एजाज हुसेन मुजावर
शिवसेनेत मोठी फूट आणि सत्तांतर झाल्यानंतर बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर व जिल्ह्यातील काही आयाराम-गयारामांची चांगलीच कोंडी झाली आहे. एकीकडे भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेप्रणित शिवसेनेच्या आक्रमक चाली दिसून येत असताना स्वतःची ताकद वाढविण्यासाठी हालचाली करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या शांतता दिसून येते. माजी महापौर महेश कोठे आणि पूर्वाश्रमीचे बसपा आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते आनंद चंदनशिवे यांची राजकीय भूमिका गुलदस्त्यात असताना शिवसेनेचे माजी आमदार दिलीप ब्रह्मदेव माने यांची भूमिका ‘एकला चलो रे ‘ ची असल्याचे दिसून येते.
कोठे, माने आणि चंदनशिवे हे तिघेही राज्यातील सत्तांतरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर होते. परंतु सत्तातंरानंतर राष्ट्रवादीचे वलय लगेचच संपुष्टात आले आणि या पक्षात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांनी तोंडे फिरविली. सोलापूर शहरात आगामी महापालिका निवडणूक जिंकून देण्याची जबाबदारी महेश कोठे यांच्यावर दस्तुरखुद्द पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच सोपविली होती. कोठे यांनी माजी महापौर ॲड. यू. एन. बेरिया, नलिनी चंदेले, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल तसेच एमआयएमचे असूनही कोठे यांच्याशी मधूर संबंध जपलेले तौफिक शेख आदी मंडळी यापूर्वीच राष्ट्रवादीत आणली. त्यातून राष्ट्रवादीत कोठे यांचा प्रभाव सिध्द होत असताना प्रत्यक्षात कोठे यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादीचे मंगळसूत्र स्वतःच्या गळ्यात बांधण्याचे टाळले. आता तर त्यांनी भूमिकाच बदलल्यामुळे शहरात राष्ट्रवादी जमिनीवर आली आहे.
हेही वाचा… दापोलीत शिंदे गटाच्या मेळाव्यात भाजप पदाधिकाऱ्यांना व्यासपीठावर स्थान
पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आणि गेली सात-आठ वर्षे शिवसेनेत राहिलेले माजी आमदार दिलीप माने हे राष्ट्रवादीच्या संपर्कात होते. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्तही ठरविला जात होता. परंतु बदलत्या राजकीय परिस्थितीत त्यांनीही नवीन राजकीय भूमिका चाचपण्याची मानसिकता जपली आहे. मुख्यमंत्री शिंदे गटात त्यांच्या प्रवेशाची चर्चा होत असली तरी त्यादृष्टीने हालचाली दिसून येत नाहीत. सद्यस्थितीत दिलीप माने हे ठाकरेप्रणित शिवसेना आणि राष्ट्रवादीच्याही संपर्क क्षेत्राबाहेर दिसून येतात. शिंदे गटात जाण्याच्या हालचालीही दिसत नाहीत.
हेही वाचा… सभासद नोंदणीवरून राष्ट्रवादीच्या निरीक्षकांना प्रदेशाध्यक्षांच्या कानपिचक्या
याच पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणूक दक्षिण सोलापूर मतदारसंघातून लढविण्याची पूर्वतयारी मात्र त्यांनी आतापासूनच सुरू केल्याचे स्पष्ट दिसून येते.
दिलीप माने हे मूळचे उत्तर सोलापूर तालुक्याचे दबदबा असलेले नेते आहेत. त्यांचे वडील माजी आमदार ब्रह्मदेव माने तर १९६७ साली स्वबळावर काँग्रेसच्या विरोधात बंडखोरी करून तत्कालीन उत्तर सोलापूर मतदारसंघातून विधानसभा वर दे निवडून आले होते. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तालुका खरेदी-विक्री संघ, यशवंत सहकारी कामगार बँक, शिक्षण प्रसारक मंडळ आदी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी स्थानिक राजकारण, समाजकारणावर पकड निर्माण केली होती. त्यांचा स्वभाव मुळातच बंडखोरीचा आणि स्पष्टपणाचा होता. त्यामुळे त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याशी प्रसंगी दोन हात केले होते. तोच कित्ता पुत्र दिलीप माने यांनीही गिरवला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा मजूर संस्था फेडरेशन, सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीसह ब्रह्मदेव माने सहकारी बँक, दोन साखर कारखाने, अभियांत्रिकी महाविद्यालयासह मोठे शैक्षणिक संकुल अशा स्वरूपात त्यांनी वडिलांचा वारसा तेवढ्याच जोमाने चालविला आहे. २००४ साली त्यांनी सर्वप्रथम तत्कालीन सोलापूर शहर दक्षिण विधानसभा निवडणूक काँग्रेसच्या विरोधात बंडखोरी करून लढविली होती. त्यानंतर पुढे २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत ते मतदारसंघ बदलून शेजारच्या दक्षिण सोलापूर मतदारसंघातून काँग्रेसतर्फे उभे राहिले आणि आमदार झाले होते. मात्र पुढे २०१४ सालच्या विधानसभा लढतीत मोदी लाटेत भाजपचे माजी सहकारमंत्री, आमदार सुभाष देशमुख यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर माने यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश करून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनाच थेट आव्हान दिले होते. परंतु त्यांना यश आले नाही. काँग्रेसमध्ये असताना दिलीप माने यांचे राजकीय गॉडफादर दिवंगत नेते डॉ. पतंगराव कदम होते.
हेही वाचा… काश्मीरमध्ये काँग्रेसचा भाजपाला धक्का; लेह-लडाखमधील पोटनिवडणुकीत मोठा विजय
सद्यस्थितीत कोणती राजकीय भूमिका घ्यायची, याचे कोडे असले तरी त्यात सोयीचे काही पदरात पडले तर ठीकच, पण ते गैरसोयीचे ठरल्यास प्रसंगी स्वबळावर अपक्ष म्हणून दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणूक लढविण्याची पूर्वतयारी माने यांनी आतापासूनच चालविली आहे. त्यादृष्टीने दक्षिण सोलापुरात काही गावांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे होण्यासाठी माने यांनी बाधित शेतकऱ्यांसोबत आंदोलन केले आहे. याशिवाय याच मतदारसंघातील शहरी भागात भेडसावणा-या विकासाच्या प्रश्नावरही त्यांनी सोलापूर महापालिकेत आंदोलन केले. गावा-गावांतून मतदारांचा कानोसा घेण्याच्या दृष्टीने सर्वेक्षणही सुरू केले आहे. या माध्यमातून त्यांनी जनसंपर्क वाढवून, कार्यकर्त्यांची फळी मजबूत करून आगामी विधानसभा निवडणुकीची साखर पेरणी सुरू केली आहे. दक्षिण सोलापूर मतदारसंघात भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांचे आव्हान पेलण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेनेची अपेक्षित ताकद दिसत नाही. देशमुख यांच्यासमोर पर्यायी नेतृत्व निर्माण करण्यात दिलीप माने हे खरोखर यशस्वी होतात का, हे नजिकच्या काळात दिसून येईल.