संतोष मासोळे
धुळे: सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रासह प्रशासनासोबतही अनेक योजना राबवून लोकप्रिय झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजीतराजे भोसले यांच्याकडून धुळेकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. रसायनशास्त्रात विज्ञानाची पदवी, सामाजिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी आणि सध्या विधी शाखेचा अभ्यास, अशी शिक्षणाची आवड असलेले रणजीतराजे हे व्यवसायाने बांधकाम ठेकेदार असल्याने आपल्या राजकीय कारकिर्दीचे बांधकामही ते चांगल्या तऱ्हेने करीत आहेत.
आतापर्यंतच्या त्यांनी समाजकारणाव्दारे ठसा उमटविला आहे. छत्रपती शिवाजी संस्था आणि इंडियन चॅरिटेबल ट्रस्ट या दोन संस्थांच्या माध्यमातून रणजीतराजे यांनी शासकीय यंत्रणेबरोबर वेगवेगळ्या ४२ प्रकल्पांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन ते पूर्णत्वाकडे नेले. याशिवाय कृषि, आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास,अंगणवाडी, पाणलोट विकास अशा क्षेत्रात शासनाचे प्रशिक्षक म्हणून १० वर्षांत अनेक शिबिरांचे आयोजन त्यांनी केले. रणजीतराजे यांचे आजी, आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते. देशसेवा आणि देशाप्रती असलेले आपले प्रेम याची शिकवण आपल्या कुटुंबाला आजी, आजोबांकडूनच मिळाल्याचे रणजीतराजे अभिमानाने सांगतात.
हेही वाचा: रविकांत तुपकर : लढवय्या शेतकरी नेता
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअर कॉरिडॉर या महत्वाकांक्षी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा असल्याने रणजीतराजे यांच्याकडून त्याचा पाठपुरावा करण्यात येत आहे. प्रकल्पासाठी मंत्रालय स्तरावर आयोजित अनेक बैठकांना उपस्थिती, आंदोलन असे मार्गही त्यांनी चोखाळले आहेत. कौटुंबिक अशी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतांना रणजीतराजे मात्र शरद पवारांच्या नेतृत्वाखाली २० वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत.
हेही वाचा: डॉ. राहुल पाटील : रचनात्मक कार्यातून राजकारण
पक्षाचे संघटक, प्रवक्ता, सरचिटणीस, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि सध्या राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष अशी त्यांची चढती राजकीय कमान आहे. राजकीय व्यक्तींना सर्वच गोष्टींची जाणीव आवश्यक असल्याने त्यांनी वाचनाचा व्यासंग वाढविला. पुस्तके वाचून झाल्यावर ती घरात केवळ एक शोभा म्हणून ठेवण्यापेक्षा दुसऱ्यांना दान करतात. जवळपास ७०० पुस्तके त्यांनी आतापर्यंत दान केली आहेत.