Dhirendra Krishna Shastri Narendra Modi :बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. कधी त्यांच्या वक्तव्यांमुळे, कधी त्यांच्या चमत्काराच्या दाव्यांमुळे तर कधी एखाद्या वादामुळे. परंतु, आता धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आले आहेत. पण ही चर्चा त्यांचं लग्न झाल्याची अथवा ठरल्याची नसून त्यांच्या लग्नाला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असण्याबाबत आहे. कारण स्वत: पंतप्रधान मोदींनी आपण बागेश्वर धाम सरकार पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या लग्नाला उपस्थित राहणार असल्याचा शब्द त्यांना दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (२३ मार्च) बागेश्वर धाम मेडिकल अँड सायन्स रिसर्च इन्स्टिट्यूटचं भूमिपूजन पार पडलं. यावेळी मोदींबरोबर धीरेंद्र शास्त्री देखील मंचावर उपस्थित होते. मंचावरून मोदींनी केलेल्या भाषणात शास्त्रींच्या लग्नाबाबत मिश्किल टिप्पणी केली. तसेच ते शास्त्रींच्या लग्नाला येतील असं त्यांनी सांगितलं. यावेळी मोदींनी धीरेंद्र शास्त्रींचा आपला धाकटा भाऊ म्हणून उल्लेख केला.
दरम्यान, मध्य प्रदेशसह उत्तर भारतातील गावांमध्ये कथावाचन करणारे, वादग्रस्त वक्तव्ये करणारे धीरेंद्र शास्त्री अचानक पंतप्रधानांच्या मांडीला मांडी लावून बसण्याइतके मोठे कसे झाले असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यांचा इथपर्यंतचा प्रवास कसा होता याबद्दल इंटरनेटद्वारे माहिती मिळवण्याचा प्रयत्न होत आहे.
बागेश्वर धामचे पीठाधीश्वर
धीरेंद्र शास्त्रींच्या पूर्वजांनी ३०० वर्षांपूर्वी बागेश्वर धाम बालाजीचे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. आजूबाजूच्या परिसरात त्यांची विशेष ओळख होती. त्यांचं काम धीरेंद्र शास्त्री पुढे नेत असल्याचं सांगितलं जातं. बागेश्वर धाम, छत्तरपूरचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कुटुंबात एकूण ५ सदस्य आहेत. धीरेंद्र शास्त्री यांच्या वडिलांचं नाव रामकृपाल गर्ग व आईचं नाव सरोज गर्ग असं आहे. भगवान दास गर्ग हे त्यांचे आजोबा होते. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना धाकटा भाऊ शालिग्राम गर्ग आणि एक बहीण असून तिचं नाव रीता गर्ग असं आहे.
धीरेंद्र शास्त्री हे मध्य प्रदेशमधील बुंदेलखंड क्षेत्रातील छतरपूर येथील बागेश्वर धामचे पीठाधीश्वर आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली येथे मंदिरांसह धार्मिक परिसर उभारण्यात आला आहे. येथे दररोज हजारो भाविक येतात. शास्त्री यांनी दावा केला आहे की त्यांच्याकडे अलौकिक शक्ती आहे. जसे की ते भक्तांच्या मनातील गोष्टी, अडचणी ओळखू शकतात. भक्तांनी त्यांना न सांगितलेल्या अडचणी देखील ते सोडवतात असा त्यांचा दावा आहे.
कट्टर हिंदुत्वाकडे ओढा
धीरेंद्र शास्त्री यांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी व नेत्यांशी चांगले संबंध निर्माण केले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांचा ओढा भाजपा व हिंदुत्ववादी नेत्यांकडे राहिला आहे. पूर्वी ते केवळ कथावाचन करायचे, प्रवचन द्यायचे. आता मात्र कट्टर हिंदुत्वाचा प्रचार करतात, स्वतःला हिंदू राष्ट्रयोद्धा म्हणवतात. त्यांच्या धार्मिक व्यासपीठावरून भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व इतर हिदुत्ववादी संघटनांचा, त्यांच्या विचारांचा प्रचार करतात.
महाराष्ट्रातही हातपाय पसरण्याचे प्रयत्न
धीरेंद्र शास्त्री यांनी भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली आहे. हिंदुंच्या धर्मांतराविरोधात त्यांनी मोहीम हाती घेतली आहे. त्याविरोधात बोलताना ते इतर धर्मांबाबत चिथावणीखोर भाषणे देतात. त्यांचा मोठा चाहतावर्ग पाहून भाजपासह काँग्रेसच्या नेत्यांनी देखील त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्यांचा ओढा नेहमीच भाजपाच्या बाजूने राहिला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बुंदेलखंड, बिहार, उत्तर प्रदेश व झारखंडमध्ये त्यांचा प्रभाव वाढला आहे. ते अधून मधून महाराष्ट्रातही येत असतात. मात्र, त्यांनी संत तुकाराम यांच्याबद्दल अवमानकारक टिप्पणी केल्यामुळे त्यांना मराठी जनता व वारकरी संप्रदायाच्या टीकेचा सामना करावा लागला होता. नालासोपारा, मीरा रोड व उत्तर भारतीय लोकांचं वास्तव्य असलेल्या मुंबईतील काही ठिकाणी धीरेंद्र शास्त्रींचे कथावाचनाचे कार्यक्रम झाले आहेत.
काँग्रेसच्या आधारावर धीरेंद्र शास्त्री पुढे आले
छतरपूरचे माजी आमदार व काँग्रेस नेते आलोक चतुर्वेदी यांच्या संरक्षणात शास्त्री यांची कथावाचन व प्रवचनाची कारकीर्द सुरू झाली. त्यांनीच धीरेंद्र शास्त्रींना राजकीय व्यासपीठावर आणलं. तसेच मतदारसंघात सॉफ्ट हिंदुत्वाचं राजकारण सुरू केलं. याचा शास्त्री व चतुर्वेदी या दोघांनाही फायदा झाला. चतुर्वेदींनीच शास्त्री व मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेट घडवली. त्यानंतर कमलनाथ यांनी शास्त्रींना आपल्याबरोबर घेत सॉफ्ट हिंदुत्वाचं राजकारण सुरू केलं. कमलनाथ यांनी छिंदवाडामध्ये १०१ फूट उंच हनुमानाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. कमलनाथ यांनी ऑगस्ट २०२३ मध्ये त्यांच्या मतदारसंघात धीरेंद्र शास्त्रींचे कथावाचन व प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित केले होते.
शिवराज सिंह चौहान यांच्याशी जवळचे संबंध
केंद्रीय कृषीमंत्री व मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीआधी हिंदू मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी धीरेंद्र शास्त्रींना जवळ केलं होतं. मध्य प्रदेश भाजपाचे अनेक नेते शास्त्रींच्या व्यासपीठांवर दिसतात. तर, भाजपा नेत्यांच्या राजकीय व्यासपीठांवर धीरेंद्र शास्त्री हजेरी लावताना दिसतात.
बिहारकडे लक्ष
आता बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. दुसऱ्या बाजूला धीरेंद्र शास्त्रींचे बिहार दौरे वाढले आहेत. त्यांचे बिहारमध्ये कथावाचन व प्रवचनाचे कार्यक्रम चालू आहेत. या धार्मिक व्यासपीठांवरून ते बिहारमध्ये हिंदुत्वाचा प्रचार करत असल्याची टीका त्यांच्यावर होत आहे.