मुंबई : अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभय दिले असले तरी भाजप व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणती भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. गेले काही दिवस मुंडे यांना सातत्याने भाजपच्या नेत्यांकडून लक्ष्य करण्यात येत असल्याने भाजपच्या एकूणच भूमिकेविषयी अजित पवार गटात संशयाचे वातावरण आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सर्वपक्षीय नेत्यांनी आरोप केले आहेत. विरोधी महाविकास आघाडीचे नेते आघाडीवर असणे स्वाभाविक असेल तरी त्याचबरोबर भाजपचे आमदार सुरेश धस तसेच महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. या वादाला काहीशी जातीय किनारही लाभली आहे. परभणी किंवा पुण्यातील आंदोलनात मनोज जरांगे सहभागी झाल्याने ओबीसी परिषदेचे नेते प्रत्युत्तर देण्याची भाषा करू लागले आहेत.
हेही वाचा >>> भाजप सदस्यनोंदणी ! ‘ हे ‘ आमदार अव्वल तर ‘ हे ‘ पिछाडीवर
धनंजय मुंडे यांना अजित पवार यांनी तूर्त तरी अभय दिले आहे. सध्या तीन यंत्रणांकडून तपास सुरू असून, कोणाचेही नाव अद्याप आलेले नाही. तपास पूर्ण झाल्यावर नावे समोर आल्यास तेव्हा बघू, असे सांगत अजित पवारांनी मुंडे त्तात्काळ राजीनाम्याची शक्यता फेटाळून लावली. परंतु भाजप व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका निर्णायक असेल.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुरू झालेल्या आंदोलनात भाजपचे सुरेश धस हे आघाडीवर होते. चार दिवसांपूर्वी परभणीत झालेल्या मोर्चाला भाजपचे आमदार अभिमन्यू पवार हे उपस्थित होते. बीडमधील गुंडगिरीच्या विरोधात आवाज उठविणाऱ्या अंजली दमानिया यांना धमक्यांचे दूरध्वनी आले असता त्यांची बाजू मांडण्यासाठी भाजप महिला प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ यांनी पोलीस आयुक्तालयात धाव घेतली. अंजली दमानिया यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेटीसाठी वेळ दिली. हा सारा घटनाक्रम लक्षात घेतल्यास भाजपने धनंजय मुंडे यांच्या विरोधात भूमिका घेतल्याचे स्पष्ट होते.
हेही वाचा >>> भाजपा-संघाचे संबंध ते प्रियांका गांधींचा प्रभाव; २०२५ मध्ये या ‘५’ राजकीय विषयांकडे असेल देशाचे लक्ष
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सोमवारी रात्री चर्चा झाली. तेव्हा मुंडे हा विषय नक्कीच असणार. धनंजय मुंडे प्रकरण तापल्याने त्याचा फडणवीस यांच्या सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होत आहे. यामुळेच चौकशी पूर्ण होईपर्यंत मुंडे यांना मंत्रिपदापासून दूर ठेवले जाऊ शकते. भाजपने दबाव वाढविल्यास मुंडे यांचे मंत्रिपद वाचणे अवघड आहे. कृषी खाते काढून तुलनेत कमी महत्त्वाचे अन्न व नागरी पुरवठा खाते सोपवून अजित पवारांनी धनंजय मुंडे यांचे पंख कापले आहेत.
राठोड आणि मुंडे
एका युवतीच्या आत्महत्येत मंत्री संजय राठोड यांच्या सहभागाविषयी आरोप झाले होते. तेव्हा विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी राठोड यांच्या विरोधात वातावरण तापविले होते. शेवटी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोड यांचा राजीनामा धेतला होता. धनंजय मुंडे प्रकरणात आता फडणवीस यांना भूमिका घ्यावी लागणार आहे.