धुळे – मालेगाव मध्य आणि धुळे शहर या दोन मतदारसंघांमुळे होणाऱ्या मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणावर पुन्हा एकदा भाजपचा डोळा असला तरी डाॅ. सुभाष भामरे यांच्या उमेदवारीला काही ठिकाणी होत असलेला विरोध धुळे लोकसभा मतदारसंघात महायुतीची डोकेदुखी वाढविणारा आहे. दुसरीकडे, एमआयएमचा उमेदवारीचा दावा या डोकेदुखीवर मलम म्हणून काम करु शकणारा आहे.
महाराष्ट्रातील ज्या काही मोजक्या मतदारसंघांमध्ये मुस्लिम मते निर्णायक भूमिका वठवू शकतात, त्यात धुळे एक आहे. एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या धुळे लोकसभा मतदारसंघातील धुळे शहर आणि मालेगाव मध्य या दोन्ही ठिकाणी एमआयएमचे आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीत या दोन्ही ठिकाणी एमआयएमला एकूण एक लाख ६३ हजार ६७९ मते मिळाली होती. मुस्लिम उमेदवारांची संख्या अधिक राहिल्यास या दोन्ही मतदारसंघांमधील विरोधी मतांची विभागणी होऊन त्याचा लोकसभा निवडणुकीत अप्रत्यक्ष फायदा भाजप उमेदवाराला होत असल्याचा आजवरचा अनुभव आहे.
हेही वाचा – मावळमध्ये महायुतीतील तिढा वाढला
धुळे लोकसभा मतदारसंघाची जागा महाआघाडीत काँग्रेसला सोडण्यात आली आहे. मागील सलग तीन निवडणुकांपासून या मतदारसंघात काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसचे कुणाल पाटील हे उमेदवार होते. या निवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार कोण राहील, यापेक्षा भाजपला एमआयएम निवडणूक लढविणार का, यात अधिक स्वारस्य आहे. एमआयएमचा उमेदवार रिंगणात राहिल्यास भाजपला सहाय्यभूत ठरेल, असे मानले जाते.
२०१४ आणि २०१९ या दोन लोकसभा निवडणुकीत धुळे शहर आणि मालेगाव मध्य या दोनच विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसने भाजपला जोरदार टक्कर दिली होती. इतर चार मतदारसंघांमध्ये दोघांमधील मतांचे अंतर भलेमोठे होते. मुस्लिमांची निर्णायक मते असलेल्या भागातील कडवा विरोधक म्हटला जाणाऱ्या एमआयएमसारख्या पक्षाला भाजपतर्फे अप्रत्यक्षपणे बळ दिले जावू शकेल.
हेही वाचा – विश्लेषण : मराठा मतपेढी मराठवाड्यात किती प्रभावी? जरांगेंमुळे मतदानाची समीकरणे बदलतील?
विधानसभेच्या धुळे शहर मतदारसंघात तीन लाख ३४ हजार ५१० तर, मालेगाव मध्य मतदारसंघात दोन लाख ९६ हजार मतदार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे पराभूत उमेदवार कुणाल पाटील यांना तीन लाख ८४ हजार २९० तर, भाजपचे विजयी उमेदवार डॉ. भामरे यांना सहा लाख १३ हजार ५३३ मते मिळाली होती. भामरे यांचे मताधिक्य दोन लाख २९ हजार २४३ एवढे होते.
मागील लोकसभा निवडणुकीत धुळे शहर विधानसभा मतदारसंघात भामरे यांना ८६ हजार ८७८ तर, मालेगाव मध्य मतदारसंघात केवळ पाच हजार ३५२, याप्रमाणे या दोन्ही विधानसभा मतदारसंघातून ९२ हजार २३० मते मिळाली होती. काँग्रेसचे पराभूत उमेदवार पाटील यांना धुळे शहर विधानसभा मतदारसंघात ५७ हजार ४२३ तर, मालेगाव मध्य मतदारसंघात एक लाख २६ हजार २७३, अशी दोन्ही विधानसभा मतदारसंघातून एक लाख ८३ हजार ६९६ मते मिळाली होती. म्हणजेच धुळे शहर आणि मालेगाव मध्य या दोन विधानसभा मतदारसंघात पराभूत उमेदवार पाटील यांना भामरे यांच्यापेक्षा ९१ हजार ४६ मते अधिक होती.
हेही वाचा – चंद्रपुरात काँग्रेसमध्ये उघड तर भाजपमध्ये छुपी गटबाजी
मागील निवडणुकीत एमआयएमचा उमेदवार नसताना तिसऱ्या स्थानी राहिलेले वंचित बहुजन आघाडीचे नबी अहमद अहेमदुल्ला यांना धुळे शहर मतदारसंघातून चार हजार २८३ तर, मालेगाव मध्यमधून आठ हजार ४२५ असे एकूण १२ हजार ७०८ मते मिळाली होती. यावरूनच महाविकास आघाडीसाठी धुळे शहर आणि मालेगाव मध्य या दोन विधानसभा मतदारसंघांचे लोकसभेसाठी असलेले महत्त्व लक्षात येईल.