प्रबोध देशपांडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकोला : जिल्ह्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेला अल्पावधीतच वादाचे ग्रहण लागले. निधी वाटपाच्या कारणावरून संपर्क प्रमुख तथा माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. पक्षात निधीवरून मतभेदाची मोठी दरी तयार झाली. संटनात्मक बळकटीसाठी रांगणारा हा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या वादामुळे वाढणार तरी कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्यात घडलेल्या अभूतपूर्व सत्तानाट्यामध्ये शिवसेनेत मोठी फूट पडली. नव्याने तयार झालेल्या शिंदे गटाला निवडणूक आयोगाने बाळासाहेबांची शिवसेना असे नाव दिले. विविध जिल्ह्यात शिवसेनेतून फुटलेले अनेक नेते एकनाथ शिंदेंसोबत जात असतांना अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख गुवाहटीला जाऊन उद्धव ठाकरेंकडे परतले. त्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेपुढे जिल्ह्यात अस्तित्व निर्माण करण्याचे आव्हान होते. विधान परिषदेतील पराभवानंतर शिवसेनेत एकाकी पडलेले माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी शिंदे गटाचा झेंडा खांद्यावर घेतला. एकनाथ शिंदेंनी जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी बाजोरियांवर सोपवली. त्यांच्यासोबत शिंदे गटात गेलेल्या आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांना बाजोरियांनी पदे दिलीत. या माध्यमातून संघटन वाढीचे चित्र बाजोरियांकडून उभे करण्यात आले. बाळासाहेब शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक बांधणी करण्याऐवजी निधी मिळवण्यावरच अधिक लक्ष केंद्रित केले. पक्षामध्ये अवघ्या दोन-तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये निधीवरून हेवेदावे वाढत गेले. सर्व अधिकार गोपीकिशन बाजोरियांकडे असल्याने ते विश्वासात घेत नसल्याचा आरोप त्यांच्याच विश्वासू पदाधिकाऱ्यांकडून होऊ लागला. त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

हेही वाचा… आरोग्यमंत्र्यांच्या मनमानीच्या विरोधात भाजप आमदाराचीच तक्रार

बाळासाहेबांच्या शिवसेनेचे संपर्कप्रमुख गोपीकिशन बाजोरिया यांच्या विरोधात काही पदाधिकाऱ्यांनी खासदार प्रतापराव जाधव यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी तक्रार केली. पदाधिकाऱ्यांच्या ‘लेटरबॉम्ब’ने बाळासाहेबांच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद समोर आले. गोपीकिशन बाजोरिया यांच्या विरोधात पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष पसरल्याचे दिसून येते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अकोला जिल्ह्यातील विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा विकास निधी दिला. आता पुन्हा २० कोटी निधी मिळण्यासाठी माजी आमदार बाजोरिया यांनी पत्र दिले. बाजोरिया यांच्याकडून विकास निधीचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी पत्रात केला. पदाधिकाऱ्याला विश्वासात न घेता त्यांची कामे रद्द करून पडीक मालमत्ता असलेल्या ठिकाणी कामे दिल्याचे पत्रात म्हटले आहे. निधीसाठी दिलेल्या पत्राची शहानिशा करावी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच निधी वितरित करावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. या पत्रावर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. पदाधिकाऱ्यांच्या या पवित्र्यानंतर गोपीकिशन बाजोरियांनी देखील पटलवार केला. जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेना वाढू नये, म्हणून हे बदनामीचे षडयंत्र असल्याचे सांगून बाजोरिया यांनी त्यांच्यावर झालेले सर्व आरोप फेटाळून लावले. निधी गैरव्यवहाराचा प्रश्नच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या सर्व प्रकारामुळे जिल्ह्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेत संपर्क प्रमुख व पदाधिकारी असे दोन गट तयार झाले असून एकमेकांच्या विरोधात कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे.

हेही वाचा… कसब्यात भाजपच्या मदतीला शिंदेची फौज

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर सुनियोजित कट?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अकोला दौऱ्यावर येण्याच्या एक दिवस अगोदर बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील सर्व कलह समोर आला. त्यामुळे हा सुनियोजित कट तर नाही ना? असा संशय राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे. काही महिन्यांतच बाळासाहेबांची शिवसेनामधील पदाधिकाऱ्यांचे मतभेद व वाद विकोपाला गेल्याने पक्षाच्या संघटनात्मक वाढीवर सुद्धा आता प्रश्नचिन्ह लागले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dispute among balasahebs shiv sena eknath shinde group in akola district print politics news asj