नागपूर: लोकशाहीचा पुरस्कारकर्ता असल्याचा दावा करणारा भारतीय जनता पक्ष नागपुरात येत्या रविवारी होणा-या महाविकास आघाडीच्या जाहीर सभेच्या मार्गात जाणीवपूर्वक विघ्न निर्माण करण्याचे प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे सभेला विरोध करण्याच्या मुद्यावर भाजपमध्ये मतभेद उफाळून आले आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि शहर अध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांनी सभेला विरोध नाही, असे स्पष्ट केल्यावरही पक्षाचे आमदार कृष्णा खोपडे सभेविरूध्द आंदोलनात सहभागी झाले आहेत. एकूणच या प्रकरणात भाजपची स्थिती गोंधळात गोंधळ अशी झाली आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणा विरुद्ध राज्यातील सर्व महसूल विभागात सभा घेण्याच्या महाविकास आघाडीच्या निर्णयानुसार दुसरी सभा भाजप नेते गडकरी- फडणवीस यांच्या गृह जिल्ह्यात म्हणजे नागपुरात होत आहे. सभेसाठी पूर्व नागपुरातील दर्शन कॉलनीमधील नागपूर सुधार प्रन्यासचे मैदान निश्चित करण्यात आले. त्यासाठी रितसर परवानगी घेण्यात आली. इथपर्यंत भाजपचा या सभेला विरोध नव्हता. मात्र अचानक ज्या भागात ही सभा होत आहे त्या भागाचे ( पूर्व नागपूर) भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी सभेमुळे मैदान खराब होणार असल्याचा मुद्या पुढे करून सभेला विरोध सुरू केला. दुसऱ्याच दिवशी भाजप प्रदेशाध्यक्षांनी सभेला भाजपचा विरोध नसल्याचे स्पष्ट केल्यावर खोपडेंची कोंडी झाली. झाली. त्यामुळे खोपडे यांनी पक्षाच्या झेंड्याखाली आंदोलन न करता माजी नगरसेवकांच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना पुढे करून मैदान बचाव समितीच्या झेंड्याखाली आंदोलन सुरू केले.
हेही वाचा… बंडखोरी करणाऱ्या काँग्रेस आमदारांना भाजपची पुन्हा उमेदवारी
सभेला विरोध करण्यामागे खोपडेचे स्थानिक राजकारण कारणीभूत असल्याचे सांगितले जाते . मतदारसंघात होणाऱ्या सभेमुळे होणा-या वातावरण निर्मितीचा महाविकास आघाडीला फायदा होण्याची भीती खोपडे यांना आहे. या मतदारसंघात कॉंग्रेस आणि सेना (ठाकरे) या पक्षांची राजकीय ताकद आहे. सभेच्या निमित्ताने हे दोन्ही पक्ष सक्रिय झाल्यास त्याचा फटका भाजपला आगामी महापालिका, विधानसभा निवडणुकीत बसू शकतो, असे त्यांना वाटते. पण या मुद्यावर सध्या तरी ते पक्षात एकाकी पडले आहेत. एकही बडा नेता त्यांच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी पुढे आला नाही. त्यामुळेच त्यांनी आता न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
हेही वाचा… नगर भाजप संघटनेच्या कारभारात सुधारणा होणार का ?
जाणिवपूर्वक खोडे घालण्याचा प्रयत्न ?
लोकशाहीत सर्वच पक्षांना सभा घेण्याचा अधिकार आहे, मागच्या आठवड्यात भाजपने सावरकर गौरव यात्रेच्या निमित्ताने सभा घेतली. मात्र मविआच्या सभेत भाजपकडून जाणिवपूर्वक खोडा घालण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. भाजप ज्या मैदानाचा मुद्दा पुढे करीत आहे ते रितसर परवानगी घेऊन घेतले असताना व मैदान खराब होऊ नये अशी अट घातली असताना आता विरोध का ? हा प्रश्न उपस्थित होतो.
” महाविकास आघाडीच्या सभेमुळे मैदान खराब होईल अशी स्थानिक नागरिकांची भावना आहे व त्यांनीच आंदोलन सुरू केले आहे. नागपूर सुधार प्रन्यासने सभेसाठी दिलेल्या मैदानाची परवानगी रद्द केली नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ” – कृष्णा खोपडे, आमदार भाजप