वर्धा : वर्धा जिल्ह्यातील सातपैकी सहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सभापतीपदांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाले असले तरी वर्धा समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीत ऐनवेळी बिनसले आणि फसगत झाल्याची राष्ट्रवादीची भावना झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाविकास आघाडीत ठरल्यानुसार सभापतीपदांचे वाटप झाले. मात्र वर्धा बाजार समितीच्या सभापतीसाठी ऐनवेळी काँग्रेसने भूमिका बदलली. काँग्रेसचे आमदार रणजीत कांबळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांचे संयुक्त पॅनल निवडून आले. ठरल्यानुसार देशमुख गटास सभापतीपद तर कांबळे गटास उपसभापतीपद मिळणार होते. देवळी बाजार समितीत या सूत्रानुसार वाटप झाले. मात्र वर्धेत ऐनवेळी चक्रे फिरली. संचालकांचे बहुमत असणाऱ्या कांबळे गटाने सभापतीपद सोडण्यास स्पष्ट नकार दिला. वाटल्यास उपसभापतीपद देतो, असा सांगावा धाडला. मात्र फसवणूक झाल्याचे ऐन मतदानाच्या तासभरापूर्वी लक्षात आलेल्या देशमुख गटाने ही तडजोड नाकारली.

हेही वाचा – भाजपच्या पिंपरी शहराध्यक्ष पदाच्या निवडीचा पेच

देशमुख गटाचे डॉ. संदीप देशमुख यांची संधी हुकल्याने महाविकास आघाडीत अस्वस्थता पसरली. प्रचारादरम्यान आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत सभापतीपद देण्याचे मान्य करीत कांबळे गटाने संचालकांच्या अधिक जागा पदरात पाडून घेतल्या होत्या. त्यामुळे अध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळणार, हे स्पष्ट होते. पण तसे घडले नाही. कांबळेंच्या देवळी-पुलगाव मतदारसंघात जातीय ध्रुवीकरणातून मतदान होत असल्याचा इतिहास आहे. इथे कुणबी विरुद्ध तेली असे पारंपरिक राजकीय वैर आहे. कुणबी समाजाची एक गठ्ठा मते ज्येष्ठ नेत्या प्रभाताई राव यांच्या काळापासून काँग्रेसला मिळत आली आहेत. सलग निवडून येणाऱ्या प्रभा राव यांचे भाचे कांबळे हेसुद्धा याच समाजावर भिस्त ठेवून राजकारण करत असल्याचे लपून राहिलेले नाही.

देवळी-पुलगावचे सभापतीपद असो किंवा पक्षीय संघटनेतील पदे असोत कांबळे कुणाला कौल देतात हे जगजाहीर आहे. कांबळे समर्थक असलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर म्हणतात, वर्धा बाजार समितीत बहुमतातील संचालकांनी अध्यक्षपदाचा आग्रह धरल्याने नाईलाज झाला. धोका देण्याचा प्रश्नच नाही, असा दावा त्यांनी केला.

हेही वाचा – विरोधकांच्या गाठीभेटीनंतर नितीश कुमार, तेजस्वी यादव यांची आज काँग्रेससोबत बैठक; विरोधक पाटण्यात शक्तिप्रदर्शन करणार

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत सभापतीपद आमच्या गटाला देण्याचे निश्चित झाले होते. म्हणूनच त्यांना संचालकांची अधिक पदे दिली. हा शब्द न पाळणे म्हणजे धोका नव्हे काय, असा सवाल संदीप देशमुख यांनी केला आहे. सेलू बाजार समितीत पक्षीय विरोधक शेखर शेंडे यांना घेऊन देशमुख गट निवडणूक लढला. कांबळेंचे सहकारी असलेल्या जयस्वाल गटास सोबत न घेतल्याचा राग कांबळे गटाला होता. त्याचेच उट्टे वर्धेत काढल्याचे बोलले जाते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disagreement in congress and ncp in wardha over market committe chairmanship print politics news ssb