जयेश सामंत
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाकडून आणि त्यातही अर्थमंत्री असलेले अजित पवार यांच्याकडून निधी वाटपात सातत्याने अन्याय होत असल्याची ओरड करत थेट बंडाचा झेंडा उगारणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची रविवारी घडलेल्या नव्या राजकीय घडामोडींमुळे कोंडी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागेल या आशेवर असणाऱ्या शिंदे गटातील आमदार सत्तेत तिसरा वाटेकरी आल्याने अस्वस्थ असल्याच्या चर्चेने आता जोर धरला असून स्थानिक राजकारणातही राष्ट्रवादीतून सत्तेत सहभागी झालेल्या आमदारांच्या स्पर्धेला शिंदे गटाला तोंड द्यावे लागणार आहे.
वर्षभरापुर्वी राज्यात सत्ता बदल होताच बराचसा काळ मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नव्हता. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमध्येच सर्व विभागांचा कारभार वाटला गेला होता. बराच कालावधी लोटल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला खरा मात्र मंत्रीपदाची संधी हुकल्याने शिंदे गटातील काही आमदारांमध्ये नाराजीचा सुर दिसून येत होता. या नाराज आमदारांची इतर कामे युद्धपातळीवर मार्गी लावत ही नाराजी काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून केला गेला. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर मंत्री मंडळ विस्ताराचे वारे वाहू लागताच पुन्हा एकदा शिंदे गटातील आमदारांमध्ये रस्सीखेच सुरु झाल्याचे चित्र होते. मात्र अजित पवार यांच्या माध्यमातून राज्यातील सत्तेत तिसरा वाटेकरी आल्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता वाढीस लागल्याची चर्चा असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे काही आमदारांनी ही नाराजी व्यक्त केल्याचे सुत्रांनी सांगितले.
हेही वाचा… भाजपबरोबर गेलेले चार नेते ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात
हेही वाचा… दादानिष्ठ असल्यानेच संजय बनसोडेंना पुन्हा मंत्रिपद
अन्यायकर्ते दादाच आता नेतेपदी
महाविकास आघाडी सरकारला सोडचिठ्ठी देत असताना शिंदे गटातील बहुतांश आमदारांनी बंडाचे खापर राष्ट्रवादी काॅग्रेस पक्ष आणि पर्यायाने अजितदादा यांच्यावर फोडले होते. सत्तेचा सर्वाधिक फायदा राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाला होत असून अर्थखात्याच्या माध्यमातून अजित पवार त्यांच्या पक्षाच्या आमदार तसेच पदाधिकाऱ्यांना निधीची रसद पुरवित असल्याची ओरड बंडखोर आमदारांकडून केली गेली होती. राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या गृह आणि अर्थ या दोन महत्वाच्या खात्यामधून शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्न होत होता असा आरोप खुद्द एकनाथ शिंदे यांनीही केला होता. या पार्श्वभूमीवर अजित पवार हेच सत्तेत सहभागी झाल्याने शिंदे गटाची मोठी कोंडी झाली. विशेष म्हणजे, राज्यातील वेगवेगळ्या भागात शिंदे गटाच्या आमदार तसेच इच्छुकांचे स्पर्धक हे राष्ट्रवादीचे आजी-माजी आमदार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यास लागूनच असलेल्या रायगड जिल्ह्यात शिंदे गटाचे तिनही आमदार हे अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेले सुनील तटकरे यांचे विरोधक मानले जातात. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळावे यासाठी शिंदे समर्थक आमदार भरत गोगावले गेले वर्षभर प्रयत्न करताना दिसतात. तटकरे यांच्या निकटवर्तीय अधिकाऱ्यांच्या बदलीचे सत्रही गोगावले यांनी सुरु केले होते. असे असताना तटकरे यांच्या कन्या आदिती यांची पुन्हा मंत्री मंडळात वर्णी लागल्याने गोगावले यांच्यासारख्यांची मोठी होणार आहे. असाच प्रकार राज्यातील इतर भागातही होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे याबद्दलची नाराजी काही आमदारांनी शिंदे यांच्याकडे व्यक्त केल्याचे समजते.