जयेश सामंत-भगवान मंडलिक
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राज्यातील महायुती सरकारमधील प्रमुख नेत्यांचा वरचेवर संवाद होताना नेहमीच दिसतो. राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सुत्र एकनाथ शिंदे यांच्याकडे येताच राज यांचे वेगवेगळ्या कार्यक्रमानिमीत्त वर्षा निवासस्थानी जाणेही वाढले. मुख्यमंत्री शिंदेही वरचेवर कृष्णकुंजच्या फेऱ्या मारु लागले. एकीकडे राज आणि सत्तेतील नेत्यांमधील संवादाचा नाव सेतू तयार होत असताना ठाणे, कल्याणात मात्र मुख्यमंत्र्यांचे खासदार पुत्र डाॅ.श्रीकांत यांच्याकडून मनसे नेत्यांची कोंडी होऊ लागल्याने येथील पक्षाची अवस्था सांगता ही येत नाही आणि सहनही होत नाही अशी झाली आहे.
काही दिवसांपुर्वीच कल्याणचे खासदार डाॅ.श्रीकांत यांनी कल्याण डोंबिवलीतील मनसेला खिंडार पाडले. राज्यातील पक्षाचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या अनेक निष्ठावंतांना खासदारांनी गळाला लावले. राज्यात मैत्रीच्या कितीही आणाभाका घेतल्या जात असल्या तरी कल्याणात भाजप आणि मुख्यमंत्र्यांच्या गटातील नेत्यांमध्ये फारसे सख्य नाही. भाजपने नेते खासगीत अनेकदा बंडाची भाषा बोलताना दिसतात. लोकसभा निवडणुका जवळ आल्याने शिंदे गटाने गेल्या काही दिवसांपासून स्थानिक भाजप नेत्यांशी जुळवून घेतले आहे. डोंबिवलीतील पक्षाचे नेते, मंत्री रविंद्र चव्हाण यांचे रखडलेले काही प्रकल्पही मुख्यमंत्र्यांनी मार्गी लावण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा >>> बंजारा समाजाला खुश करण्यावर सत्ताधाऱ्यांचा भर
काहीही झाले तरी भाजपला दुखावायचे नाही अशी भूमीका शिंदे पिता पुत्रांकडून घेतली जात आहे. एकीकडे दुखावलेल्या भाजपला जवळ करण्याचे प्य्त्न शिंदे गटाकडून होत असताना दुसरीकडे डोंबिवली आणि आसपासच्या पट्टयात बऱ्यापैकी ताकद राखून असलेल्या मनसेला मात्र धक्का देण्याचे तंत्र खासदार शिंदे यांनी सुरु केले आहे. मुंबईत राज ठाकरे यांची ताकद वाढविण्यासाठी सरकारी यंत्रणांकडूनच प्रयत्न केले जात असताना कल्याण डोंबिवली आणि काही प्रमाणात ठाण्यात मनसेच्या नेत्यांची कोंडी करण्याचे पद्धतशीर प्रयत्न केले जात असल्याने पक्षात संभ्रम वाढला आहे.
हेही वाचा >>> सोलापुरात पक्ष वाढीसाठी शरद पवार गट प्रयत्नशील
राजू पाटील एकाकी ?
राज्यात सत्ताबदल झाल्यानंतरही मनसेचे कल्याण ग्रामीण पट्टयाचे आमदार राजू पाटील मुख्यमंत्री शिंदे पिता-पुत्रांवर विविध माध्यमांतून टीकेचे आसूड ओढताना दिसत आहेत. खासदार शिंदे यांच्यावर टिका करण्याची एकही संधी राजू पाटील सोडत नाहीत. राज्यात सत्ताधारी शिवसेना-भाजपचे नेते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीगाठी घेतात. बंद दरवाज्याआड त्यांच्यासोबत चर्चा करतात. महत्वाच्या विषयांवर राज्याचे मंत्री थेट कृष्णकुंजची पायरी चढतात.
हेही वाचा >>> सांगलीत ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये चुरस
मनसेच्या राज्यातील एकमेव आमदाराचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या पक्षाकडूनच फोडले जातात. यामुळे स्थानिक पातळीवर या दोन्ही पक्षातील तणाव आणखी वाढू लागला आहे. मध्यंतरी मनसेच्या काही स्थानिक नेत्यांनी आमदार पाटील लोकसभेची निवडणूक लढवू शकतात, असे विधान केले. त्यापाठोपाठ पाटीलही उल्हासनगर, अंबरनाथपर्यंत संचार करु लागले. त्यानंतर या दोन पक्षातील विसंवाद टोकाला पोहचू लागला असून पाटील यांचेच कार्यकर्ते फोडून खासदार शिंदे यांनी आतापासूनच आपल्या आव्हानवीराला आस्मान दाखविणे सुरु केल्याची चर्चा रंगली आहे.
शिंदेचा प्रतिस्पर्धी कोण ?
कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार शिंदे यांच्या विरोधात कुणाला उभे करायचे यावरुन विरोधकांमध्ये संभ्रम आहे. महाविकास आघाडीत ही जागा उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला जाण्याची शक्यता अधिक असल्याने येथून पक्षाचे माजी आमदार सुभाष भोईर यांचे नाव मध्यंतरी लोकसभेसाठी चर्चेत आणले जात होते. मात्र शिंदे यांच्या फुटीनंतरच्या काळात सक्रिय दिसलेले भोईर गेल्या काही काळापासून पुन्हा विजनवासात गेल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर मनसे आमदार राजू पाटील यांचे संपूर्ण लोकसभा मतदारसंघात दौरे वाढल्याने शिंदे यांना ते आव्हानवीर ठरु शकतात का अशी चर्चाही मध्यंतरी रंगली होती. राज आणि सत्तेतील नेत्यांमधील सुसंवाद वाढत असताना कल्याणात राजू पाटील आक्रमकपणे शिंदे यांच्याविरोधात उभे ठाकल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांचे कार्यकर्ते गळाला लावण्याची रणनिती शिंदे गोटातून आखली जात असून मनसेतील संभ्रम यामुळे टोकाला पोहचला आहे.