मुंबई : भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यावर त्यात स्थान न मिळालेले विद्यामान आमदार, नाराज नेते आणि उमेदवारीसाठी इच्छुक नेते यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ निवासस्थानी सोमवारी भाऊगर्दी उसळली होती.

बोरीवलीतील आमदार सुनील राणे, वर्सोव्यातील आमदार भारती लव्हेकर, खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर, नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे आदी नेत्यांची नावे भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत नाहीत. या आमदारांसह १८ आमदारांची नावे पहिल्या यादीत नसल्याने त्यांना उमेदवारी मिळणार का, याविषयी प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे अद्याप उमेदवारी न मिळालेले नेते चिंताग्रस्त असून राणे, लव्हेकर, तापकीर आदी नेत्यांनी फडणवीस यांच्या निवासस्थानी धाव घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. तेव्हा त्यांच्या नावाचा विचार होईल, चिंता करू नये, अशी समजूत फडणवीस यांनी घातली. बंडखोरी न करण्याच्या सूचनाही केल्या आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा : खडकवासला मतदारसंघातील समीकरणे बदलणार ?

भेटीगाठी आणि आश्वासने…

● मुंबादेवीतून निवडणूक लढविण्यासाठी अतुल शहा तर अंधेरी पूर्वमधून निवडणूक लढविण्यासाठी मुरजी पटेल इच्छुक आहेत. हे दोघेही फडणवीस यांच्या निवासस्थानी दाखल झाले आणि त्यांनी उमेदवारी मिळावी, अशी विनंती या नेत्यांनी फडणवीस यांना केली. तेव्हा त्यांच्या नावाचा विचार केला जाईल, असे त्यांना सांगण्यात आले.

● माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना श्रीगोंदा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. पण त्यांच्याऐवजी मुलगा विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी मिळावी यासाठी पाचपुते यांनी फडणवीस यांची भेट घेतली.

● काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे व नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याने त्यांना भाजप कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी देणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा : तब्बल २० वर्षांनी निलेश राणे धनुष्यबाण हातात घेणार

● मावळचे आमदार सुनील शेळके असून त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही. येथून लढण्यासाठी बाळा भेगडे इच्छुक असून त्यांनी फडणवीस यांची भेट घेऊन उमेदवारी देण्याची विनंती केली.

● वर्सोव्यातील आमदार भारती लव्हेकर लव्हेकर यांच्याविषयी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज असून या मतदारसंघासाठी अन्य नावांवर विचार सुरू आहे.