दिगंबर शिंदे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगली : सांगली मतदार संघासाठी गेल्या चार वर्षामध्ये तब्बल २६५० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. याच कालावधीत महापालिकेच्या तिजोरीतून सांगलीच्या वाट्यासाठी वार्षिक दोन अडीचशे कोटींचा निधी धरला तर चार वर्षात एक हजार म्हणजे केवळ सांगलीसाठी साडेतीन हजार कोटींचा निधी मंजूर झाला असेल तर सांगलीचे शांघाय झाल्याचे दिसले असते. मात्र, आजही प्रदुषणामुळे अंतिम आचके देणारी कृष्णामाई, बारमाही पावसाळी पर्यटन स्थळ असलेले शामरावनगर आणि पावसाळ्यात यातनामय प्रवासाचा अनुभूव घेणारी उपनगरे पाहिली की या दाव्यावर कितपत विश्‍वास ठेवायचा हा प्रश्‍नच आहे.

आमदार गाडगीळ यांनी विकास निधीबाबत दावा करताना माझं ते माझंच आणि दुसर्‍याचही माझंच असे श्रेय घेण्याचा प्रयत्न तर केलाच आहे. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आमदारांच्या दाव्याला आव्हान देत पुढची निवडणूक श्रेयवादाने गाजणार असल्याची चुणूक दाखवली आहे. सांगली विधानसभा मतदार संघासाठी गेल्या चार वर्षात तब्बल २६५० कोटींच्या निधीची बरसात करण्यात आल्याचा दावा आमदार सुधीर गाडगीळ यांनी केल्यानंतर सांगलीचे शांघाय करण्याचे स्वप्न साकार झाल्याची स्वप्ने पडू लागली आहेत. महापालिका क्षेत्रात एवढा निधी येउनही प्रत्यक्षात नागरी सुविधांची ऐसीतैसी का असा प्रश्‍न सांगलीकरांना पडला आहे. तर मिरज वैद्यकीय महाविद्यालयासह जिल्हा रूग्णालयात करण्यात येत असलेल्या नियमित सोयीसुविधा, राष्ट्रीय महामार्गावर करण्यात आलेला केंद्रिय निधीतून खर्चही यात श्रेयवादासाठी धरण्यात आल्याने हा गोंधळ सध्या माजला आहे.

हेही वाचा >>> भाजपमध्ये दिया कुमारी या वसुंधराराजे यांना पर्याय ठरू शकतील का ?

सांगली मतदार संघात गेल्या चार वर्षाच्या कालखंडात मोठ्या प्रमाणावर निधी आल्याचा दावा करीत सर्व कामांची यादीच आमदार गाडगीळ यांनी जाहीर केली. यामध्ये हरिपूर येथील कोथळी पूल, आयर्विन पूलाला समांतर पूल, जिल्हा रूग्णालयात नव्याने १०० खाटांच्या रूग्णालयाचे बांधकाम करणे, शहरासाठी नवीन नाट्यगृह आदी कामासह आमदारांच्या स्थानिक विकास निधी, नाबार्ड, अर्थसंकल्पीय तरतूदी, महापालिकेतील मलनिस्सारण प्रकल्प आदी बाबींचा उल्लेख करत असताना यासाठी तब्बल २६५० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचा दावा आमदार गाडगीळ यांनी केला.

हेही वाचा >>> काँग्रेस पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत व्यग्र; इंडिया आघाडीचे जागावाटप ‘जैसे थे’!

या दाव्याचा प्रतिवाद काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पाटील यांनी करीत असताना जिल्हा रूग्णालयात वाढीव खाटांचे रूग्णालय उभारणीचा प्रस्ताव आपल्यामुळेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर करण्यात आल्याचा दावा करीत आमदारांचा दावा खोटा असल्याचे सांगितले. तर रेल्वे उड्डाण पूल, पेठ-सांगली महामार्ग बांधणीस मिळालेली मंजूरी ही केंद्र शासनाची असल्याने यात आमदारांचा संबंध येतोच कुठे असा सवाल करीत मग पालकमंत्री या नात्याने सुरेश खाडे आणि खासदार या नात्याने संजयकाका पाटील यांनी सांगली जिल्ह्याचे ठिकाण म्हणून काही केलेच नाही का असा सवाल उपस्थित केला. सगळेच आमदारांच्या प्रयत्नातून होत असेल तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात पालकमंत्री या नात्याने जयंत पाटील यांनी शहर विकासासाठी केलेल्या कामाचा आणि उपलब्ध करून दिलेल्या निधीचा उल्लेख का नाही असा रास्त सवाल उपस्थित केला.

हेही वाचा >>> राजस्थान : दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपा, काँग्रेसकडून प्रयत्न; ३४ जागांवर डोळा!

सांगली मतदार संघासाठी गेल्या चार वर्षात जर अडीच हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असेल तर सांगली महापालिकेचे वार्षिक बजेट पाचशे ते सहाशे कोटींचे असते. यामध्ये सर्वच निधी उपलब्ध होउ शकत नाही. तरीही वर्षाकाठी सांगलीसाठी मिरज, कुपवाड शहरे वगळून तीनशे कोटींचा निधी सांगलीच्या वाट्याला आला असेल. म्हणजे गेल्या चार वर्षातील हजार-बाराशे कोटी आणि आमदार गाडगीळ यांच्या सांगण्यानुसार अडीच हजार कोटी एकूण सुमारे साडेतीन ते चार हजार कोटींची बरसात सांगलीसाठी झाली असेल तर सांगलीचे शांघाय होण्यास काहींच हरकत नव्हती. मात्र, प्रत्यक्षात सांगलीकरांच्या नजरेसमोर शेरीनाल्याचे दुषित पाणी, उपनगरातील उखडलेले रस्ते, शामरावनगरचे बारमाही मान्सून पर्यटन हे पाहावे लागले नसते.

निवडणुका तोंडावर आल्यानंतर आमदार गाडगीळ यांना श्रेयवाद सुचला आहे. येणारी निवडणूक बदलत्या राजकीय स्थितीत सोपी नसल्यामुळेच विकास कामांचे श्रेय घेण्यासाठी तर आमदार पुढे सरसावले नाहीत का अशी शंका या निमित्ताने उपस्थित होत आहे. तत्पुर्वी खासदारकीची निवडणुक होणार असून सांगलीतील विकास कामांचे श्रेय मिळविण्यासाठी अद्याप खासदार पुढे आलेले नाहीत. ते पुढे आले की पुन्हा गोंधळ निर्माण होणार आहे. भाजप अंतर्गत सुरू असलेल्या शीत युध्दाला पक्षांतर्गत संघर्षाचे स्वरूप तर मिळणार नाही ना अशी भीती भाजपच्या धुरिणांना आतापासूनच वाटत आहे. गत निवडणुकीत अल्प मतांनी काँग्रेसची सांगलीची जागा गेली आहे. मात्र, पराभूत होउनही काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पाटील हे सार्वजनिक कामासाठी आणि शासन विरोधात आंदोलनासाठी रस्त्यावर असल्याचे चित्र दिसत आहे. कदाचित आमदार गाडगीळ यांना भाजपमधून मिळत असलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी हा श्रेयवाद करावा असे वाटले असू शकते. याच बरोबर काँग्रेसलाही चेकमेट करण्याचा डाव तर या मागे नाही ना अशी रास्त शंका गाडगीळ यांच्या अडीच हजार कोटींच्या दाव्यामुळे वाटत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Did sangli improve as per bjp mla sudhir gadgil claim print politics news ysh
Show comments