धुळे – महायुतीचा उमेदवार जाहीर होऊन जवळपास महिनाभराने उमेदवारी मिळूनही महाविकास आघाडीच्या डाॅ. शोभा बच्छाव या धुळे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत अचानक लढतीत आल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज अवैध ठरणे, एमआयएमने उमेदवार उभा न करणे, या दोन कारणांमुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत होणार असून विरोधी मत विभाजनाचा धोका टळल्याने महायुतीचे उमेदवार डाॅ. सुभाष भामरे यांचा मार्ग मात्र खडतर झाला आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघ धुळे आणि नाशिक या दोन जिल्ह्यात विस्तारलेला आहे. एकदा जनसंघाचा विजय सोडला तर पूर्वापार काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणूनच या मतदारसंघाची ओळख राहिली. परंतु, १५ वर्षांपासून या मतदारसंघावर भाजपने एकहाती वर्चस्व राखले आहे. यास मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण हे महत्वपूर्ण कारण ठरले आहे. धुळे आणि मालेगाव या शहरांमधील मुस्लीमांची एकगठ्ठा मते विरोधी विविध उमेदवारांमध्ये विभागल्यावर भाजपच्या ते पथ्यावर पडत आले आहे. याआधी लोकसभा निवडणुकीत विरोधी मतांच्या विभाजनासाठी जाणीवपूर्वक तसे डावपेच भाजपकडून आखले गेल्याची पार्श्वभूमी आहे.
हेही वाचा – इंदूरमध्ये काँग्रेसचा ‘NOTA’साठी प्रचार; भाजपा अडचणीत?
महायुतीकडून भाजप तर मविआकडून काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या या मतदारसंघात भाजपने डॉ. सुभाष भामरे यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. त्यानंतर जवळपास महिन्याने काँग्रेसने माजी मंत्री डॉ. शोभाताई बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केली. डॉ. भामरे आणि डॉ. बच्छाव या प्रमुख उमेदवारांना प्रारंभी स्वकियांकडूनच विरोध झाला. मतदारसंघात या दोन्ही उमेदवारांविरुद्ध नाराजी नाट्य सुरु झाले. भामरे यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेणारे फलक काही ठिकाणी लावण्यात आले. बच्छाव यांना मतदारसंघाच्या बाहेरील उमेदवार म्हणून संबोधले गेले. यामुळे या दोन्ही उमेदवारांना प्रचाराऐवजी स्वकियांची नाराजी दूर करण्यासाठीच अधिक प्रयत्न करावे लागले.
माजी आमदार अनिल गोटे यांनी काँग्रेसच्या नाराज गटाला बळ देऊन तिसरी आघाडी तयार करून उमेदवार देण्याची घोषणा केली होती. मतदार संघात तिसरी आघाडी, एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांशी बच्छाव यांची लढत असली की, हक्काची मते आपल्या पारड्यात पडतील, हा भाजपचा मनसुबा होता. परंतु, तिसऱ्या आघाडीने आणि एमआयएमने उमेदवारच उभे केले नाहीत. त्यांनी बच्छाव यांना पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे वंचित आघाडीचे अब्दुर रहेमान यांचा अर्ज छाननीतच बाद झाला. त्यामुळे भाजपला आता पारंपरिक प्रतिस्पर्धी काँग्रेसशी थेट लढत द्यावी लागणार आहे. विरोधी मतांचे विभाजन न होणारी मागील तीन पंचवार्षिकपैकी ही पहिलीची निवडणूक राहणार असल्याने बच्छाव यांना त्याचा फायदा होऊ शकतो, असे जाणकारांचे मत आहे.
मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांची आपणास जाण असल्याचा बच्छाव यांचा दावा तर, आपल्या दोन पंचवार्षिकच्या कारकिर्दीत केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मतदारांसमोर ठेवण्याचा प्रयत्न भामरे यांनी केला आहे. विकास कामांसाठी केंद्र सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी आणला असून अनेक कामे प्रगतीपथावर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
धुळे जिल्ह्यातील प्रश्न
धुळे जिल्ह्यात औद्योगिक विकासासाठीच्या पुरेशा पायाभूत सोयी सुविधा नाहीत. जिल्हा औद्योगिकदृष्ट्या मागासलेला आहे. गेल्या दोन दशकांत या भागात आलेल्या उद्योग व्यवसायापैकी बहुसंख्य कृषीवर आधारीत असून त्यात तेल गिरण्या, यंत्रमाग, सुत गिरण्या, स्टार्च आणि रसायन उद्योगांचा समावेश असून त्यांना शासकीय पातळीवरील मदतीची गरज आहे. याशिवाय सिंचन, शेती, मनमाड- इंदूर रेल्वे मार्गाची पूर्तता, दुष्काळी भागात पुरेशा पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची आव्हाने आहेत. शिरपूर या तालुक्यातील एकमेव सहकारी साखर कारखानाही बंद पडला आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाची संख्या तब्बल हजारापेक्षा अधिक असली, तरी बेरोजगारीचा जटील प्रश्न कायम आहे. सुलवाडे-जामफळ सिंचन योजनेचे काम प्रगतीपथावर असल्याचा कायमच दावा करण्यात येत असला तरी तसे कोणतेच काम दिसत नाही.
धुळे लोकसभा मतदारसंघातील पक्षीय बलाबल – धुळे शहर विधानसभा मतदार संघ-एमआयएम, धुळे ग्रामीण- काँग्रेस, शिंदखेडा-भाजप,
मालेगाव मध्य- एमआयएम, मालेगाव बाह्य -शिवसेना (शिंदे गट), बागलाण – भाजप