पंढरपूर : धनगर समाजास एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी येथे सुरू असलेल्या उपोषणाच्या बाराव्या दिवशी दोघांची प्रकृती खालावली आहे. मात्र, त्यांनी रुग्णालयात दाखल होत उपचारास नकार दिल्याने तणाव निर्माण झाला आहे. अखेर या दोघांवर उपोषणस्थळीच उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, या आंदोलनास पाठिंबा म्हणून राज्यभरातून धनगर समाज बांधव पंढरपुरात दाखल होत असल्याने उपोषणस्थळी आज मोठी गर्दी झालेली दिसली. या वेळी उपस्थितांनी आरक्षण मागणीसाठी मोठी घोषणाबाजी केली.

धनगर समाजास एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी येथे बेमुदत उपोषण सुरू आहे. शुक्रवारी उपोषणाचा बारावा दिवस होता. या उपोषणाला बसलेले यशवंत गायके आणि दीपक बोराडे या दोघांची प्रकृती शुक्रवारी खालावली. मात्र त्यांनी रुग्णालयात दाखल होत उपचार घेण्यास नकार दिल्याने तणाव निर्माण झाला आहे. अखेर बांधवांनी विनंती केल्यावर दोघांवर उपोषणस्थळीच उपचार सुरू करण्यात आले आहेत. या दोघांसह उपोषणास बसलेल्या पाचही आंदोलकांनी आरक्षणाचा लढा सुरू ठेऊ, असा निर्धार व्यक्त केला.

हेही वाचा : काश्मीर बदल रहा है! शून्य मतदान होणाऱ्या गावात यंदा प्रचंड मतदान

दरम्यान, या आंदोलनाला राज्यातून पाठिंबा मिळत आहे. सकाळपासून मोठ्या संख्येने बांधव पारंपरिक ढोल वाजवत, घोंगडी पांघरून उपोषणस्थळी येऊन पाठिंबा देत आहेत. विशेष म्हणजे यात महिलांची संख्या वाढलेली दिसून आली. आमच्या हक्काचे आरक्षण घेऊच, असा निर्धार महिलांनी व्यक्त केला. शुक्रवारी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनीही भेट देऊन या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तत्काळ सोडवावा, अशी मागणी देशमुख यांनी केली. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राज्यातून धनगर बांधव मोठ्या संख्येने पंढरपुरात दाखल होत आहे.