प्रदीप नणंदकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लातूर: मराठवाड्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सोयाबीन संशोधन केंद्र व देवणी, लाल कंधारी या गोवंशाचे संशोधन केंद्र परळीला हलवून लातूरकरांना हिसका दिला.

या विषयावर लातूरकर चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. संपूर्ण देशात सोयाबीन उत्पादनात लातूर अग्रेसर आहे. लातूरहून सोयाबीन तेलाचे भाव ठरतात. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत लातूरच्या कृषी महाविद्यालयात सोयाबीन परिषद झाली होती, तेव्हा सोयाबीन संशोधन केंद्र लातूरला व्हावे अशी मागणी पुढे आली होती व त्याला सकारात्मकता दर्शवण्यात आली होती. माजी कृषी मंत्री सत्तार यांनीही लातूरला सोयाबीन संशोधन केंद्र व्हायला हवे असे मत व्यक्त केले होते. धनंजय मुंडे कृषी मंत्री होताच त्यांनी हे केंद्र परळीला हलवले आहे.

आणखी वाचा-‘पांचजन्य’ साप्ताहिकाकडून जुन्या संसद भवन इमारतीमधील आठवणींना उजाळा

लातूर जिल्ह्यातील देवणी हा तालुका व देवणी वंश संशोधन केंद्र मात्र परळीला हलवल्यामुळे देवणी तालुक्यातील मंडळीही अस्वस्थ झाली आहेत .माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी शासनाने हा निर्णय बदलला पाहिजे असे पत्र आपण शासनाला देणार असल्याचे लातूर येथे पत्रकार परिषदेत सांगितले .जिल्ह्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी उदगीर व जळकोट तालुक्यासाठी भरघोस निधी आणला लातूर जिल्ह्यासाठी आतापर्यंत सर्वाधिक निधी आपण आणला असल्याचा त्यांनी दावा केला आहे मात्र सोयाबीन संशोधन केंद्र व देवणी वंश केंद्र परळीला हलवल्यामुळे संजय बनसोडे हा आग्रह धरण्यात कमी पडल्याचे दिसते आहे. आमदार अमित देशमुख यांनी राज्य मंत्रिमंडळाला मराठवाड्यात लातूर आहे याचा विसर पडला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhananjay munde shifted soybean research center and devani and lal kandhari cattle research center to parli print politics news mrj