धुळे : विकासकामांपेक्षा मतविभाजन आणि ध्रुवीकरण यांवर विजयाचे गणित अवलंबून असणाऱ्या धुळे शहर मतदारसंघात चौरंगी लढत होत आहे. महायुतीचा संपूर्णपणे हिंदुत्वावर भर असला तरी या मतांमध्ये महाविकास आघाडीही काही प्रमाणात वाटेकरी राहणार आहे. दुसरीकडे, एमआयएम आणि समाजवादी पक्ष या दोन्ही पक्षांमुळे मुस्लीम मतांचेही विभाजन निश्चित मानले जात असल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. हिंदू आणि मुस्लीम मतांच्या ध्रुवीकरणाचे दोन्ही बाजूंकडून सुरू असलेले प्रयत्न कोणाला उपयोगी पडतात यावर निकाल अवलंबून असेल.
गेल्या निवडणुकीत धुळे शहरातून एमआयएमचे फारुख शाह हे निवडून आले होते. तेव्हा मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण त्यांच्या पथ्यावर पडले होते. यंदा हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्यावर भाजपचा भर आहे. भाजपचे उमेदवार अनुप अग्रवाल यांचा प्रचाराचा संपूर्ण भर हिंदुत्वावर असून एमआयएमचे आमदार फारुख शाह, समाजवादी पक्षाचे इर्शाद जहागीरदार आणि महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) अनिल गोटे हे रिंगणात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यातील प्रचाराची सुरुवात धुळे शहरातून झाली. मोदी यांच्या सभेचा फायदा उठविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. दलित आणि मुस्लीम मतांचे अधिकाधिक विभाजन करून निवडणूक सोपी करण्याचा प्रयत्न भाजपतर्फे केला जात आहे.
हेही वाचा >>>महायुतीच्या योजनांचा परिणाम शक्य पण लोकांना बदल हवाच! शरद पवार यांचा दावा
अग्रवाल यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून तीन वेळा आमदारपद भोगलेले अनिल गोटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मविआतीलच समाजवादी पक्षाने इर्शाद जहागीरदार हा नवीन चेहरा दिला आहे. जहागीरदार यांनी कूपनलिकांद्वारे पाणीटंचाईचा प्रश्न काही अंशी सोडवला आहे. एमआयएमचे आमदार फारुख शाह हे पुन्हा रिंगणात आहेत. करोनाकाळात प्राणवायू प्रकल्प उभारणीसह जवळपास तीनशे कोटी रुपयांची विकासकामे केल्याचा त्यांचा दावा आहे.
निर्णायक मुद्दे
● धुळे शहर विधानसभा क्षेत्रात साडेतीन लाखांहून अधिक मतदार असून मराठा, मुस्लीम आणि दलित, आदिवासी हे निर्णायक घटक आहेत. मुस्लीम मतदारांची संख्या अन्य समाजांपेक्षा लक्षणीय असल्याने ही मते एकगठ्ठा मिळण्यासाठी उमेदवारांकडून प्रयत्न केला जात आहे.
● लोकसभा निवडणुकीत या मतदार संघातून भाजपला अपेक्षित आघाडी मिळाली नाही. परिणामी धुळे मतदारसंघात भाजपचा निसटता पराभव झाला. मागील विधानसभा निवडणुकीतह मुस्लीम समाजाची एकगठ्ठा मते एमआयएमचे उमेदवार फारूक शाह यांच्यासाठी महत्वपूर्ण ठरली.
लोकसभेतील राजकीय चित्र
● महायुती – ९३,२६२ ● महाराष्ट्र विकास आघाडी – ८८, ४३८