दिगंबर शिंदे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या इस्लामपुरातील वर्चस्वाला शह देण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू असतानाच मंगळवारी केंद्रीय कायदा व न्याय राज्यमंत्री सत्यपालसिंह बघेल यांच्या इस्लामपूर दौऱ्यामध्ये पक्षातील फुटीचे दर्शन घडले. माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील आणि महाडिक गटाने दोन स्वतंत्र मेळाव्याचे आयोजन करीत हे गटबाजीचे प्रदर्शन घडवले.

आमदार पाटील यांचा इस्लामपूर हा बालेकिल्ला मानला जातो. या गडालाच धक्का देण्याचे प्रयत्न भाजपकडून सातत्याने होत आहेत. मागील नगरपालिका निवडणुकीमध्ये जयंत पाटील विरोधकांना एकत्र करून विकास आघाडीच्या माध्यमातून शह देण्याचा यशस्वी प्रयत्न केला गेला. या विकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी वगळता शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्ष सहभागी झाले होते. यामुळे थेट नगराध्यक्ष निवडीमध्ये राष्ट्रवादी उमेदवारांचा पराभव झाला तर नगरपालिकेत बरोबरीने नगरसेवक निवडून आले होते.

हेही वाचा… काँग्रेस पक्षाध्यक्षपदासाठी अशोक गेहलोत आघाडीवर; २४ वर्षांनंतर गांधीतर नेत्याच्या निवडीची शक्यता

विरोधकातील दुफळी हीच जयंत पाटलांचे बलस्थान असल्याचे वेळोवेळी झालेल्या निवडणुकीमध्ये स्पष्ट झाले आहे. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप-सेना युतीचे उमेदवार म्हणून गौरव नायकवडी होते तर माजी नगराध्यक्ष पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीमध्ये जयंत पाटील यांच्या विरोधातील मतांची विभागणी झाल्याने राष्ट्रवादीला विजय सुकर झाला.

हेही वाचा… “मी तर म्हणतो…”, ‘महाराष्ट्राचे प पू’ म्हणणाऱ्या शिंदे गटातील आमदारांना आदित्य ठाकरेंचं जाहीर आव्हान!

इस्लामपूर नगरपालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. राष्ट्रवादीने याची तयारीही सुरू केली असून आ. पाटील यांनी प्रभागनिहाय बैठकांचा धूमधडाका लावला असून गेल्या पाच वर्षांतील विकास आघाडीच्या उणिवावर बोट ठेवून विरोधकांविरुद्ध रान उठवत आहेत. मात्र विरोधक एकत्र येण्याऐवजी आपापल्या महत्त्वाकांक्षा उराशी ठेवून राजकीय मोर्चेबांधणी करण्यातच धन्यता मानत आहेत.

हेही वाचा… Maharashtra News Live : दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट

केंद्रीय मंत्र्यांचा लोकसभा निवडणुकीसाठी संवाददौरा मंगळवारी पार पडला. यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या बैठकीसाठी प्रकाश शैक्षणिक संकुलाची जागा अधिकृतपणे जाहीर करण्यात आली होती. मात्र या ठिकाणी महाडिक गटातून केवळ सम्राट महाडिक यांचीच उपस्थिती राहिली. जिल्हा बँकेचे संचालक तथा भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि विकास आघाडीचे अध्यक्ष विक्रम पाटील आणि महाडिक गटाने केंद्रीय राज्यमंत्री बघेल यांच्या उपस्थितीत स्वतंत्र मेळावा आयोजित करून सवतासुभा कायम राखला आहे. मात्र, भाजपचे खा. संजयकाका पाटील, आ. गोपीचंद पडळकर, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, सत्यजित देशमुख यांनी दोन्ही ठिकाणी उपस्थिती दर्शवून तुमच्या वादात आम्हाला पडायचे नाही हेच दाखवून दिले.

हेही वाचा… आधी मुख्यमंत्र्यांना ऑफर, मग पंतप्रधानपदाचा उल्लेख करत फडणवीसांना चिमटा, जयंत पाटलांची विधानसभेत टोलेबाजी!

आगामी नगरपालिका निवडणुकीमध्ये जयंतविरोधक एकत्र येण्याला यामुळे खीळ तर बसणार आहेच, पण आगामी विधानसभेच्या निवडणुकीवर केवळ वाळव्यातच नव्हे तर शिराळा मतदार संघामध्येही याचे पडसाद उमटणार आहेत. दोन स्वतंत्र मेळाव्याचे आयोजन इस्लामपुरात झाल्याने भाजपचे वेगाने काँग्रेसीकरण होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी तातडीने लक्ष घातले नाही, तर पक्षांतर्गत गटबाजी डोकेदुखी ठरण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dispute among bjp while countering jayant patil in sangli politics print politics news asj
Show comments