छत्रपती संभाजीनगर : हातउसना उमेदवार म्हणून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून अर्चना पाटील यांना अजित पवार गटाने उमेदवारी दिली. यामुळे महायुतीमध्ये मराठवाड्यात अजित पवार यांची नेतृत्व मर्यादा केवळ एका मतदारसंघापुरती उरली. अर्चना पाटील यांना पुन्हा राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाताशी बांधावे लागले. मात्र, पक्षचिन्ह हाती घेतल्यानंतर ‘माझे पती भाजपचे आमदार आहेत तो पक्ष मी कशाला वाढवू, मी महायुतीची उमेदवार आहे,’ असे म्हणत विरोधकांच्या हातात कोलीत दिले. तडजोडीच्या राजकारणातील अपरिहार्यता म्हणून भाजपने अजित पवार गटास उमेदवारी दिली खरी, पण फुटीनंतर अजित पवार यांच्या समवेत उस्मानाबाद जिल्ह्यातून सुरेश बिराजदार वगळता तसा कोणी मोठा नेता उभा ठाकला नव्हता. त्यामुळे कुपोषित जिल्ह्यात विजयाचा सारा भार अजित पवार यांच्याऐवजी ‘महायुती’ वर आला आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी राणाजगजीतसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हा उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही भाजपमध्ये गेले. जीवनराव गोरे आणि राहुल मोटे हे दोन जिल्हापातळीवरचे नेते शरद पवार यांच्या पाठीशी राहिले. यातील राहुल मोटे यांचा बाणगंगा सहकारी साखर कारखन्यावर आजही अजित पवार यांच्या अधिपत्याखाली आहे. उमरगा तालुक्यातील सुरेश बिराजदार हेही अजित पवार यांच्याबरोबर थांबले. त्यांचाही ‘भाऊसाहेब बिराजदार’ या नावाने साखर कारखाना आहे. शिवाय राजकीय ताकद असणारे कार्यकर्ते आता अजित पवार यांच्या गटात फारसे उरलेले नाहीत. उस्मानाबाद शहरात सचिन तावडे, मनोज मुदगल, समियोद्दीन मशायक अशी काही मोजकी मंडळी वगळता अजित पवार यांना मानणारा कार्यकर्ता शिल्लक नाही. तरीही लोकसभेवर अजित पवार गटाचा दावा महायुतीमध्ये मान्य करावा लागला. अन्यथा मराठवाड्यातून अजित पवार यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असते.
हेही वाचा – ममतादीदींच्या भाच्यासमोर कोणाचं आव्हान? डायमंड हार्बर कोण जिंकणार?
अजित पवार हे उस्मानाबादचे जावाई. सुनेत्रा पवार या डॉ. पद्मसिंह पाटील यांची बहीण. मात्र, राजकीय पटलावर अजित पवार यांचे समर्थक तसे कमीच. बार्शी येथे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद तशी असून नसल्यासारखी. राजाभाऊ राऊत आणि दिलीप सोपल या दोन नेत्यांमध्ये हा मतदारसंघ विभागला गेलेला. ते अपक्ष जरी निवडून आले असले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध. दिलीप सोपल मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासमवेत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात ‘घड्याळ’ तसे नव्हतेच.
राष्ट्रवादीचा प्रचार कसा कराल, असा साधा प्रश्न अर्चना पाटील यांना केला गेला आणि त्या उत्तर देताना चुकल्या. ‘मी कशाला राष्ट्रवादी वाढवू ?’ असे त्या म्हणाल्या. जर त्या चिन्हावर निवडणूक लढविणार असाल तर तो पक्ष न वाढवता कसे शक्य होईल, असा सहाजिक प्रश्न आता विचारला जात आहे. केवळ बार्शीच नाही तर राहुल मोटे शरद पवार यांच्याबरोबर थांबल्याने परंडा मतदारसंघातही राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह दिसत नव्हते. तुळजापूर, उस्मानाबाद, औसा, बार्शी, परंडा, उमरगा या सर्व तालुक्यांमध्ये तुलनेने राष्ट्रवादी कुपोषित असताना अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. जागा सुटली म्हणून करण्यात आलेली तडजोड आणि मराठवाड्यात एका मतदारसंघापुरते उरलेल्या अजित पवार यांच्या नेतृत्वाला आता ‘महायुती’चे बळ मिळते का, असा प्रश्न आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी झटून काम करावे म्हणून अर्चना पाटील यांचा जनसंघाशी असणारा संबंध त्यामुळेच आवर्जून पुढे केला जात आहे. त्यांचे आजोबा जनसंघाचे कार्यकर्ते होते, हे सांगितले जात आहे.