मोहन अटाळकर
सत्तेत सहभागी असूनही अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांची सामान्य लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना चांगलीच कोंडी होत असल्याचे चित्र आहे. काल-परवा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ‘भाऊ, तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहात, मात्र या गद्दारांसोबत तुम्ही जायला नको होते’, अशा स्पष्ट शब्दात बच्चू कडू यांनी घेतलेल्या भूमिकेला विरोध दर्शवला. दुसरीकडे, मंत्रिपदापासून ते वंचित असल्याने त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्तेही नाराज आहेत.
हेही वाचा >>>उत्तर प्रदेश पालिका निवडणुका : घरपट्टी अर्ध्यावर तर पाणीपट्टी माफ करण्याचे ‘आप’चे आश्वासन
आमची पानटपरी स्वत:ची आहे. आम्हाला काँग्रेस, भाजपने निवडून दिलेले नाही. आम्हाला सामान्य माणसांनी निवडून दिले आहे. बच्चू कडूंची गद्दारी पक्षाशी होऊ शकते, सामान्य जनतेबरोबर होऊ शकत नाही, असे स्पष्टीकरण बच्चू कडू यांनी दिले असले, तरी गेल्या काही वर्षांत त्यांच्या लढाऊ नेता या प्रतिमेला धक्का पोहचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
बच्चू कडू यांच्या आंदोलनांची वेगळी शैली असो किंवा अनेक सरकारी अधिकाऱ्यांसोबत दाखवलेला आक्रमकपणा, बच्चू कडू हे सातत्याने चर्चेत असतात. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते राज्यमंत्री होते. उद्धव ठाकरे यांच्या निकटचे ते मानले जात होते, पण सत्तांतराच्या वेळी बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी घेतलेल्या या भूमिकेविषयी अजूनही त्यांना थेट प्रश्न केले जात आहेत. बच्चू कडूंचे हे वागणे अनेकांना पटलेले नाही, असे प्रतिक्रियांमधून दिसून येत असले, तरी स्वत: कडू यांनी विकासाच्या प्रश्नावर आपण जनतेच्या बाजूने आहोत, असे सांगून या भूमिकेचे समर्थनच केले आहे.
हेही वाचा >>>योग, क्रीडा महोत्सवातूनही भाजपची बांधणी
बच्चू कडू यांच्या पाठपुराव्यामुळे राज्यात दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला खरा, पण अजूनही कडू हे मंत्रिपदाच्या प्रतीक्षेतच आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्तेही अस्वस्थ आहेत. विरोधी पक्षात असताना सरकारच्या विरोधात आंदोलने करून लोकांचे लक्ष वेधता येते, प्रश्न मांडता येतात. पण, आता सरकारमध्ये असल्याने आक्रमकतेला आवर घालावा लागतो, अशी खंत कार्यकर्ते व्यक्त करताना दिसतात.
प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडूंसहित दोन आमदार आहेत. पक्षसंघटना वाढावी, पक्षाचा राज्याचा विस्तार व्हावा, यासाठी त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते प्रयत्न करताना दिसत आहेत. बच्चू कडू यांनी यापूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अनेक आंदोलने केली. सरकारी अधिकाऱ्यांच्या अंगावरही ते धावून गेले. त्यामुळे वादग्रस्तही ठरले. पण, आता शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने त्यांच्या पक्षाचे कार्यकर्तेही हतबलता व्यक्त करीत आहेत.