सुहास सरदेशमुख
गणेश दर्शनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या भेटीच्या ‘योगायोगा’नंतर अशोक चव्हाण यांच्या पक्षांतराच्या मुंबई व पुणे येथील चर्चेचा सूर होकारार्थी असला तरी नांदेडमध्ये मात्र तो नकारार्थी आहे. कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा नांदेड येथे येणार असून त्याच्या तयारीत कॉंग्रेसचे चव्हाण समर्थक आमदार कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा वावड्या असल्याचे सांगण्यात येत आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये कॉंग्रेसची फुटलेली सहा मते नक्की कोणाची याचा शोध सुरू झाल्यानंतर अशोक चव्हाण यांचे नाव त्यात जोडून त्यांच्या कॉंग्रेस निष्ठेविषयी संभ्रम निर्माण केला जात असल्याचे कॉंग्रेस कार्यकर्ते सांगत आहेत.
हेही वाचा- कृषीमंत्र्यांच्या मेळघाट दौऱ्याने नेमके काय साध्य केले ?
भारत जोडो यात्रा ७ सप्टेंबरपासून सुरू होणार असून नोव्हेंबर महिन्यात कॉंग्रेसचे नेते राहुल गांधीही नांदेड येथे मुक्कामी थांबणार आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या निष्ठेविषयी संभ्रम निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे काय, असा प्रश्नही विचारला जात आहे. नांदेड जिल्ह्यात या यात्रेच्या तयारीसाठी आमदार अमरनाथ राजुरकर यांनी अलिकडेच एक बैठकही घेतली होती. ही यात्रा नांदेडहून हिंगोली जिल्ह्यात जाणार आहे. नांदेड जिल्ह्यातील या यात्रेचा प्रवास शंभर किलोमीटर एवढा आहे. त्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्ते बांधणी करत असताना अशोक चव्हाण यांच्याविषयीचे संभ्रम निर्माण झाले आहेत. विधान परिषद निवडणुकीत मते फुटल्याने कॉंग्रेसमध्ये असंतोष आहे, हे अधोरेखित झाले होते. त्यामुळे भाजपला मतदान करणारे कोण या शोधात अशोक चव्हाण यांचे नाव चर्चेत ठेवण्यात आले. भाजपचे एक नेते ‘”ते’ भाजपमध्ये आले तर स्वागत होईल” असे म्हणतात तर दुसरे नेते “आम्ही कोणाचा पक्ष फोडत नाही. त्यांना बाहेर पडायचे असेल तर त्यांच्याबरोबर काम करू”, अशी विधाने करत आहेत. त्यावर अशोक चव्हाण यांनीही स्पष्टीकरण दिल्याने नांदेडमधून अशोक चव्हाण यांच्या पक्षांतर चर्चेला नकरार्थी सूर असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा- अकोला राष्ट्रवादीत खदखद; मिटकरींच्या अडचणी वाढल्या
प्रताप पाटील चिखलीकर, माधवराव किन्हाळकर, सूर्यकांता पाटील हे अशोक चव्हाण यांच्या राजकारणाला विरोध करणारे नेते भाजपमध्ये आहेत. यातील खासदार चिखलीकर वगळता इतर नेत्यांचा भाजपने संघटन वाढीसाठी वा निवडणुका जिंकण्यासाठी अद्यापि फारसा उपयोग करुन घेतला नाही. अशा स्थितीमध्ये केवळ चर्चा पेरून अशोक चव्हाण यांच्या कॉंग्रेस निष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा हा प्रयत्न असावा अशी कॉंग्रेसमधील कार्यकर्त्यांची भावना आहे.