जळगाव – लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला वेग दिला असताना जिल्ह्यात महाविकास आघाडीतील बेबनाव उघड होऊ लागला आहे. परस्परांवर कुरघोडीचे राजकारण सुरू झाले असून विधानसभेच्या ११ पैकी पाच ते सहा जागांवर काँग्रेस, तर सहा जागांवर शरद पवार गटाने दावेदारी सांगितली आहे. ठाकरे गटाकडून पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असे सांगितले जात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावे-प्रतिदाव्याने ठाकरे गटाची अडचण झाली आहे. या घटनाक्रमाने जागा वाटपवरून आघाडीत राजकीय नाट्य रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
राज्यातील सत्ताधारी महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट), तसेच विरोधी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी (शरद पवार गट), काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) यांसह सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी, रणनीती आखत उमेदवारांची चाचपणी केली जात आहे, बैठकांवर बैठका होऊ लागल्या आहेत. राज्यातील प्रमुख नेते, मंत्र्यांचे जिल्ह्यात या ना त्या कारणांनी दौरे वाढले आहेत. त्यांच्याकडून बैठकांसह मेळाव्यांतून निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले जात आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, पक्ष बळकटीकरणाचे काम सुरू आहे. पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही केल्या जात आहेत.
महाविकास आघाडीतील मित्रपक्ष एकत्र लढणार असले, तरी तिन्ही पक्षांकडून आतापासूनच अधिकाधिक जागा मिळविण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. महाविकास आघाडीतील घटकपक्षांत अद्याप जागावाटप निश्चित झाले नसून, समसमान जागावाटप व्हावे, अशी मागणी यापूर्वीच ठाकरे गटाने केली आहे. मात्र, याच जागा वाटपावरून जळगावात कुरघोडीचे राजकीय नाट्य चालू झाले आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दौऱ्यावेळी प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी, जिल्ह्यातील दोन्ही लोकसभांसह विधानसभेच्या सहा जागांची मागणी करणार असल्याचे सांगत पक्ष त्यादृष्टीने तयारीला लागल्याचे म्हटले होते. डॉ. पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील यांनीही वर्षभरापासून तयारी सुरू केली आहे. जनसंवाद मोहिमेतून त्यांनी रावेर लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला आहे. पक्षाचे नेते आमदार शिरीष चौधरी, ॲड. संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार आदींकडून पक्ष वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
दुसरीकडे शरद पवार गटाकडून दोन्ही लोकसभांसह विधानसभेच्या सहा मतदारसंघांवर दावेदारी सांगितली जात आहे. लोकसभेच्या रावेर व जळगावसह विधानसभेसाठी जळगाव शहर व ग्रामीण, मुक्ताईनगर-बोदवड, चोपडा, पारोळा-एरंडोल, अमळनेर या मतदारसंघांत पक्षाकडून उमेदवारीसाठी अनेकांनी तयारी सुरू केली आहे. जळगाव ग्रामीण, पाचोरा-भडगाव, चाळीसगाव, अमळनेर, चोपडा, जामनेर या भागात पक्ष संघटन मजबूत आहे. गेल्या वेळी जळगाव शहर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीने लढवली होती. तयारी नसतानाही उमेदवार अभिषेक पाटील यांनी चांगली मते घेतली होती. एकनाथ खडसे हे आक्रमक नेते असल्याने पक्षाने त्यांच्यासह त्यांच्या कन्या ॲड. रोहिणी खडसे- खेवलकर यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार यांची जळगावात सप्टेंबरमध्ये स्वाभिमान सभा झाली. त्या पाठोपाठ शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वचनपूर्ती सभा झाली, तर अलिकडेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा दौरा झाला. शरद पवार यांच्या दौऱ्यावेळी अमळनेर, जळगाव शहर विधानसभेसाठी चाचपणी झाली. जळगाव ग्रामीण व चोपडा या भागातून सर्वाधिक कार्यकर्ते उपस्थित होते. सभेच्या माध्यमातून पवार यांनी जळगाव ग्रामीणसाठी गुलाबराव देवकर यांना बळ दिले. सध्या मतदारसंघात पालकमंत्र्यांविरुद्ध असलेला रोषाचा फायदा होऊ शकतो, असे शरद पवार गटाचा तर्क आहे. जळगाव शहर मतदारसंघासाठी कायद्याचा अभ्यास असणारे, नवीन चेहरा आणि राजकारणापासून दूर असलेला उमेदवारही तयार असून, त्याचे नाव ऐनवेळी जाहीर केले जाणार आहे. जळगाव लोकसभेसाठीही माजी खासदाराचे नाव पुढे आले असल्याचे पदाधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा – चर्चेतील चेहरा : जरांगे पाटील यांची वाटचाल ‘अण्णा हजारें’च्या वळणावर
ठाकरे गटानेही तयारी सुरू केली असून, विधानसभेसाठी जळगाव ग्रामीणमधून सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ व महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन, पाचोऱ्यातून पक्षाच्या उपनेत्या वैशाली सूर्यवंशी, पारोळ्यातून जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, जळगाव शहरमधून विष्णू भंगाळे, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनीही तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आता राज्यातील पक्षप्रमुख व वरिष्ठ नेते जागा वाटपाविषयी काय निर्णय घेतात, याकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
जळगाव ग्रामीणमध्ये अडचण
जळगाव ग्रामीण मतदारसंघ राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. या मतदारसंघातून जो निवडून येतो, तो मंत्रिपदावर विराजमान होतो, असा आतापर्यंत इतिहास आहे. शरद पवार गटाकडून माजी मंत्री गुलाबराव देवकर, शिंदे गटाकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील, ठाकरे गटाकडून सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ हे उमेदवार असतील. मात्र, महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याने जळगाव ग्रामीणमध्ये शरद पवार गट आणि ठाकरे गट यांच्यात जागेबाबत अडचण होऊ शकते.