मोहनीराज लहाडे

पुणतांब्यातील (ता. राहाता, नगर) शेतकऱ्यांनी पाच वर्षांपूर्वी ‘शेतकऱ्यांचा संप’ अशी अभूतपूर्व संकल्पना मांडून आंदोलनाला सुरुवात केली होती. त्याला राज्यव्यापी स्वरूप प्राप्त होऊ लागले होते. मात्र, तत्पूर्वीच आंदोलकांमध्ये फाटाफूट झाली. बरेचसे प्रश्न ‘जैसे थे’ राहिले. आता पुन्हा पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्याची दखल घेताना मात्र महाविकास आघाडीतील विसंवाद समोर आला आहे. तर भाजपकडून आंदोलनाला सहानुभूती मिळण्यास सुरुवात झाली आहे.

महाविकास आघाडीतील काँग्रेसचे मंत्री आणि नेत्यांनी दोनच दिवसांपूर्वी आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. मात्र ते आंदोलकांना चर्चेसाठी राजी करू शकले नाहीत, ठोस आश्वासन देऊ शकले नाहीत. काँग्रेस नेते आंदोलकांना भेटल्याची माहिती मिळताच शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी चपळाई करत आंदोलक व कृषिमंत्री दादा भुसे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा घडवून आणली. कृषिमंत्री भुसेही तातडीने पुणतांबा येथे आले आणि त्यांनी आंदोलकांना मंगळवारी ७ जूनला मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठकीस उपस्थित राहण्यास राजी करत काँग्रेसवर कुरघोडी केली. या आंदोलनावर राष्ट्रवादी कॉँग्रेसने आतापर्यंत काहीच मत व्यक्त न केल्याने सरकारमधील विरोधाभास उघड झाला आहे.

आंदोलकांची भेट घेताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ‘संगमनेरमध्ये या, चर्चा करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे प्रश्न मांडू, ते सोडवू,’ असे आश्वासन दिले तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आंदोलकांना चर्चेसाठी मुंबईत येण्याचे निमंत्रण दिले. मात्र निर्णय काहीच झाला नाही ना बैठकीची तारीख. शिवसेना मंत्र्यांच्या भेटीनंतर मुंबईत बैठकीची तारीख ठरली. त्यासाठी शिवसेनेस उपमुख्यमंत्र्यांचेही सहकार्य लाभले. खरेतर महसूलमंत्री थोरात हे नगर जिल्ह्यातील काँग्रेसचे एकमेव नेते आहेत. त्यांच्या पुढाकारातून बैठक झाली असती तर ते काँग्रेससाठीही उपयुक्त ठरले असते. मात्र महाविकास आघाडीतील विसंवादाने ते घडू शकले नाही. आंदोलनाची दखल घेताना महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या तीन स्वतंत्र भूमिका समोर आल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिल्लीत आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. मात्र, दुसरीकडे महाराष्ट्रात गावोगावी शेतकऱ्यांची आंदोलने सुरू करण्याचे प्रयत्न होत आहेत. त्याला पाच वर्षांपूर्वीप्रमाणे पुन्हा साथ मिळणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण मागील आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक शेतकरी संघटना अद्याप पुणतांब्यातील आंदोलनापासून लांब आहेत. गोदावरीकाठी वसलेल्या पुणतांबा गावाला धार्मिकदृष्ट्या महत्त्व असल्याचे पुरातन दाखले आहेत. ‘दक्षिणेचा काशी’ अशीही गावाची ओळख होती. ही धार्मिक भूमी आता शेतकरी आंदोलकांची भूमी म्हणून ओळखली जात आहे. पुणतांबा ग्रामपंचायत भाजप नेते व माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या वर्चस्वाखाली आहे. मात्र, या आंदोलनात विविध पक्ष-संघटना सहभागी झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार श्री साईबाबा देवस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्या मतदारसंघात पुणतांब्याचा समावेश आहे. मात्र, सध्या आमदार या आंदोलनापासून लांब आहेत. भाजप नेते आणि कृषिमूल्य आयोगाचे माजी सदस्य पाशा पाटील यांनी आंदोलकांची भेट घेऊन ५ जूननंतर आंदोलन कशा पद्धतीने तीव्र केले जावे, याचे मार्गदर्शन केले. आंदोलन लांबल्यास, त्याची व्याप्ती वाढल्यास त्यास राजकीय वळण लागल्याचा अनुभव पाच वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी घेतला आहे. याची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी सहभागी शेतकरी संघटनांना घ्यावी लागणार आहे.

Story img Loader