Lalu Prasad And Nitish Kumar: अलिकडच्या काळात, जेव्हा जेव्हा बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला आहे, तेव्हा तेव्हा नितीश कुमार यांनी तेजस्वी यांच्या कथित अनुभवहीनतेवर टीका करत त्यांना “बच्चा” म्हणत थांबण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या चालू असलेल्या बिहार विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, नितीश यांनी आणखी आक्रमक भूमिका घेत, तेजस्वी यादव यांचे वडील आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यांना १९९० मध्ये बिहारचे मुख्यमंत्री बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, असा दावा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“तुमच्या वडिलांना मीच मुख्यमंत्री केले होते. तुमच्या समाजाचे लोकही म्हणायचे की, मी त्यांना का पाठिंबा देत आहे. तरीही, मी त्यांना पाठिंबा दिला,” असे वक्तव्य नितीश यांनी ४ मार्च रोजी सभागृहात केले होते. मुख्यमंत्र्यांच्या या टिप्पणीनंतर नाराज होऊन तेजस्वी विधानसभेतून निघून गेले होते.

१९७४ मध्ये लालू प्रसाद पहिल्यांदा पाटणा विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आले होते. तो काळ जेपी चळवळीचा होता. बिहार आणि भारताच्या इतर भागांमध्येही काँग्रेसविरोधी भावना पसरली होती. त्याचवेळी बिहार अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थी नेते असलेले नितीश कुमार यांनीही सक्रिय राजकारणात पाऊल ठेवले होते.

असे असले तरी, नितीश कुमार यांच्या राजकीय कारकिर्दीचे मार्ग सुरुवातीपेक्षा वेगळे होते. इंदिरा गांधींनी आणीबाणी मागे घेतल्यानंतर झालेल्या १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत लालू छपरा येथून खासदार झाले, तर नितीश त्याच वर्षी विधानसभा निवडणुकीत आणि पुढे १९८० मध्ये नालंदा जिल्ह्यातील हरनौत मतदारसंघातून पराभूत झाले. अखेर १९८५ मध्ये त्यांना यश मिळाले आणि आमदार झाले. त्यावेळी लालू आणि नितीश दोघेही माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील लोकदलामध्ये होते आणि तेव्हापासून त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली.

आक्रमक लालू प्रसाद

फेब्रुवारी १९८८ मध्ये ठाकूर यांचे निधन झाले तेव्हा लालू, शिवानंद तिवारी, नितीश, रघुवंश प्रसाद सिंह, जगदानंद सिंह आणि विजय कृष्ण हे पक्षातील दुसऱ्या फळीचे महत्त्वाचे नेते होते. पण, राज्यातील समाजवादी राजकारणात अजूनही विनायक प्रसाद यादव, अनुप लाल यादव आणि गजेंद्र हिमांशू यांचे वर्चस्व होते जे लालू आणि त्यांच्या सहकाऱ्यांपेक्षा वरिष्ठ होते.

कर्पूरी ठाकूर यांच्या निधनानंतर आक्रमक व्यक्तीमत्व असलेले, एक ग्रामीण शैलीचे लालू प्रसास ज्येष्ठ यादव त्रिकुटाला बाहेर काढण्याचा आणि कर्पूरी ठाकूर यांचे राजकीय उत्तराधिकारी म्हणून दावा करण्याचा प्रयत्न करत होते. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि माजी उपपंतप्रधान चौधरी देवीलाल यांच्या जवळचे असलेले शरद यादव, १९८९ मध्ये अनुप लाल यादव यांना विरोधी पक्षनेते बनवण्यात जवळजवळ यशस्वी झाले. परंतु अखेर शिवानंद तिवारी आणि नितीश कुमार यांनी या पदासाठी लालूंना पाठिंबा दिला.

लालू प्रसाद यांना नितीश कुमारांचा पाठिंबा

२०१५ मध्ये, नितीश कुमार यांनी द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, “आम्ही लालू प्रसाद यांना पाठिंबा दिला कारण ते आमच्या पिढीचे नेते होते. त्यांना पाठिंबा देऊन, आम्ही आमच्या पिढीला सत्तेत आणू इच्छित होतो.”

लालू लोकदलाचे आणि विरोधी पक्षनेते होते तेव्हा व्ही. पी. सिंह यांनी जनता दल स्थापन करण्यासाठी त्यांचा जनमोर्चा पक्ष लोकदल आणि इतर समाजवादी पक्षांमध्ये विलीन केला, तेव्हा लालू प्रसाद मागे पडले कारण त्यांना व्ही. पी. सिंह यांची पसंती नव्हती.

…अन् लालू प्रसाद मुख्यमंत्री झाले

१९९० च्या विधानसभा निवडणुकीत, जनता दलाने माजी मुख्यमंत्री राम सुंदर दास यांच्यासारखे ज्येष्ठ नेते असूनही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला नव्हता. तोपर्यंत व्ही. पी. सिंग पंतप्रधान झाले होते आणि पक्ष व्ही. पी. सिंग, उपपंतप्रधान देवीलाल आणि चंद्र शेखर अशा तीन गटात विभागला गेला होता.

जनता दलाने निवडणूक जिंकली आणि मुख्यमंत्रीपदासाठी डावपेच सुरू झाले. व्ही. पी. सिंग राम सुंदर दास यांना मुख्यमंत्री बनवू इच्छित होते, तर देवीलाल यांनी लालूंच्या पारड्यात आपले वजन टाकले. त्यावेळी लालूंनी चंद्र शेखर यांच्याकडे मदत मागितली होती. तेव्हा चंद्र शेखर मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत उत्तर बिहारमधील प्रभावी नेते रघुनाथ झा यांना पाठिंबा देत होते. परंतु त्यांना माहित होते की, झा जिंकू शकणार नाहीत. त्यामुळे राम सुंदर दास यांना जिंकण्यापासून रोखण्यासाठी, चंद्र शेखर लालूंच्या मागे उभे राहीले आणि शेवटी लालू जिंकले. पक्षाच्या अंतर्गत निवडणुकीत, लालूंना ५९, दास यांना ५६ आणि झा यांना १४ मते मिळाली. झा यांना मिळालेल्या मतांमुळेच लालूंचा विजय निश्चित झाला.

नितीश कुमारांचे लालू प्रसादांसाठी लॉबिंग

नीतीश कुमार ज्याचा उल्लेख करत असावेत ते लालूंसाठी केलेल्या त्यांच्या जोरदार लॉबिंगचा असेल. समस्तीपूर येथील ज्येष्ठ नेते विजयवंत चौधरी म्हणाले, “मी चंद्रशेखर यांच्या गटात होतो. मी शिवानंद तिवारी आणि नितीश कुमार यांना अतिशय चुरशीच्या लढाईत लालूंसाठी लॉबिंग करताना पाहिले. मुख्यमंत्री बनण्यासाठी लालूंना त्यांच्या सहकाऱ्यांचा पाठिंबा होता. त्यामुळे विधानसभेत तेजस्वी यांच्यावर टीका करताना नितीश यांच्या विधानांचा हा अर्थ असावा.” याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.

तरुण समाजवादी नेत्यांचे युग

चौधरी पुढे म्हणाले की, “१९८९ मध्ये ज्येष्ठ काँग्रेस नेते राम लखन सिंह यादव यांच्याविरुद्ध निवडणूक लढवणाण्यासाठी विजय कृष्णा यांच्या जागी नितीश कुमार यांना बरह लोकसभेचे तिकीट मिळाले होते, त्यामुळे नितीश कुमार यांना लालूंना पाठिंबा देणे बंधनकारक वाटले असावे. राम लखन यांना पराभूत करून नितीश जायंड किलर म्हणून उदयास आले आणि त्यांनी त्यानंतर त्यंनी मित्राला मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला आणि अशा प्रकारे तरुण समाजवादी नेत्यांचा युग सुरू झाला.”

बिहारच्या राजकारणाला आकार

नितीश कुमार १९९४ मध्ये जनता दलातून बाहेर पडले आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत समता दलाची स्थापना केली. जेपी चळवळीपासूनचे मित्र असलेले नितीश आणि लालू आपापल्या मार्गांनी वेगळे झाले आणि बिहारच्या राजकारणाला आकार दिला. ते २०१५ मध्ये आणि नंतर २०२० मध्ये एकदा एकत्र आले पण दोन्ही वेळा त्यांची युती जास्त काळ टिकू शकली नाही.