मुंबई : आरोग्य विभागाच्या फिरत्या दवाखान्यासाठी वाहन खरेदी, सचिवांच्या चौकशीसाठी मंत्र्यांचा आग्रह आणि अधिकारावरून सचिवांमध्येच झालेल्या वादामुळे मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक वादळी ठरली. सत्ताधारी महाविकास आघाडीतील मंत्री, आमदार सर्वच जण विविध योजनांच्या माध्यमातून निधी मिळविण्यासाठी धडपडत आहेत. निधीच्या पळवापळवी वरूनच आता महायुतीमध्ये खटके उडू लागले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या नस्ती मुख्यमंत्री कार्यालयात रोखल्याच्या तक्रारी राष्ट्रवादीच्या आमदारांकडून केल्या जात असताना, दुसरीकडे वित्तमंत्री अजित पवार हे शिवसेनेच्या आमदारांच्या निधीच्या प्रस्तावांना मान्यता देत नसल्याच्या तक्रारी शिवसेनेकडून केल्या जात आहेत. या दोन्ही पक्षांमधील विसंवादाचे प्रत्यंतर मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत उमटले.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या फिरता दवाखाना योजनेसाठी आवश्यक वाहने खरेदी करण्याच्या प्रस्तावाला तातडीने मान्यता मिळावी यासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत प्रयत्नशील आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची नस्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर ठेवत त्यावर स्वाक्षरी करण्याची सूचना केली. मात्र आपल्याला या प्रस्तावाबाबत काहीच माहिती नाही. सचिवांनी ब्रीफही केले नाही असे सांगत पवार यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर आपणही अनेक वेळा याच ठिकाणी आपल्या नस्तीवर स्वाक्षरी केली आहे. आपणही स्वाक्षरी करायला काय हरकत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी पवार यांना सुनावल्याचे समजते. या वेळी दोघांमध्ये झालेल्या चर्चेने उपस्थित सर्वच मंत्री आणि अधिकारी अवाक झाल्याचे कळते. याच बैठकीत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या विभागाच्या अप्पर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्यावर विविध आरोप करीत त्यांची चौकशीची मागणी करणारे पत्र थेट मुख्यमंत्र्यांना दिले.

हेही वाचा >>>‘अडचण हेमंत बिस्वा शर्मा यांची आहे!’ आसाम भाजपामध्ये दुफळी; ‘जुने विरुद्ध नवे’ वाद चव्हाट्यावर

नॅनो युरिया खरेदीवरून मुंडे आणि राधा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. त्याची परिणती राधा यांच्या बदलीत झाली. मात्र याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांमध्ये उघड झाल्याने मुंडे यांनी आपली नाराजी मंत्रिमंडळात व्यक्त केल्याचे समजते. अशाच प्रकारे दोन विभागांच्या सचिवांमध्ये झालेल्या वादात थेट मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागल्याची घटनाही मंत्रिमंडळ बैठकीत घडली. सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जात असताना महिला आणि बालकल्याण विभागाचे प्रधान सचिव अनुुप यादव यांनी २७ लाख पात्र महिला लाभार्थ्यांचे बँक खाते आधारशी जोडले नसल्याची माहिती मंत्रिमंडळाला दिली. ही त्रुटी कशा प्रकारे दूर करता येईल याबाबत यादव मंत्रिमंडळाला माहिती देत असतानाच माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांनी काही सूचना करण्याचा प्रयत्न केला. त्यावर नाराज झालेल्या यादव यांनी आपल्या विभागात ढवळाढवळ नको असे सांगत जैन यांना समज दिली. त्यावर मंत्रिमंडळ बैठकीत असे वागणे बरोबर नाही. येथे सर्वांना बोलण्याचा, सूचना करण्याचा, मते मांडण्याचा अधिकार असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी यादव यांना समज देत या वादावर पडदा टाकल्याचे समजते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dispute between chief minister eknath shinde deputy chief minister ajit pawar over signature print politics news amy