मुंबई : गटारी संपून श्रावण महिन्याला सुरुवात होताच राजकीय आघाड्यांवर यात्रांचा हंगाम सुरू झाला आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची ‘नवनिर्माण यात्रा’ सोमवारपासून सोलापूरमध्ये सुरू झाली असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ‘जनसन्मान यात्रा’ गुरुवारपासून नाशिकमधील दिंडोरीपासून सुरू होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ‘शिवसंकल्प अभियान’ सुरूच आहे. याबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ‘लाडक्या बहिणीं’ची मते मिळावीत म्हणून ठिकठिकाणी मेळावे घेण्यास सुरुवात झाली आहे.
‘लाडकी बहीण’द्वारे शिंदेंची मतपेरणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना सध्या खूश करण्यावर भर दिला आहे. अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर करण्यात आली. लोकप्रिय घोषणांच्या माध्यमातून महिला वर्गाची मते मिळावीत यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनीही पुढाकार घेतला आहे. दोनच दिवसांपूर्वी संभाजीनगर जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी मेळावा घेण्यात आला. अशाच प्रकारे विविघ भागांमध्ये मेळावे आयोजित करून लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट देण्याची योजना आहे.
हेही वाचा >>> सुधारित वक्फ कायद्याला कडाडून विरोध; भाजप सरकार समाजात फूट पाडत असल्याचा आरोप
राज ठाकरेंची राज्यव्यापी यात्रा
विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केलेले मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच राज्यव्यापी यात्रा काढली आहे. ठाकरे यांच्या नवनिर्माण यात्रेची सुरुवात सोमवारी सोलापूरमधून झाली. १३ ऑगस्टपर्यंत राज ठाकरे हे सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये भेटी देणार आहेत. सहसा मुंबई, पुणे, नाशिक या सुवर्ण त्रिकोणाच्या बाहेर फारसे बाहेर न पडणारे राज ठाकरे यात्रेच्या निमित्ताने राज्याच्या विविध भागांना भेटी देणार आहेत.
अजित पवारांची ‘जनसन्मान यात्रा’
पुणे या कार्यक्षेत्रातच जास्तीत जास्त वावर असणाऱ्या अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील बंडानंतर राज्याकडे आता लक्ष केंद्रित केले आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अजित पवार राज्यात फिरू लागले आहेत. पवार यांची ‘जनसन्मान यात्रा’ गुरुवारपासून सुरू होत आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून सुरू होणारी यात्रा पहिल्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भातून जाणार आहे. २४ दिवसांत ३९ विधानसभा मतदारसंघांमध्ये पवार हे सर्वसामान्यांशी संवाद साधणार आहेत. लोकसभा निवडणुकीत पक्षाला मोठा फटका बसला. विधानसभेत तरी यश मिळावे या उद्देशाने वातावरणनिर्मिती करणार आहेत.
भाजपच्या ‘तिरंगा यात्रा’
भाजपच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर तिरंगा यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात ११ ते १४ ऑगस्ट या काळात प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय तिरंगा यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘हर घर तिंरगा’ अभियान मोठ्या उत्साहात साजरे केले जाणार असल्याचे भाजपच्या आमदार उमा खापरे यांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंचा शिवसंकल्प मेळावा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसंकल्प मेळाव्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यात शिवसंकल्प मेळावे पार पडले. आणखी काही मेळाव्यांचे लवकरच आयोजन केले जाणार आहे.
गाजलेल्या पदयात्रा :
निवडणुकीच्या तोंडावर आयोजित करण्यात येणाऱ्या यात्रांचा राजकीय नेत्यांना फायदा होतो. लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन टप्प्यांमध्ये काढलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेमुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आत्मविश्वास बळावला होता. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला या यात्रेचा फायदाही झाला. २००४च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आंध्र प्रदेशमध्ये तत्कालीन काँग्रेस नेते वाय. एस. राजशेखर रेड्डी यांनी काढलेल्या पदयात्रेचे राज्याचे राजकीय चित्रच बदलले होते. रेड्डी मुख्यमंत्री झाले होते. २०१९च्या विधानसभा निवडणुकीर्पू्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यात महाजनादेश यात्रा काढली होती. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्यासह अनेक नेत्यांच्या पदयात्रा गाजल्या आहेत.