छत्रपती संभाजीनगर : कार्यशैलीमुळे वादात सापडलेले धनंजय मुंडे पालकमंत्री पदाच्या यादीतून गळाले. तर पंकजा मुंडे यांना जालना जिल्ह्याचे पालकमंत्री करण्यात आले. याच जिल्ह्यातील आंतरवली सराटीमधून ‘ मराठा आरक्षण आंदोलन’ उभे राहिले होते. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासमोर जरांगे पाटील यांच्या आंदोलनांचे नवे आव्हान उभे ठाकू शकेल असे तर्क लढविले जात आहेत.
आपल्या मागण्यांसाठी जरांगे २६ जानेवारीपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहे. तेव्हा पालकमंत्र्याची भूमिका अधिक महत्वपूर्ण असेल. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर बीड प्रशासनातील अनागोंदी सुधारण्याचे मोठे आव्हान असणार आहे. पालकमंत्र्याच्या नियुक्त्यांनंतर आठही जिल्ह्यात नवी राजकीय बांधणीलाही सुरुवात होईल असे मानले जात आहे.
आणखी वाचा-पुण्याचे भाजपचे नेतृत्व मुरलीधर मोहोळ यांच्याकडे
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी हे गाव देशभर चर्चेत राहिले. जरांगे पाटील यांचे आंदोलन हाताळणीमध्ये गेल्या वर्षी झालेल्या चुकांमुळे आंदोलनाला धार येत गेली. आता पुन्हा जरांगे यांनी आंदोलनाचा इशारा दिला असल्याने पालकमंत्री म्हणून पंकजा मुंडे यांना लक्ष घालणे आवश्यक बनणार आहे. यापूर्वी जालना आणि बीड या दोन्ही जिल्ह्यातील संघर्षाला जातीय किनार असल्याने पंकजा मुंडे यांच्यासमोर प्रशासकीय कौशल्य वापराचे मोठे आव्हान असणार आहे. जालना जिल्ह्यात केंद्र सरकारच्या ड्राय पोर्ट, लॉजिस्टिक पार्क या सुविधा वाढीसाठी पंकजा मुंडे किती गती देतात, यावरही त्यांचे प्रशासकीय कौशल्य मोजले जाण्याची शक्यता आहे. स्टील उद्योगातून होणारे प्रदूषण, बियाणे कंपन्यांनी हैदराबादचा धरलेला रस्ता. बियाणे पार्क या योजनांबाबतही पालकमंत्री म्हणून त्या किती लक्ष देतील याची जालन्यातील उद्योजकांनाही उत्सुकता आहे.
बीड जिल्ह्यातील पालकमंत्रीपदी मुंडे बहीण – भाऊ नको, या मागणीस राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच पालकमंत्री पद सोपविल्याने बीडमधील प्रशासकीय यंत्रणांमध्ये आता काम करावेच लागेल, हा संदेश गेला आहे. अजित पवार यांची प्रशासनावर मांड असल्याने ते काम करायला भाग पाडतील. फक्त ते कोणाच्या शिफारशी किती मान्य करतील यावर बीडमधील प्रशासकीय अनागोंदी कमी होतील का हे ठरू शकेल.
आणखी वाचा-आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद, रायगडमध्ये शिवसैनिकांचा संताप
मुंबईच्या राजकणातील व्यक्ती पुन्हा धाराशिवसाठी
धाराशिवच्या पालकमंत्री पदाची धुरा शिवसेनेच्या काळात डॉ. दीपक सावंत यांच्याकडे होती. पुढे ती तानाजी सावंत यांच्याकडे आली. आता धाराशिवच्या पालकमंत्री पदी प्रताप सरनाईक यांची नियुक्ती झाली आहे. मुंबईच्या राजकारणातील व्यक्तींना धाराशिवच्या विकास आराखड्यात फारसा रस नसतो असे चित्र दिसत होते. प्रताप सरनाईक हे चित्र बदलतील का, असा प्रश्नही आता विचारला जात आहे.
संजय शिरसाठ यांच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ
समाजकल्याण मंत्री संजय शिरसाठ यांना पालकमंत्री पद मिळाल्यानंतर त्यांचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठे कौतुक केले. माजी महापौर नंदकुमार घोडले , राजेंद्र जंजाळ या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन स्वागत केले. जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्याकडे यावे अशी मनोमन इच्छा असणाऱ्या संजय शिरसाठ यांनी हे पद मिळाल्यानंतर काय करायचे याचे मनसुभे आधीच जाहीर केले होते. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी गेल्या वर्षीच्या निधीमध्ये राखलेला असमतोल आधी दुरुस्त करू असे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे नियोजन विभागातील जुने प्रस्ताव नव्याने करण्याची कसरत जिल्हा प्रशासनाला करावी लागणार आहे. शिरसाठ यांच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांची कार्यशैली कशी राहते, यावर शिवसेनेची गणिते अवलंबून असणार आहेत. महापालिका निवडणुकीमध्ये पालकमंत्री म्हणून प्रभाव निर्माण करण्याची संधी म्हणून या पदाकडे शिवसेनेतील नेते मंडळी पाहू लागली आहेत.