भारत जोडो यात्रेत आम्ही तिरस्कार संपवणार हे म्हटलं होतं. आम्हाला रस्त्यावरून फिरताना तुम्ही दाखवलंत की तुम्ही हे करू शकता. भारत जोडो यात्रेत जर कुणी पडलं मग तो कुणीही असो हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख कुणीही असो. जो माणूस पडला त्याला पटकन उचललं गेलं. त्याला कुणी त्याचा धर्म किंवा जात विचारली नाही असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. नोटबंदी आणि जीएसटीच्या मुद्द्यावरही मोदी सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे.
काय म्हटलं आहे राहुल गांधी यांनी?
कुरूक्षेत्र ही महाभारताची जमीन आहे. कौरव आणि पांडवांची ही भूमी आहे. त्यावेळी जी लढाई होती ती लढाई आजही होते आहे. लढाई कुणामध्ये होते आहे? जरा विचार करा. पांडव कोण होते? अर्जुन, भीम हे सगळे तपश्चर्या करणारे तपस्वी होते.
पांडवांनी कधी आपल्या देशात तिरस्कार पसरवला का?
पांडवांनी आपल्या राज्यात, देशात तिरस्कार पसरवला का? तुम्ही महाभारत वाचलं असेल तर तुम्ही हे कधी वाचलंय का? की पांडवांनी नोटबंदी केली होती? कधी चुकीच्या पद्धतीने जीएसटी लागू केला का? का केला नाही? कारण ते तपस्वी होते. पांडवांना माहित होतं नोटबंदी, चुकीच्या पद्धतीने जीएसटीची अमलबजावणी, शेतकऱ्यांसाठीचे काळे कायदे हे आणलं तर त्यामुळे या ठिकाणी जे लोक आहेत त्यांच्याकडून चोरी करण्याचं ते साधन बनतील त्यामुळे त्यांनी त्यांच्या काळातही कधी असे निर्णय घेतले नाहीत असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
एकीकडे पाच पांडव तपस्वी होते तर दुसरीकडे कौरवांची संघटना होती. पाच पांडव आणि त्यांच्या विरोधात कौरव. पांडवांसोबत प्रत्येक धर्माचे लोक होते. जशी आपली यात्रा सुरू आहे आपल्या यात्रेत कुणी विचारत नाही की तुझा धर्म कोणता? तसंच पांडवांनीही विचारलं नव्हतं. पांडवांनीही तिरस्कार संपवण्यासाठी प्रेम, आपुलकी कशी पसरवता येईल यावर लक्ष केंद्रीत केलं होतं असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
२१ व्या शतकातले कौरव कोण आहेत ?
२१ व्या शतकातले कौरव कोण आहेत? हे कौरव खाकी पँट घालतात, त्यांच्या हातात लाठी असते आणि ते शाखेत जातात. त्यांच्या बाजूने भारतातले दोन-तीन सगळ्यात श्रीमंत अब्जाधीश उद्योजक आहेत. नोटबंदी याच लोकांनी करायला लावली. चुकीच्या पद्धतीने जीएसटी अमलबजावणी याच लोकांनी केली असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. दोन-तीन अब्जाधीशांनी सांगितलं आणि पंतप्रधानांनी हे निर्णय घेतले. तुम्ही मान्य करा किंवा करू नका असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
पांडवांच्या काळात त्यांच्या बाजूने कुणीही अब्जाधीश नव्हते. तर त्यांच्यासोबत या जगातले लोक होते. सगळ्या स्तरातले लोक पांडवांसोबत होते त्यामुळे ते युद्ध जिंकले असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. आपला देश हा तपस्वी लोकांचा देश आहे.