संतोष मासोळे
अडीच वर्षांपूर्वी निवडणूक प्रचार सभांमधून विविध मूलभूत नागरी सुविधा पुरवण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपला महापालिकेत एकहाती सत्ता मिळल्यानंतर प्रत्यक्षात सत्तेचा गाडा हाकताना वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. शहरात विकास कामे गतीने होणे तर दूरच, परंतु रस्ता दुरुस्तीसारख्या कामांनाही विलंब होत असल्याने सभागृहात विरोधकांपेक्षा स्वकियांकडूनच प्रश्नांची सरबत्ती होत असून आपलेच दात आपलेच ओठ अशी अवस्था भाजपची झाली आहे.
भाजपचे तत्कालीन संकट मोचक म्हटले जाणारे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी प्रचार सभांमधून धुळेकरांना मूलभूत नागरी सुविधा पुरविण्याचे जाहीर आश्वासन दिले होते. त्यानुसार विविध कामांना जागोजागी सुरुवातदेखील झाल्याचे दर्शविण्यात आले. प्रत्यक्षात मात्र निम्म्यापैकी अधिक कामांबाबत धुळेवासियांनी नापसंती व्यक्त केली आहे. जलवाहिनी किंवा भुयारी गटार योजनेंतर्गत कामे करण्यासाठी एकाच वेळी खोदण्यात आलेले रस्ते आणि त्यामुळे झालेली गैरसोय हा त्यातलाच एक प्रकार होय. कामांचा संथपणा आणि महानगर पालिका क्षेत्र विस्तारीकरणाबाबत नियोजनाचा अभाव असल्याच्या तक्रारींवरून महापालिका सभागृहात अनेक वेळा सत्ताधारी विरुद्ध सत्ताधारी असाच वाद रंगताना पाहण्यास मिळत आहे.
नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेतही पुन्हा तेच दृश्य दिसले. रुग्णवाहिका खरेदीसाठी मागविल्या निविदेच्या दराबाबतचा विषय मागील सभेत तहकूब ठेवण्यात आला होता. तरीही फेरनिविदेचा ठराव करण्यात आल्याने स्थायी समितीचे सदस्य नागसेन बोरसे यांनी नाराजी व्यक्त केली. सभा सुरू असतानाच वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. महापालिकेकडे जनरेटरची सुविधा नसल्याने स्थायी समितीच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी आपापल्या भ्रमणध्वनीच्या विजेरीच्या प्रकाशात सभेचे कामकाज पुढे रेटले. आपत्कालीन स्थितीत महापालिकेतच सुविधा मिळत नसतील तर शहरवासीयांच्या मदतीसाठी महापालिका प्रशासन कधी आणि कसे पोहचणार, याबद्दल सत्ताधारी सदस्यांमध्येच कुजबूज झाली. मागील एका स्थायी समितीच्या सभेत सत्ताधारी सदस्या किरण कुलेवार यांनी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त होणार नसेल तर सभागृहात कुत्री सोडण्याचा इशारा दिला होता.
काही भागात सुरू असलेल्या रस्ता डांबरीकरण कामांबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. पावसाळा सुरू असताना ही कामे कशी टिकतील, असा प्रश्न विचारला जात आहे. स्थायी समिती सदस्यांनी मांडलेल्या विषयांवर कुठलीही कारवाई होत नसल्याने त्यांच्यात नाराजी आहे. माजी मंत्री तथा खासदार सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल हे महापालिकेतील स्वपक्षीय सदस्यांच्या नाराजीविषयी मौन बाळगून आहेत.
सदस्यांनी विद्यमान समितीच्या कार्यकाळातील लोकोपयोगी प्रश्न मांडल्यास त्यांचे स्वागत होईल. कुठल्याही जुन्या विषयांना चर्चेत आणून काही उपयोग नाही. कुठेही आपली चूक आढळल्यास आणि ती सिद्ध झाल्यास आपण सभापती पदाचा राजीनामा देऊ – शीतल नवले (सभापती, स्थायी समिती)