भंडारा : भंडारा जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात बंडखोरांची संख्या मोठी असल्याने अधिकृत उमेदवारांची अडचण वाढली आहे. बंडखोरांनी उमेदवारी मागे घ्यावी म्हणून त्यांची मनधरणी करण्यात येत आहे.
भंडारा विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून शिंदे शिवसेनेचे विद्यमान आमदार नरेंद्र भोंडेकर, महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या पूजा ठवकर यांच्यासह ठाकरे गटाचे नरेंद्र पहाडे, नितीन तुमाने, दीपक गजभिये, प्रेमसागर गणवीर, आशिष गोंडाणे, अरविंद भालाधरे, चेतक डोंगरे यांनी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष उमेदवारी दाखल केली.बंडखोरीचा उद्रेक तुमसर विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
आणखी वाचा-आर्वीत राजकीय भूकंप, भाजप बंडखोर दादाराव केचे यांना महाराष्ट्राबाहेर हलविले
राष्ट्रवादीने ( शरद पवार) चरण वाघमारे यांना उमेदवारी मिळाल्याने महाविकास आघाडीतील नाराज झालेल्या गटाने बंडखोरी केली. माजी आमदार अनिल बावनकर, ठाकचंद मुंगुसमारे यांनी अर्ज दाखल केले. साकोलीचे माजी आमदार सेवक वाघाये यांनी तुमसरातून उमेदवारी दाखल केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
आणखी वाचा-भाजप आणि एमआयएम ‘बटेंगे तो कटेंगे’ म्हणत प्रचारात समानपातळीवर
साकोलीमध्ये ऐनवेळी पक्षात आलेले अविनाश ब्राम्हणकर यांना भाजपकडून उमेदवारी दिल्याने भाजपचा एक गट नाराज आहे. त्यामुळे भाजपचे डॉ. सोमदत्त करंजेकर, भाजपचे माजी आमदार बाळा काशिवार यांनी अपक्ष नामांकन दाखल केले आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महायुतीचे अविनाश ब्राम्हणकर आणि अपक्ष अशा तिरंगी लढतीचे चित्र आहे.तथापि, तिन्ही मतदारसंघात बंडखोरी झाल्याने त्याचा फटका पक्षीय उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंडखोराना शांत करण्यासाठी त्यांची मनधरणी करावी लागणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत किती उमेदवार अर्ज मागे घेतात, यावर पुढील राजकीय समीकरण अवलंबून राहणार आहे.