यवतमाळ : शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या दिग्रस मतदारसंघातून शिवसेनेकडून (शिंदे) विद्यामान मंत्री संजय राठोड पुन्हा रिंगणात असून त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांना मैदानात उतरवले आहे. दोन्ही उमेदवार तुल्यबळ असल्याने ही लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे.
२००४ मध्ये संजय राठोड यांनी दारव्हा मतदारसंघातून काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला होता. आता २० वर्षांनंतर संजय राठोड आणि माणिकराव ठाकरे यांच्यात थेट लढत होत आहे. २००९ मध्ये पुनर्रचनेत दारव्हा बाद होऊन दिग्रस मतदारसंघ अस्तित्वात आला. तेव्हापासून येथे शिवसेनेचे संजय राठोड हे निवडून येत आहेत. यावेळी ते पाचव्यांदा निवडणूक लढवीत आहेत. दिग्रस हा बंजाराबहुल मतदारसंघ आहे. बंजारा समाजाची येथे ९० हजारांवर मते आहेत. कुणबी समाजाची मतदारसंख्या ४० ते ४५ हजार आहे. याशिवाय आदिवासी, मुस्लीम, बौद्ध व ओबीसी समाजाची प्रत्येकी २० ते ३० हजार असे तीन लाख ४३ हजार मतदार आहेत.
यावेळी महाविकास आघाडीने ही जागा आधी शिवसेना ठाकरे गटाला दिली होती. या पक्षाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर एकतर्फी लढत होईल, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र १२ तासांतच महाविकास आघाडीने उमेदवार बदलवून येथे काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या उमेदवारीमुळे लढत चुरशीची होणार आहे. माणिकराव ठाकरे यांची मदार कुणबी समाजासह मतदारसंघातील मुस्लीम, बौद्ध, ओबीसी समाजाच्या मतांवर आहे, तर बंजारा समाज पाठीशी असल्याचा संजय राठोड यांचा दावा आहे.
हेही वाचा >>> रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
लोकसभा निवडणुकीत यवतमाळ-वाशिम मतदारसंघात समाविष्ट होणाऱ्या दिग्रस मतदारसंघात (ठाकरे) खासदार संजय देशमुख यांना आघाडी मिळाली होती. यामुळेच माणिकराव ठाकरे यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. बंजारा समाजाच्या मतांवर राठोड यांचे भवितव्य अवलंबून आहे.
लोकसभेतील राजकीय चित्र
● महाविकास आघाडी : १,०६,१८७
● महायुती : ९७,५२
निर्णायक मुद्दे
● एका युवतीच्या आत्महत्येप्रकरणी संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यातून त्यांच्या राजकीय प्रतिमेला मोठा धक्का बसला होता. महायुतीचे सरकार आल्यावर त्यांचे राजकीय पुनर्वसन झाले. पण राठोड यांना हे प्रकरण कितपत भोवते यावरही त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.
● २००४ मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यापासून ठाकरे मतदारसंघात सक्रिय नाहीत. मात्र तरी त्यांचा काँग्रेस पक्षात वाढलेला सन्मान, संयमी नेतृत्व आणि ते २० वर्षांनंतर निवडणूक लढवीत असल्याने त्यांच्याबाबत सहानुभूती निर्माण करणारे घटक आहेत.
© The Indian Express (P) Ltd