मुंबई : पक्षश्रेष्ठींकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना झुकते माप दिले जात असल्याने भाजपमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मेट्रो तीनच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून त्याचा समारंभ आणि विधानसभा निवडणुकीनिमित्ताने शक्तिप्रदर्शन मात्र शिंदे यांच्या आग्रहामुळे ठाण्यात होणार आहे.
महामंडळांवर शिवसेनेतील (शिंदे) नेत्यांच्या नियुक्त्या झाल्या असून लोकसभा निवडणुकीप्रमाणेच शिंदे गटाने ठाणे जिल्ह्यातील भाजपला हव्या असलेल्या काही जागांवर दावा सांगितला आहे. त्यामुळे सत्तेतील लाभ व पदे शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाला मिळत असून भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मात्र त्याग व काम करण्याचे धडे देण्यात येत असून मेहनतीचे श्रेय मात्र शिंदे व पवार गटाला मिळत असल्याने नाराजी वाढत आहे.
हेही वाचा >>> Jammu Kashmir Assembly Election : जम्मू-काश्मीरमध्ये बदलाचे वारे, लोकसभेपेक्षा विधानसभेला अधिक मतदान
मुंबई मेट्रो तीन प्रकल्पासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळापासून अतिशय मेहनत घेतली होती. महाविकास आघाडी व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणवाद्यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला होता आणि आरे कारशेडचे काम थांबले होते. फडणवीस यांनी हा प्रकल्प पुन्हा मार्गी लावला व त्याच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते ५ ऑक्टोबरला होणार आहे. मोदी हे औपचारिक उद्घाटन करून मेट्रोमधून फेरफटका मारणार असून ठाण्यातील समारंभास जाणार आहेत.
भाजप कार्यकर्ते मागच्या फळीत
मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाचे श्रेय आणि त्यानिमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्याची संधी फडणवीस किंवा भाजपला मुंबईत मिळणार नाही. ठाकरे व इतरांशी संघर्ष करुन फडणवीस व भाजपने जो प्रकल्प रेटला, त्याचे श्रेय व शक्तिप्रदर्शन करण्याची संधी मोदींच्या मुंबईतील सभेमुळे मिळू शकली असती. मात्र, मोदी हे ठाणे रिंगरोडचे भूमिपूजन, महिला सशक्तीकरण व अन्य कार्यक्रमांसाठी ठाण्याला जाणार आहेत. या समारंभाच्या आयोजनात शिंदे गटातील नेते व कार्यकर्ते आघाडीवर असून भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मात्र मागच्या फळीत आहेत.