सांगली : सध्या कुठल्याही निवडणुका नसल्या तरी महायुतीमध्ये पक्ष विस्तारावरून नजीकच्या काळात संघर्षाची चिन्हे दिसत आहेत. सांगलीत चार माजी आमदार महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उंबरठ्यावर असतानाच भाजपच्या आमदारांनी त्यांची वाट रोखण्याचा प्रयत्न चालवला आहे. राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार ही आडकाठी कशी पार करतात यावर या पक्षाचे जिल्ह्यातील रूजणे अवलंबून राहणार आहे.
लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात वेगळी राजकीय सांधेजोड पाहण्यास मिळाली. महायुती विरूध्द महाविकास आघाडी असा सामना रंगण्याऐवजी भाजप विरूध्द अपक्ष असाच सामना रंगविण्यात आला. भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांना पराभूत करण्यासाठी भाजपची कुठे उघड तर कुठे छुपी मदत अपक्ष विशाल पाटील यांच्या पथ्यावर पडली. काँग्रेसने उघड पाठिंबा देताना हात अखडता धरला असला तरी उमेदवारीसाठी अखेरपर्यंत ताणून धरून अखेर महायुतीचा निर्णय मुंबईत व दिल्लीत मान्य करण्यात आला असला तरी मैदानावर मात्र काँग्रेसची ताकद अपक्षाच्या पाठीशीच उभी ठाकली. भरीत भर भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप, कवठेमहांकाळचे माजी आमदार अजितराव घोरपडे यांनी सक्रिय पाठिंबा दिला. तर पलूस-कडेगावमध्ये माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांची तटस्थ भूमिका अपक्षाच्या पथ्यावर पडली.
लोकसभेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत सगळेच राजकीय संदर्भ बदलत गेले. लोकसभेच्या निकालामुळे महाविकास आघाडीला आशादायक स्थिती निर्माण झाली असताना जतमध्ये काँग्रेसचा कर्माने बळी घेतला. तर तासगावचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा विजय वगळता इस्लामपूर, पलूस-कडेगावची जागा राखताना महाविकास आघाडीला घाम फुटला. शिराळ्याची जागा तर गेलीच. म्हणजे पदरच्या दोन जागा गेल्या. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जगतापांनी पक्षाचा राजीनामा देउन लोकसभेवेळीच विरोधकाची भूमिका घेतली होती, तर विधानसभेवेळी त्यांनी जिल्हा परिषदेचे माजी सभापती तमणगोडा रविपाटील यांच्यापाठीशी आपली ताकद लावली. मात्र, या ठिकाणी भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी परका मतदार संघ असूनही बाजी मारली.
विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीतील घटक पक्षांनी आपला पक्ष विस्तार करण्याचे प्रयत्न सध्या चालवले आहेत. वाळव्यातून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून मैदानात उतरलेल्या निशीकांत पाटील, प्रताप पाटील यांनी पक्ष बांधणी सुरू केली असून याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. जतचे जगताप, आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, शिराळ्याचे माजी मंत्री शिवाजीराव देशमुख आणि कवठेमहांकाळचे माजी मंत्री अजितराव घोरपडे हे चार माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. यासाठी दोन बैठकाही झाल्या असून पक्ष प्रवेशासाठी मुहुर्त शोधण्यात येत आहे. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर या पक्ष विस्ताराला गती आली असली तरी भाजपचे आमदार पडळकर यांनी या पक्ष प्रवेशाला खोडा घालण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. आता महायुतीतील वरिष्ठ नेते मंडळी म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मित्र पक्षाच्या विस्तारवादी भूमिकेबद्दल काय भूमिका घेतात याचे औत्सुक्य आहे. दुसर्या बाजूला शिवसेना शिंदे पक्षानेही पक्ष विस्ताराची भूमिका घेतली असून ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख संजय विभुते, जिल्हा संघटक बजरंग पाटील आदींनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. याला मात्र भाजपची आडकाठी दिसत नाही. म्हणजे केवळ राष्ट्रवादीच्या विस्तारवादी भूमिकेलाच आ. पडळकरांचा तोही व्यक्ती सापेक्षा विरोध दिसतो आहे. आता हा विरोध फलद्रुप होतो की वांझोटा हे येत्या काही दिवसात दिसेलच.