊन आमदार धस यांनी खळबळ उडवून दिली. धस-धनंजय मुंडे यांच्यातील वाद चार दिवसांपूर्वी पार पडलेल्या बीड जिल्हा नियोजन बैठकीतही पाहायला मिळाले. तेव्हाही धनंजय मुंडे यांना पंकजा मुंडे यांनी शांत बसवले होते. आता वाद किती टोकाला गेला याचे उदाहरणच मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला मुंडे भावंडांना डावलल्यातून समोर आले आहे.