नागपूर : नागपूरमध्ये अचानक उसळलेल्या दंगलीच्या कारणांवरून सत्ताधाऱ्यांमध्ये बेबनाव दिसून येतो. मुख्यंमंत्री म्हणतात दंगल ही पूर्वनियोजित होती तर त्यांच्याच पक्षाचे मध्य नागपूरचे ( ज्या भागात दंगल उसळली) आमदार म्हणतात दंगलीसाठी पोलीसच जबाबदार आहे. दंगल घडल्यानंतर पाहणी करण्यासाठी आलेले पालकमत्री पोलिसांनी परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली, असे प्रशस्तीपत्र देतात. तीन नेत्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये दंगलीसाठी जबाबदार कोण हे स्पष्ट होत नाही. त्यांच्यातील बेबनाव दिसून येतो.

ऐरवी सामाजिक ऐकोपा जपणाऱ्या नागपूर शहरातील महाल भागात काही मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये सोमवारी रात्री अचानक दंगल पेटते , त्यात जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडते, पोलिसांवर हल्ले होतात हे सर्वच अचंबित करणारे आहे. त्यामुळे सोमवारी घडलेल्या या घटनेचे तीव्र पडसाद उमटणे स्वाभाविक होते, ते तसे विधिमंडळाच्या अधिवेशनात आणि स्थानिक पातळीवरही उमटले. सर्वाधिक लक्ष होते ते मुख्यमंत्री देवेंद्र फडअवीस या प्रकरणी काय बोलतात याकडे, अपेक्षेप्रमाणे त्यांनी ही दंगल पूर्वनियोजित होती असे सांगून एक प्रकारे ते सांभाळत असलेल्या गृहखात्यावरच खापर फोडले. मुळात हे आंदोलनच भाजपची पितृसंघटना राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी निगडीत विश्व हिंदू परिषद आणि बंजरंग दलाचे होते. या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हिरवी चादर जाळणे पूर्व नियोजित होते का ? या घटनेमुळे दुसरा गट संतप्त झाला व त्याचे पडसाद म्हणून रात्री दंगल घडली असे स्थानिक नागरिक सांगतात, मग पोलिसांना याची खबर नव्हती का ? हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश नाही का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात.

ज्या भागात ही दंगल घडली त्या भागाचे भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी दंगलीसाठी पोलीसच जबाबदार असल्याच जाहीर आरोप प्रसार माध्यमांशी बोलतांना केला. हा आरोप करून त्यांनी एक प्रकारे मुख्यमंत्री सांभाळत असलेल्या गृहखात्यावरच अकार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. दंगलग्रस्त भागात तणाव वाढत असताना पोलिसांनी काहीच केले नाही, दंगलीत एका विशिष्ट समुहाला लक्ष्य करण्यात आले, असा त्यांचा दावा आहे, मात्र त्यांनी हिरवी चादर जाळणाऱ्या विहिप व बजरंग दल कार्यकर्त्यांवर कारवाई का केली नाही ? याबाबत पोलिसांना सवाल केला नाही. या कार्यकर्त्यांवर कारवाई झाली असती तर पोलीस सतर्क आहे, असा संदेश दुसऱ्या गटात गेला असता,व पुढील अनर्थ टळला असता, असे सांगितले जाते.

दंगलीनंतरच्या दुसऱ्या दिवशी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे स्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीने नागपुरात दाखल झाले. त्यांनी पोलीस आयुक्तांशी चर्चा करून पोलिसांनी स्थिती उत्तमरित्या हाताळली व हिंसाचार आटोक्यात आणला, असे प्रशस्तीपत्र पोलिसांना दिले. त्यामुळे पोलिसांवर ठपका ठेवणारे आमदार दटके तोंडघशी पडले. एकूणच दंगलीच्या कारणावरून भाजप नेत्यांमध्ये बेबनाव असला तरी ज्यांना या दंगलीची झळ पोहचली त्यांच्या मनात सत्ताधारी, दंगेखोरांना रोखण्यात अपयशी ठरलेली पोलीस यंत्रणा यांच्या विषयी संताप आहे.

Story img Loader