मोहन अटाळकर

वाडेगाव (जि. अकोला) : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये कन्‍याकुमारी पासून अनवाणी पायी चालत असलेले हरियाणातील काकडोद गावचे रहिवासी पंडित दिनेश शर्मा हे नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. डोक्‍यावर केशरी रंगाचा फेटा, पांढ-या रंगाचा कुर्ता आणि हिरवा पायजमा अशा वेशात ते तिरंगा उंचावत चालत असतात. त्‍यांच्‍या या कृतीचे सर्वांना आश्‍चर्यमिश्रित कुतूहल आहे. जोपर्यंत राहुल गांधी पंतप्रधान होणार नाहीत तोपर्यंत अनवाणीच राहण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

कॉंग्रेस पक्षाच्‍या प्रत्‍येक कार्यक्रमात दिनेश शर्मा हजर असतात. सहा महिन्‍यांपूर्वी झालेल्‍या कॉंग्रेसच्‍या उदयपूर येथील अधिवेशनात देखील ते पोहचले होते. आपण कॉंग्रेस पक्षासाठी सेवा देत आहोत. देशात सौहार्द कायम रहावा, जाती-धर्मांमध्‍ये भेद असू नये, असे आपल्‍याला वाटते. आपल्‍याला राहुल गांधी हे एका योद्धयासारखे वाटतात, असेही दिनेश शर्मा सांगतात.गेल्या १२ वर्षांपासून पूर्णपणे अनवाणी आहेत आणि तोपर्यंत अनवाणीच राहतील जोपर्यंत राहुल गांधी पंतप्रधान होणार नाहीत. राहुल गांधी जिथे जिथे प्रवासासाठी जातील, तिथे ते अनवाणी पोहचतील आणि त्यांच्यासोबत पायी यात्रेत सामील होतील. राहुल गांधी आगामी लोकसभा निवडणुकीत निश्चितपणे पंतप्रधान होतील, असा विश्‍वास ते व्‍यक्‍त करतात.

हेही वाचा: “…तर २०२४ ही माझी शेवटची निवडणूक ठरणार” ; चंद्रबाबू नायडूंचं मोठं विधान!

दिनेश शर्मा हे बीए., एलएलबी. झाले आहेत. ते राहुल गांधी यांचे कट्टर समर्थक आहेत. सर्वाधिक उंचीवर जाऊन तिरंगा फडकविण्‍याचा आपला मानस असल्‍याचे ते सांगतात. भारत जोडो यात्रा ही हिंदू, मुस्‍लीम, शिख, ख्रिश्‍चन, सर्व धर्मीयांना सोबत देणारी ही यात्रा आहे. आपण भारत यात्री म्‍हणून सहभागी झालेला एक कॉंग्रेसचा छोटा कार्यकर्ता आहे. २०२४ पर्यंत आपला संघर्ष सुरूच राहील, राहुल गांधी निश्चितपणे पंतप्रधान बनतील, असाही विश्‍वास दिनेश शर्मा व्‍यक्‍त करतात.

Story img Loader