मोहनीराज लहाडे लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नगर : महसूलमंत्री तथा अहमदनगर व सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे व धनगर समाज यांच्यामधील दुरावा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. धनगर समाजातील विविध संघटना मंत्री विखे यांच्या विरोधात अधिक आक्रमक पवित्रा घेत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून ठळकपणे समोर येऊ लागले आहे. विशेषतः माजी मंत्री आमदार राम शिंदे व आमदार गोपीचंद पडळकर या दोघांचे भाजपमधीलच समर्थक विखे यांच्या विरोधात अधिक आगपाखड करताना दिसत आहेत. नगरसह सोलापूर जिल्ह्यात धनगर समाजाची लोकसंख्या अधिक आहे आणि या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री पद विखे यांच्याकडेच असताना तेथूनच विखे यांच्याविरोधात धनगर समाजातून आंदोलने होताना दिसत आहेत.

मध्यंतरी मंत्री विखे व माजीमंत्री आमदार शिंदे या दोघांत नगर जिल्ह्यात पक्षांतर्गत तसेच बाजार समितीसह स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत बरेच खटके उडाले होते. त्यानंतर विखे यांनी आमच्यातील समज-गैरसमज दूर झाल्याचे जाहीर केले होते. त्याचबरोबर नगर दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विखे-शिंदे यांच्यातील वाद म्हणजे चहाच्या पेल्यातील वादळ असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काही दिवस हे खटके उडणे बंद झाले होते. दोन्ही आघाड्यांवर काहीशी शांतता पसरली होती.

आणखी वाचा-आदिती तटकरेंच्या मतदारसंघात निधीचा ओघ, शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता

धनगर समाजातील विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी विखे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊ लागल्याने विखे व धनगर समाजातील दुरावा वाढत चालल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. त्याची सुरुवात नगरच्या नामांतराच्या वादातून झाली. आमदार गोपीचंद पडळकर व इतरांनी नगरचे नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर’ करण्यासाठी चळवळ सुरू केली. त्याला मंत्री विखे व त्यांचे पुत्र खासदार सुजय विखे यांच्याकडून विरोध झाल्याने धनगर समाज अस्वस्थ झाला. ही अस्वस्थता दूर करण्यासाठी खासदार विखे यांनी समाजाच्या वधू वर मेळाव्यास उपस्थिती लावत मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारने चौंडी येथे होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला, मात्र त्याच्या नियोजनासाठी विखे यांनी बैठकच घेतली नाही, त्यामुळे हा निधी वापरताना अडचणी निर्माण झाल्याचा दावा शिंदे समर्थक करत आहेत. जयंतीचा कार्यक्रम मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला या कार्यक्रमातही विखे-शिंदे यांच्यातील कुरघोडीचे प्रसंग स्पष्टपणे जाणवत होते.

आणखी वाचा-लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस, जेडीयू एनडीएत जाणार? माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा दावा

पालकमंत्री असलेल्या विखे यांच्यावर सोलापूरमध्ये आरक्षणाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी कार्यकर्त्यांनी भंडारा उधळला. तेथे उपस्थित असलेल्या पोलीस व भाजपच्या कार्यकर्त्यांनी भंडारा उधळणाऱ्यांना चोप दिला. त्याचे पडसाद राज्यभरून उमटले. त्यानंतर आरक्षणाच्या मागणीसाठी चौंडी येथे धनगर समाजातील संस्था, संघटनांनी उपोषण केले. उपोषण तब्बल २१ दिवस चालले. या काळात मंत्री विखे किंवा त्यांचे चिरंजीव खासदार विखे यापैकी कोणीही आंदोलनाकडे फिरकले नसल्याचा आक्षेप आहे. पालकमंत्री पद विखे यांच्याकडे असूनही आंदोलनकर्त्यांशी संवादाची जबाबदारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवली गेली. मंत्री महाजन यांच्या भेटीत पदाधिकाऱ्यांनी विखे विरोधात घोषणाबाजी केली. जिल्ह्यातही इतर काही ठिकाणी त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. एकदा तर विखे यांचा उपोषणकर्त्यांच्या भेटीचा दौरा जाहीर झाला. मात्र तो ऐनवेळी रद्द करण्यात आला. त्याचेही पडसाद उमटले. मराठा समाजाच्या नुकत्याच झालेल्या आरक्षण मागणी आंदोलनात मंत्री विखे मध्यस्थीची भूमिका बजावताना दिसले, मात्र त्यांच्याच जिल्ह्यात सुरू असलेल्या धनगर समाजाच्या आरक्षण आंदोलनाकडे ते दुर्लक्ष करत आहेत, अशी समाजाची भावना निर्माण झाली.

आणखी वाचा-यवतमाळ जिल्हा बँकेचा निकाल महाविकास आघाडीच्या एकजुटीला दिशा देणारा

भाजपामधील धनगर समाजाचे नेते शेळी-मेंढी महामंडळ व त्याचा प्रकल्प, पशुवैद्यकीय महाविद्यालय ढवळपुरी (ता. पारनेर) येथे होण्यासाठी आग्रही होते. ढवळपुरी हे धनगर समाजासाठी महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. मात्र पशुवैद्यकीय महाविद्यालय मंत्री विखे यांच्या कार्यक्षेत्रातील सावळीविहीर येथे स्थलांतरित झाले. शेळी-मेंढी महामंडळ व प्रकल्पही ढवळपुरी येथून स्थलांतरित होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्या विरोधातही धनगर समाजातील संस्था, संघटनांनी आंदोलनाचा पावित्रा जाहीर केला आहे. या संदर्भात थेट मंत्री विखे यांच्यावर आरोप केले जात आहेत.

खरेतर विखे-शिंदे वादाची सुरुवात त्यापूर्वीची आहे. विखे काँग्रेसमध्ये असताना शालिनीताई राधाकृष्ण विखे जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या आणि भाजपमधील राम शिंदे यांच्याकडे पालकमंत्री पद असताना जिल्हा नियोजनच्या निधी वितरणावरुन नेहमीच खटके उडत होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विखे यांना भाजपमध्ये आणले. जिल्ह्यात भाजपला विधानसभा निवडणुकीत फटका बसला. पराभूतांना एकत्र करत राम शिंदे यांनी विखे यांच्या विरोधात फडणवीस यांच्याकडे जाहीररित्या तक्रार करत पराभवाला विखे यांना जबाबदार धरले होते. हा इतिहासही सर्वश्रुत आहे.

आणखी वाचा-अक्कलकोटमध्ये घालीन लोटांगण, करीन वंदन..!

मंत्री विखे व धनगर समाजातील दूरावा स्पष्ट करणारे रोज वेगवेगळे प्रसंग जिल्ह्यात समोर येत आहेत. यातील काही ठिकाणी तर विखेंविरोधातील आंदोलने, घोषणाबाजी आमदार राम शिंदे यांच्या उपस्थितीत झाली. याचा अन्वयार्थ जिल्ह्यात लावला जात आहे. मंत्री विखे यांच्याकडे पशुसंवर्धन व दुग्धविकास खात्याचीही जबाबदारी आहे. हा विभाग धनगर समाजाच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे. मंत्री विखे यांचे भाजपमधील ‘वजन’ सर्वार्थाने वाढलेले आहे. त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणूनही पाहिले जाते. अशा पार्श्वभूमीवर त्यांच्या सर्वसमावेशक भूमिकेला धनगर समाजाच्या विरोधामुळे तडा बसू लागल्याचे मानले जाते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhangar community aggressive against revenue minister radhakrishna vikhe print politics news mrj
Show comments