सुहास सरदेशमुख
औरंगाबाद : शिवसेना कधीही भाजपबरोबर जाईल, या मतदारांच्या मनातील शक्यतेला खतपाणी घालत राजकारण करणाऱ्या ‘एमआयएम’ची शिवसेनेच्या नव्या भाजपविरोधी भूमिकांमुळे कोंडी झाली आहे. भाजपला विरोध करण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आता आघाडीवर असल्याने शिवसेनेबरोबर सौम्य वागावे तर अडचण आणि शिवसेना विरोधी आघाडी उघडली तर अडचणीत भर अशा स्थितीत एमआयएम सापडली आहे.
हेही वाचा… राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेला कर्नाटकात भाजपाचे ‘जन संकल्प’ यात्रेने उत्तर
या अनुषंगाने ‘लोकसत्ता’शी बोलताना खासदार इम्तियाज जलील म्हणाले, ‘जाती-धर्मात तेढ निर्माण करून राज्यकर्ते पदी आपणच रहावे यासाठी वाट्टेल ते करणारा भाजप देशासाठी घातकच. त्यामुळे भाजपला विरोध करत शिवसेना जर पुढची पायरी ओलांडत असेल तर त्यांच्या बाबतीत काहीशी सौम्य भूमिका घेता येऊ शकेल. पण ते ज्या पद्धतीने आतापर्यंत वागले आहेत, त्याला माफ कसे करता येईल. कोण अधिक वाईट अशी स्पर्धा कशी करता येईल. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने कधी लोकांच्या मुद्याला हात घातला नाही की त्यांच्या समस्येवर सत्ता असताना उपाययोजना केली नाही. आता ते भाजपला विरोध करताहेत म्हणून त्यांच्याविषयी थोडी आपुलकी वाटेलही. जेथे एमआयएमचा उमेदवार नसेल अशा काही वाॅर्डात मुस्लीम माणूस शिवसेनेला मतदानही करेल, पण याचा अर्थ राजकीय पटलावर त्यांच्याबरोबर सौम्य व्यवहार ठेवता येणार नाही.’
हेही वाचा… पन्हाळा विधानसभा जिंकण्याच्या अजित पवार यांच्या ध्येयासमोर आघाडीच्या एकजिनसीपणाचे आव्हान
खरे तर सर्वसामांन्याच्या मुद्दयाला हात घातला असता तर असे पक्षाचे नाव आणि पक्षाचे चिन्ह गमावण्याची वेळ शिवसेनेवर आली नसती. त्यांनी आतापर्यंत भावनिक राजकारणच केले. त्यामुळे त्यांचे राजकीय पटलावर नुकसानही झाले. पण देशासाठी सध्या सत्ताधारी भाजपच अधिक घातक आहे. त्यामुळे त्यांना विरोध करणाऱ्या क्रमांक दोनच्या पक्षाबरोबर काहीसे सौम्य रहायला हवे हे खरे, पण तसे करता येणे सध्या अवघड दिसत असल्याचे खासदार जलील यांनी सांगितले.
हेही वाचा… पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की टीकाकारांचे?
शिवसेनेतील फूट, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ बांधणीसाठी सुरू झालेली तयारी लक्षात घेता लोकसभा निवडणुकांमध्ये दलित मते निर्णायक ठरतील असे चित्रही निर्माण होत आहे. भाजप व सेनेचे उमेदवार लोकसभा निवडणुकीत उतरले तर हिंदुत्ववादी मतांमध्ये विभाजन होईल् आणि मुस्लीम मते एकगठ्ठा राहतील असे राजकीय कयास बांधले जात आहेत. ज्या मतांच्या आधारे ‘एमआयएम’चा विजय झाला त्या वंचित बहुजन आघाडीची मते या वेळी कोणत्या बाजूने कलतील यावर निकालाची गणिते ठरतील. त्यामुळे आतापासून दलित उमेदवारांचा शोध ‘एमआयएम’सह अन्य पक्षही घेत आहेत. सध्या ‘ नाम भी मिट गया और निशान भी’ अशा अवस्थेत अडकलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाशी सौम्य वागणे तसे अवघड आहे, पण भाजपची पकड लक्षात घेता ही भूमिका लवचीकपणे हाताळावी लागेल, अशी एमआयएमची रणनीती दिसून येत आहे.