अलिबाग – स्नेहल जगताप यांच्या शिवसेना ठाकरे गटात प्रवेशानंतर रायगड जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमधील संबध ताणले गेले आहेत. महाड मतदारसंघावरील दावा सोडणार नसल्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे. काँग्रेसने घेतलेल्या या भूमिकेमुळे स्नेहल जगताप यांची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाडच्या काँग्रेस नेत्या स्नेहल जगताप यांनी ६ मे रोजी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांच्या समवेत मतदारसंघातील पदाधिकारी ठाकरे गटात सहभागी झाले. हा पक्षप्रवेश काँग्रेसच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. स्नेहल जगताप यांच्या पक्षप्रवेशानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांना कमकुवत करण्याचे शिवसेना ठाकरे गटाचे धोरण योग्य नसल्याचे म्हटले होते. याबाबत जाहीर नाराजी त्यांनी व्यक्त केली होती.

हेही वाचा – डी. के. शिवकुमार की सिद्धरामय्या? कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कोण? जाणून घ्या कोणाचे पारडे जड

आता कुठल्याही परिस्थितीत महाड मतदारसंघावरील दावा काँग्रेस सोडणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. स्नेहल जगताप यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला असला तरी या जागेवरचा काँग्रेसने दावा सोडलेला नाही, ही जागा आम्हीच लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे स्नेहल जगताप यांची कोंडी होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. स्नेहल जगताप यांनी शिवसेनेत जाऊ नये यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले होते. मात्र तरीही त्यांनी पक्षादेश धुडकावत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस दुखावली आहे. आता स्नेहल जगताप यांची मतदारसंघात कोंडी करण्याचे धोरण पक्षाने स्वीकारल्याचे दिसून येत आहे.

नाना पटोले यांच्या निर्देशानुसार स्नेहल जगताप यांना प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पदावरून निलंबित करण्यात आले असून, महाड तालुका काँग्रेस कमिटीही बरखास्त करण्यात येत असल्याचे आदेश प्रदेश सरचिटणीसांनी जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांना दिले आहेत. काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेमुळे स्नेहल जगताप यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर तोडगा निघणार का हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

स्नेहल जगताप यांनी शिवसेना सोडण्यामागचे कारण

काँग्रेस सातत्याने या मतदारसंघातून निवडणूक लढवत आली आहे. शिवसेना आणि काँग्रेस हे मतदारसंघातील एकमेकांचे विरोधक राहिले आहेत. या मतदारसंघातून सलग तीन वेळा काँग्रेसने माणिक जगताप यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली आहे. मात्र त्यांना हा मतदारसंघ जिंकता आला नाही. प्रत्येक वेळी शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी त्यांचा पराभव केला आहे. शिवसेना हा काँग्रेसचा पारंपारिक विरोधी पक्ष असल्याने काँग्रेसने मतदारसंघातून निवडूक लढविल्यास शिवसेनेची मते काँग्रेस उमेदवाराला पडणार नाही, अशी धास्ती स्नेहल जगताप यांना होती. पण शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून निवडणूक लढविल्यास काँग्रेस आणि शिवसेना दोन्ही पक्षांची मतं मिळवणे शक्य होणार आहे.

हेही वाचा – एक माजी IAS अधिकारी कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयाचा शिल्पकार! पडद्यामागे राहूण रणनीती ठरवणारे शशिकांत सेंथिल कोण आहेत?

ठाकरे गटाकडून भरत गोगावले यांना रोखण्यासाठी जगतापांचा वापर

शिवसेना हा त्यांच्या प्रमुख विरोधी पक्ष राहिला आहे. महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर मतदारसंघातील राजकीय समिकरणेच बदलून गेली आहेत. भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाची मतदारसंघात मोठी अडचण झाली होती. पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ठाकरे गटाला मतदारसंघाची नव्याने बांधणी करणे गरजेचे होते. अशावेळी भरत गोगावले यांना पर्याय ठरू शकतील असा चेहरा त्यांना हवा होता. ही बाब लक्षात घेऊन स्नेहल जगताप यांना ठाकरे गटाने आपल्या पक्षात घेतले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dilemma of snehal jagtap who joined shiv sena due to congress stance print politics news ssb
Show comments