महेश सरलष्कर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाराणसीमधील ज्ञानव्यापी मशिदीचे प्रकरण, कर्नाटकमधील हिजाबचा वाद वा भाजपच्या तत्कालीन प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे वादग्रस्त विधान अशा काही घटनांच्या पार्श्वभूमीवर, मुस्लिमांशी संवादप्रक्रिया कायम ठेवण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून होत आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी ‘ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन’चे प्रमुख इमाम उमर अहमद इलियासी यांच्याशी दिल्लीमध्ये तासभर चर्चा केली.

सरसंघचालकांची महिन्याभरातील मुस्लिम समाजातील मान्यवरांशी झालेली ही दुसरी भेट आहे. सर्व समाजांकडे संघ खुलेपणाने बघतो व त्यांच्याशी चर्चा करण्याची संघाची तयारी असल्याचा संदेश या भेटींमधून दिला गेल्याचे मानले जात आहे. गेल्या महिन्यामध्ये माजी केंद्रीय निवडणूक आयुक्त एस, वाय कुरेशी, दिल्लीचे माजी नायब राज्यपाल नजीब जंग, अलीगढ विद्यापीठाचे माजी कुलगुरू जमीरुद्दीन शाह आणि व्यापारी सईद शेरवानी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी अनेक वादग्रस्त मुद्द्यांवर प्रदीर्घ चर्चा केली होती.

इमाम इलियासींनी सरसंघचालकांना भेटीचे निमंत्रण दिले होते. त्यांच्या निमंत्रणाचा आदर राखून सरसंघचालकांनी गुरुवारी दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील मशिदीमध्ये इमामांची भेट घेतली. ‘सरसंघचालक समाजातील विविध लोकांना भेटत असतात. इमामांशी झालेली भेट व चर्चा हा याच संवादप्रक्रियेचा भाग आहे’, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले.

इमाम इलियासींनी यापूर्वीही संघाशी आणि भाजपच्या नेत्यांशी संवाद ठेवला होता. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी तसेच, भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याशीही त्यांचा संवाद होता. ‘ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन’चे विद्यमान प्रमुख इमान उमर अहमद इलियासी यांचे वडील मौलाना जमील अहमद इलियासी यांनी ही संघटना स्थापन केली. मौलाना जमील इलियासी यांचे माजी सरसंघचालक के. सुदर्शन यांच्याशी अत्यंत सलोख्याचे संबंध होते. या दोघांमध्ये अनेकदा विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्या होत्या. २००९ मध्ये इलियासी यांच्या अंत्यसंस्कारासाठी सुदर्शन नागपूरहून दिल्लीला आले होते. ‘माझा भाऊ गेला’, अशा शब्दांत सुदर्शन यांनी भावना व्यक्त केल्या होत्या. मौलाना जमील व त्यांचे पुत्र इमाम उमर अहमद इलियासी या दोघांचाही संघाशी संवाद होता व दिल्लीमध्ये गुरुवारी झालेल्या इमाम इलियासी व सरसंघचालक भागवत यांच्या भेटीमुळे त्यांच्यातील संवादाची परंपरा कायम असल्याचे मानले जात आहे.

मुस्लिम बुद्धिजीवींनी सरसंघचालकांच्या भेटीसाठी वेळ मागितली होती. त्यांच्या विनंतीनुसार २२ ऑगस्ट रोजी दिल्लीमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुस्लिम बुद्धीजिवींशी चर्चा केली होती. बुद्धिजिवींशी झालेल्या चर्चेमध्ये गोहत्या, लव-जिहाद, द्वेषाचे राजकारण आदी संवेदनशील मुद्द्यांवर मते मांडली गेली. विविध समाजघटकांनी सामंजस्याने राहिले पाहिजे, त्यासाठी एकमेकांकडे खुलेपणाने पाहिले पाहिजे. तर देशात शांततेचे वातावरण कायम राहील असे मत सरसंघचालकांनी मुस्लिम बुद्धिजिवींच्या बैठकीत व्यक्त केल्याचे समजते. राम मंदिराच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावेळीही संघाने स्वतःहून मुस्लिम समाजातील विविध घटकांशी संपर्क साधला गेला. राम मंदिराचा निकालाचा दोन्ही समाजाने शांततेने स्वीकार केला पाहिजे आणि हिंदूंच्या बाजूने निकाल लागला तर आम्ही उत्सव साजरा करणार नाही, हे आश्वासन संघाने दिले होते व त्याचे पालनही झाले. दोन्ही समाजामध्ये संवाद सुरू राहिला पाहिजे. काही कट्टर भूमिका घेत असतात, पण, बहुतांशवेळी लोकांची चर्चा करण्याची तयारी असते, अशी संघाची भूमिका आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dialogue continued with muslim community rss chief mohan bhagwat visited mosque print politics news amy