लोकसभा निवडणुकीपूर्वी काश्मीरमधील इंडिया आघाडीत बिघाडी होताना दिसत आहे. इंडिया आघाडीला पाठिंबा देणारा पक्ष नॅशनल कॉन्फरन्स पीडीपीला काश्मीरमधील तिन्ही लोकसभा जागांवर उमेदवार उभे करण्यास भाग पाडत असल्याचे पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP) च्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी बुधवारी सांगितले. नॅशनल कॉन्फरन्सने (NC) अनंतनाग-राजौरी जागेसाठी आपला उमेदवार मियां अल्ताफ यांची घोषणा करून लोकसभा निवडणुकीसाठी पीडीपीबरोबर काश्मीरमध्ये जागावाटपाची कोणतीही शक्यता नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने (PDP) काश्मीरमधील सर्व जागा लढवणार असल्याचे जाहीर केले.
खरं तर नॅशनल कॉन्फरन्सने काश्मीरमधील तिन्ही जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याचं जाहीर केले होते. नॅशनल कॉन्फरन्सने इंडिया आघाडी अंतर्गत केलेल्या जागावाटपामध्ये जम्मूच्या दोन जागा काँग्रेससाठी सोडल्या होत्या. तर नॅशनल कॉन्फरन्सने आमच्यासाठी उमेदवार उभे करणे किंवा निवडणूक लढवण्याशिवाय पर्याय ठेवलेला नाही, असेही मेहबूबा मुफ्ती यांनी सांगितले. मेहबुबा मुफ्तींच्या निर्णयामुळे आता नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी दोन्ही इंडिया आघाडीतील पक्ष काश्मीरमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० आणि ३५ अ हटवल्यानंतर खोऱ्यातील राजकीय पक्षांनी पीपल्स अलायन्स फॉर द गुपकर डिक्लेरेशन (PAGD) ही युती स्थापन केली होती, आता त्या युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जम्मू आणि काश्मीरला पुन्हा एकदा विशेष दर्जा मिळावा, यासाठी २०२० मध्ये ही आघाडी स्थापन करण्यात आली होती.
हेही वाचाः Lok Sabha Election 2024: जानकर कुटुंबातही दुफळी पुतण्या माढा मधून लढणार
काश्मीरमध्ये सर्व पक्षांनी एकत्र येणं गरजेचं- मेहबुबा मुफ्ती
पीडीपी पक्षाचे संसदीय मंडळ येत्या काही दिवसांत उमेदवारांबाबत अंतिम निर्णय घेईल, असेही मेहबुबा मुफ्ती यांनी सांगितले. केंद्राने ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर येथील राजकीय पक्षांनी एकजूट दाखवणे ही काळाची गरज आहे. तरुण तुरुंगात आहेत, आम्ही आवाज उठवू शकत नाही, कर्मचाऱ्यांचे कुटुंबीयही काही बोलू शकत नाहीत. येथे दडपशाहीचे वातावरण आहे. त्यामुळे अशा वातावरणात आपण एकजूट असणे गरजेचे आहे, असंही मेहबूबा मुफ्ती म्हणाल्यात. नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी यांच्यातील जागावाटपाच्या करारासाठी उत्सुक असलेल्या इंडिया आघाडीतील आणखी एक भागीदार असलेल्या काँग्रेसने जम्मू प्रदेशातूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्यासाठी अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघ सोडून खोऱ्यातील दोन जागांवर नॅशनल कॉन्फरन्सने निवडणूक लढवावी, अशी काँग्रेसची इच्छा होती.
हेही वाचाः Lok Sabha Elections 2024 : परभणीच्या रणधुमाळीत ‘घड्याळा‘चा गजर थांबला !
…म्हणून त्यांच्यासाठी एकही जागा सोडणार नाही, मेहबुबा मुफ्तींचा पवित्रा
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेतृत्वाची वृत्ती निराशाजनक आणि दुखावणारी आहे. जेव्हा इंडिया आघाडीची बैठक झाली, तेव्हा मी तिथे म्हणालो होतो की, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला हे आमचे ज्येष्ठ नेते असल्याने ते जागावाटपाचा निर्णय घेतील आणि न्याय करतील. ते पक्षहित बाजूला ठेवतील अशी मला अपेक्षा होती, पण त्यांनी काश्मीरमधील तिन्ही जागांवर निवडणूक लढवण्याचा एकतर्फी निर्णय घेतला. मुफ्ती म्हणाल्या की, नॅशनल कॉन्फरन्सने त्यांच्याशी संपर्क साधून निर्णय जाहीर करण्यापूर्वी पीडीपीशी सल्लामसलत केली असती तर काश्मीरच्या व्यापक हितासाठी त्यांचा पक्ष उमेदवार न देण्याचा निर्णय घेऊ शकला असता. पण ओमर अब्दुल्ला यांनी ज्या पद्धतीने आम्हाला विश्वासात न घेता निर्णय जाहीर केला आणि पीडीपीकडे कार्यकर्ते आणि पाठिंबा नसल्याचं सांगितलं. त्यामुळे त्यांच्यासाठी आता आम्ही एकही जागा सोडणार नाही. यामुळे माझे कार्यकर्ते दुखावले गेल्याचेही मेहबुबा मुफ्ती यांनी सांगितले.
नॅशनल कॉन्फरन्स काश्मीर खोऱ्यातील तिन्ही जागा लढवणार
मेहबूबा मुफ्ती यांनी ओमर अब्दुल्ला यांच्या ८ मार्च २०२४ च्या पत्रकार परिषदेचा संदर्भ देत नाराजी व्यक्त केली. नॅशनल कॉन्फरन्स काश्मीर खोऱ्यातील तिन्ही जागा लढवेल आणि त्यांचा मित्रपक्ष पीडीपीसाठी एकही जागा सोडणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले होते. ओमर ज्या पद्धतीने बोलले ते अत्यंत निराशाजनक होते, हा माझा नव्हे तर माझ्या कार्यकर्त्यांचा अपमान होता. मग मी माझ्या कार्यकर्त्यांना नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा देण्यास कसे सांगू?’ असाही मेहबुबा मुफ्ती यांनी प्रश्न उपस्थित केला. आम्ही उमेदवार देऊ आणि सर्वकाही जनतेवर सोडू. संसदेत कोणाचा आवाज हवा हे जनता ठरवेल, असंही त्या म्हणाल्यात. मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्यावर ओमर अब्दुल्ला संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ओमर अब्दुल्ला म्हणाले की, आम्ही आघाडीसाठी दरवाजा उघडे ठेवले आहेत, त्यांनी तो बंद केला असेल तर त्यात आमची चूक नाही. नॅशनल कॉन्फरन्सने सलोखा आणि ऐक्यासाठी दरवाजे नेहमीच खुले ठेवले आहेत. पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी सर्व ५ जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली असेल तर तो त्यांचा निर्णय आहे. त्यांच्या फॉर्म्युल्याच्या आधारे आम्ही काश्मीरमधील ३ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. जर त्या स्वतःचे उमेदवार उभे करणार असतील तर कदाचित त्यांना विधानसभा निवडणुकीतही युती नको आहे. मेहबुबा मुफ्ती यांच्या निर्णयावरून पीडीपीला विधानसभा निवडणुकीतही आमच्याची आघाडी करायची नाही, असे दिसत असल्याचंही ओमर अब्दु्ला म्हणालेत.
लोकसभा निवडणुकीत पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स एकमेकांसमोर उभे ठाकणार
गेल्या लोकसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने जिंकलेल्या मतदारसंघातून आम्ही उमेदवार उभे केले आहेत. बुधवारी नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर आता दोन्ही बाजूंनी निवडणुकीत एकमेकांसमोर उभे राहण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. भाजपाशी एकदिलाने लढण्याचा दावा करणारे नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी लोकसभा निवडणुकीत एकमेकांशी थेट लढणार आहेत. नॅशनल कॉन्फरन्सने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खोऱ्यातील तिन्ही जागा जिंकल्या होत्या, तर पीडीपीने २०१४ मध्ये २८ विधानसभा जागा जिंकून पूर्वीच्या जम्मू-काश्मीर राज्याच्या ८७ सदस्यीय संख्येच्या सभागृहात सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला होता. विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही जागावाटपाचा पर्याय खुला ठेवू इच्छित आहोत, असंही ओमर अब्दुल्ला म्हणालेत. तिरंगी लढतीमुळे बारामुल्ला जिंकण्यासाठी पीपल्स कॉन्फरन्सच्या सज्जाद लोन यांना फायदा मिळू शकतो, तर अनंतनाग-राजौरीमध्ये भाजपाचा पाठिंबा असलेल्या उमेदवारालाही विजयाची आशा आहे.