लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : आधी एकनाथ गायकवाड आणि २००४ पासून सलग चार वेळा वर्षा गायकवाड यांना विधानसभेत निवडून पाठवणाऱ्या धारावीमध्ये आता मविआचा उमेदवार कोण, हाच प्रश्न प्रामुख्याने चर्चिला जात आहे. वर्षा गायकवाड या उत्तर मध्य मुंबईतून खासदार झाल्यामुळे धारावीतून यावेळी आमदारकीसाठी नवीन चेहरा दिला. एकीकडे, महायुतीमधील शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यापैकी ही जागा कोण लढवते, हा प्रश्न अनुत्तरित असताना वर्षा गायकवाड यांच्या जागी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीलाच उमेदवारी मिळणार का, याची चर्चा सुरू आहे.

हेही वाचा >>> विशाळगडावरील अतिक्रमणावरून कोल्हापुरातील छत्रपती घराण्यातली मतभेद चव्हाट्यावर

लोकसभा निवडणुकीत दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात धारावीच्या पुनर्विकासाचा मुद्दा महत्त्वाचा ठरला. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे यांना धारावीकरांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. दक्षिण मध्य मुंबईच्या निवडणुकीत धारावी विधानसभा क्षेत्रामधून ठाकरे गटाचे अनिल देसाई यांना ७६ हजार ६७७ मते मिळाली, तर शेवाळे यांना ४० हजार ९५१ मते मिळाली. केवळ एक फेरी वगळता सर्व फेऱ्यांमध्ये देसाईंनी आघाडी मिळवली. या निकालाच्या आधारे धारावी विधानसभेच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय सोपा मानला जात आहे. मात्र, मविआमध्ये उमेदवार कोण असेल, यावरून कलह होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> राहुल गांधी, उद्धव ठाकरे, राऊत यांच्या विरोधात याचिका; मतदान यंत्राबाबत खोट्या, दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याचा दावा

धारावी हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असला तरी, त्यात काँग्रेसपेक्षा गायकवाड कुटुंबीयांचे वर्चस्व जास्त आहे. एकनाथ गायकवाड १९८५ पासून ते १९९५ पर्यंत धारावीचे आमदार होते, तर त्यांची कन्या वर्षा या २००४ पासून येथील आमदार राहिल्या आहेत. आता वर्षा गायकवाड या खासदार झाल्यामुळे धारावी मतदारसंघ काँग्रेसमधील इच्छुकांसाठी खुला झाला आहे. यामध्ये वर्षा गायकवाड यांची बहीण डॉक्टर ज्योती यांचाही समावेश आहे. गेल्या काही दिवसांत ज्योती गायकवाड या धारावी मतदारसंघात सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या मतदारसंघावर गायकवाड कुटुंबाकडून पुन्हा दावा केला जाण्याची शक्यता आहे, परंतु मुंबई काँग्रेसमध्ये वर्षा गायकवाड यांच्या विरोधातील गटही आक्रमक झाला असून त्यांच्या बहिणीला उमेदवारी देण्यास काँग्रेसमधूनच विरोध होण्याची शक्यता आहे. त्यातच या मतदारसंघातून मविआतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे बाबुराव मानेही इच्छुक आहेत. १९९५च्या निवडणुकीत माने यांनी शिवसेनेच्या तिकिटावर धारावीत विजय मिळवला होता. अनिल देसाई यांना धारावीतून मोठे मताधिक्य मिळाल्याने त्यांच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत. अर्थात काँग्रेसकडून हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात येण्याची शक्यता कमी आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dharavi to get new mla face as varsha gaikwad became mp print politics news zws
Show comments