ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांना मुहूर्त मिळत नसल्याने जिल्ह्यातील भाजप आमदारांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. शिंदे गट आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धाचाच हा भाग असल्याचे मानले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील अनेक महिन्यांपासून रखडलेल्या ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला दोन दिवसांपूर्वी मुहूर्त मिळाला. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्ह्यातील सर्व पक्ष लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली होती. यावेळी स्थानिक आमदार, खासदार यांनी विविध प्रस्ताव पालकमंत्र्याना सादर केले होते. यानंतर तीन ते चार वेळा जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे ऐन वेळेला रद्द करण्यात आली होती. यानंतर तब्बल दहा महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मंगळवार ५ सप्टेंबर रोजी बैठकीला मुहूर्त मिळाला आणि या बैठकीत सर्व लोकप्रतिनिधींनी आपली उपस्थिती दर्शवत गेल्या दहा महिने रखडलेल्या विकास कामांचा पाढाच वाचून दाखवत आपला असंतोष व्यक्त केला. यामध्ये कल्याण पूर्व मतदारसंघाचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी आघाडी घेत जिल्हा नियोजन समितीच्या बैठका वेळेवर होत नसल्याने जिल्ह्यातील विकासकामांना आणि लोकप्रतिनिधींनी सादर केलेल्या प्रस्तावावर कशा पद्धतीने दिरंगाईने होत आहे, यावर सर्वांसमोर परखड भाष्य केले.

हेही वाचा – लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीने कसली कंबर; पक्षाच्या वेगवेगळ्या विभागांची पुनर्रचना!

यावेळी गणपत गायकवाड यांनी माझ्या मतदारसंघातील अनेक विषय आहे यावर पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे आणि कार्यवाही करावी अशी मागणी करत त्यांच्या कामांची यादी वाचण्यास सुरुवात केली. मात्र यावेळी कल्याण पश्चिम शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी गायकवाड यांना थांबवत तुम्ही इतकी यादी वाचणार मग आम्ही आमच्या कामाची यादी कधी सादर करायची असा सवाल केला. यावर प्रत्युत्तर देत गायकवाड यांनी तुम्ही मुख्यमंत्र्यांची खास माणसे.. तुमची कामे होणारच आम्हाला बोलू द्या.. आम्ही फक्त नावाला सत्तेत आहोत.. आमची गत सध्या ”सारा गाव मामाचा… एक नाही कामाचा” अशी झाली आहे, असा टोला यावेळी लगावला. त्यांच्या या वक्तव्याने संबंध सभागृह चकित झाले. याचीच री ओढत ठाणे भाजप आमदार संजय केळकर यांनीदेखील पालकमंत्री देसाई यांना नियोजन समितीच्या बैठका वेळेवर लावायला हव्या. लोकप्रतिनिधींचे विषय महत्त्वाचे असतात ते मार्गी लागायला हवे. वेळेवर बैठका लागत नसल्याने अधिकारीदेखील या बैठकांना गांभीर्याने घेत नसून अनेक महत्त्वाचे अधिकारी या बैठकीला गैरहजर असल्याचे त्यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. तर या संपूर्ण संभाषणात शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा यांनीदेखील या विषयावरून पालकमंत्र्यांना कोंडीत पकडले.

ठाणे जिल्ह्यातील खास करून भाजप आमदारांमध्ये गेल्या वर्षभरापासून नाराजी असल्याचे अनेकदा समोर आले होते. या बाबत कोणतेही आमदार उघडपणे बोलण्यास तयार नव्हते. मात्र जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत ही संधी या सर्व आमदारांना मिळाली आणि सर्वांनी उघड उघड आपली नाराजी व्यक्त केली. यामुळे जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनामध्ये असलेली धुसफूस या बैठकीच्या निमित्ताने प्रकर्षाने चव्हाट्यावर आली आहे.

इथे आम्हालाच निधी नाही –

गणपत गायकवाड यांनी विश्वनाथ भोईर यांना तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खास माणसे तुमची कामे होणार असे बोलताच विश्वनाथ भोईर यांनी ‘इथे नियोजन समितीच्या माध्यमातून गेल्या २-४ वर्षांत आम्हालाच निधी मिळाला नाही. आम्ही कोणते मुख्यमंत्र्यांचे खास असे प्रत्युत्तर देताच गणपत गायकवाडदेखील काही काळ निरुत्तर झाले.

हेही वाचा – कोल्हापूरमधील शरद पवार की अजित पवारांची सभा मोठी होणार ?

आमची कोणतीही नाराजी नाही –

आमदार गणपत गायकवाड यांच्या नाराजीबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बैठक संपल्यानंतर विचारणा केली असता ‘त्यांना बैठकीत बोलण्यासाठी पुरेसा वेळ दिला होता. त्यांनी त्यांचे विषय मांडले आहेत. आमची आणि आमच्या सहकाऱ्यांची गणपत गायकवाड यांच्याबाबत कोणतीही नाराजी नाही, असे स्पष्टीकरण यावेळी त्यांनी दिले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Displeasure among bjp mla in thane against shiv sena guardian minister print politics news ssb
Show comments