चंद्रशेखर बोबडे
नागपूर : पूर्व विदर्भातील पूरग्रस्त भागाचा दौरा करताना राष्ट्रवादीचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांना सोबत न घेतल्याने नाराजी आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्रित लढवाव्यात, अशी इच्छा खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलेली असताना अजित पवार यांनी त्यांच्या दौऱ्यादरम्यान काँग्रेस व सेना नेत्यांना सोबत न घेणे विसंगती निर्माण करणारे आहे.
पवार यांनी जुलैच्या अखेरच्या आठवड्यात पूर्वविदर्भातील पूरग्रस्त गडचिरोली, चंद्रपूर व वर्धा या तीन जिल्ह्यांचा दौरा केला. हा दौरा अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरला. गावोगावी फिरून त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. विशेष म्हणजे, गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागांना भेटी दिल्या. सत्ताबदलानंतरचा हा त्यांचा या भागातीलपहिलाचदौरा होता. मात्र दौऱ्यादरम्यान त्यांच्यासोबत महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस आणि सेनेचे नेते नव्हते. त्यांना विश्वासातही घेण्यात आले नाही, असा आरोप आता होत आहे. वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान पवार यांच्यासोबत या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व काँग्रेस नेते अनुक्रमे सुनील केदार, विजय वडेट्टीवार नव्हते. ही बाब या दोन्ही जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांसाठी खटकणारी ठरली आहे. नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी दौरे करून अहवाल तयार केला. पण पवार यांनी त्यांच्या नागपूर मुक्कामी एकाही काँग्रेस नेत्याशी संपर्क साधला नाही. याबाबत आता कॉंग्रस वर्तुळातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा… हिंगोली : माजी आमदार संतोष टारफे भाजपच्या उंबरठ्यावर
वास्तविक राज्यात शिंदे सरकार आल्यावर महाविकास आघाडीच्या अस्तित्त्वावरच प्रश्न निर्माण झाले आहेत. अशावेळी पवार यांना आपल्या दौऱ्यादरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांना सोबत घेऊन आघाडी कायम आहे असा संदेश देता आला असता. मात्र त्यांनी जाणीवपूर्वक ही बाब टाळल्याने काँग्रेस, शिवसेनेच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे.