चंद्रपूर : जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे आमदार विजय वडेट्टीवार-आमदार सुभाष धोटे, राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर आणि माजी खासदार नरेश पुगलिया असे तीन गट सक्रिय आहेत. ‘‘तीन तिघाडा काम बिघाडा नको’’ असे जाहीर वक्तव्य वडेट्टीवार यांनी आमदार सुभाष धोटेंना उद्देशून केले हाेते व भविष्यात एकत्र राहू आणि सर्व निवडणुका एकत्र लढू, असे आवाहनही केले होते.

जिल्ह्यात काँग्रेस पक्ष हा अनेक गटात विभागला आहे. सध्या विजय वडेट्टीवार-सुभाष धोटे, बाळू धानोरकर व प्रतिभा धानोरकर आणि नरेश पुगलिया या तिन्ही नेत्यांचे स्वतंत्र गट असले तरी त्यांच्यासोबत काम करणारे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे उपगटदेखील सक्रिय आहेत. एकाचा कार्यकर्ता दुसऱ्याला चालत नाही इतकी वाईट अवस्था आहे. या सर्व गटांचे स्वतंत्ररित्या वेगवेगळे कार्यक्रम सुरू असतात. आता तर धानोरकर दाम्पत्य एका बाजूला तर वडेट्टीवार, धोटे एका मंचावर दिसायला लागले आहेत.

हेही वाचा – नागपूर: ‘मोका’नंतर आता ‘फॅबीयन’ चक्रीवादळाचे संकट; भारतावर काय परिणाम होणार, जाणून घ्या

शनिवारी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात आयोजित सहकार मेळावा व सत्कार कार्यक्रमात भाषणांची चांगलीच जुगलबंदी झाली. यावेळी वडेट्टीवार यांनी आगामी सर्व निवडणुकीत काँग्रेस पक्ष जिंकणार असे सांगितले. फक्त तीन तिघाडा, काम बिघाडा असला प्रकार होता कामा नये. यासाठी धोटे व मी एकत्र राहिले पाहिजे असेही वडेट्टीवार म्हणाले. आम्ही दोघे एकत्र आहोत असे म्हणताच समोर गर्दीतून तुम्ही खरच एकत्र राहणार काय, असा सवाल चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे यांनी विचारला. यावर धोटे म्हणाले होय, आम्ही एकत्र आहोत आणि भविष्यात एकत्र राहणार आहोत. या नेत्यांनी असे जाहीरपणे एकीचे आश्वासन दिले असले तरी कार्यकर्ते संभ्रमात आहेत. या नेत्यांची गटबाजी पुन्हा उफाळून आली तर जिल्हा परिषद, नगर परिषद, महापालिका, लोकसभा आणि विधानसभा या निवडणुका जिंकायच्या कशा, असा प्रश्न या सर्वांना पडला आहे.

Story img Loader