आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यानुसार प्रत्यक्ष मतदान सुरू व्हायला एका महिन्यापेक्षाही कमी कालावधी बाकी आहे. अशातच पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांतील जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. खरं तर जागा वाटपाच्याबाबतीत डाव्या पक्षांतील सर्वात मोठा पक्ष असलेला सीपीआय (एम) आपल्याच चक्रव्यूहात अडकत असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळातही अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.
पश्चिम बंगालमध्ये डावे पक्ष इंडिया आघाडीचा भाग आहेत. यामध्ये काँग्रेससह सीपीआय (एम), सीपीआय, फॉरवर्ड ब्लॉक, आरएसपी आणि इतर लहान पक्षांचा समावेश आहे. याशिवाय इंडिया आघाडीव्यतिरिक्त सीपीआय (एम)ची भारतीय सेक्युलर फ्रंटबरोबर वेगळी युती आहे. ही युती २०२१ पासून अस्तित्वात आहे. मात्र, भारतीय सेक्युलर फ्रंटने अतिरिक्त जागांसाठी उमेदवारांची घोषणा केल्याने डाव्या आघाडीतील इतर पक्ष नाराज असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा – खाण घोटाळाप्रकरणी नऊ गुन्हे दाखल असलेल्या माजी मंत्र्याचा भाजपात प्रवेश; यामागचं राजकारण काय?
पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण ४२ जागा आहेत. इंडिया आघाडीतील जागावाटपाच्या सूत्रांनुसार, ४२ पैकी १२ जागा काँग्रेस लढवणार आहे, तर सहा जागा सीपीआय (एम) ने भारतीय सेक्युलर फ्रंटसाठी सोडल्या आहेत. तसेच २४ जागा डाव्या आघाडीतील इतर पक्षांना देण्यात आल्या आहेत. यापैकी १७ जागांवर उमेदवारांच्या नावाची घोषणाही करण्यात आली आहे; तर काँग्रसने आठ जागांवर आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. चार जागांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा होणे अद्यापही बाकी आहे.
महत्त्वाचे म्हणजे अशाप्रकारे जागावाटपाचे सूत्र ठरले असताना भारतीय सेक्युलर फ्रंटने आठ जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये मालदा-उत्तर, जॉयनगर, मुर्शिदाबाद, बारासत, बसीरहाट, मथुरापूर, झारग्राम आणि सेरामपूर या जागांचा समावेश आहे. त्यामुळे किमान पाच जागांवर डावे पक्ष आणि भारतीय सेक्युलर फ्रंट यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.
हे सर्व टाळण्यासाठी सीपीआय (एम) ने आपल्या कोट्यातील दोन जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. शिवाय फॉरवर्ड ब्लॉकही एक जागा सोडण्यास तयार आहे. मात्र, असे असले तरी जागावाटपाच्या गोंधळावरून सीपीआय आणि फॉरवर्ड ब्लॉक पक्ष नाराज असल्याचे सांगितलं जात आहे. परिणामी उमेदवारांची नावे जाहीर करण्यालाही विलंब होत आहे.
सीपीआयएमने आधीच डाव्या आघाडीच्या कोट्यातील पुरुलिया आणि रायगंज या दोन जागा काँग्रेससाठी सोडल्या आहेत. त्या बदल्यात काँग्रेसने सीपीआयएमसाठी मुर्शिदाबादची जागा सोडली आहे. मात्र, मुर्शिदाबादच्या जागेवर भारतीय सेक्युलर फ्रंटनेही दावा केला आहे, तर पुरुलियाच्या जागेवर डाव्या पक्षातील फॉरवर्ड ब्लॉकने दावा केला आहे.
याशिवाय सेरामपूरच्या जागेसाठी भारतीय सेक्युलर फ्रंट आणि सीपीआय (एम) या दोन्ही पक्षांनी उमेदवार जाहीर केला आहे. तसेच बारासात आणि बसीरहाट या दोन जागांवरही भारतीय सेक्युलर फ्रंटने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. या दोन्ही जागा फॉरवर्ड ब्लॉक आणि सीपीआयएमच्या कोट्यातील आहेत.
हेही वाचा – ३३ वर्षांनंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते लोकसभा निवडणूक लढवणार; गमावलेला गड काँग्रेसला परत मिळणार का?
एकंदरीतच जागावाटपाचा घोळ निस्तारण्यासाठी गेल्या आठवड्यात डाव्या आघाडीतील पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर सीपीआय (एम) च्या नेत्याने माध्यमांशी संवाद साधला. “आयएसएफची स्थापना २०२१ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी झाली होती. त्यामुळे ही त्यांची पहिलीच लोकसभा निवडणूक आहे. सहाजिकच, जर आम्हाला त्यांना जास्त जागा द्यायच्या असतील, तर आम्हाला आमची संख्या कमी करावी लागेल. पण, डाव्या आघाडीतील मित्रपक्षांना ते मान्य नाही”, असे ते म्हणाले.
याशिवाय फॉरवर्ड ब्लॉकच्या एका वरिष्ठ नेत्यानेही शुक्रवारच्या बैठकीनंतर प्रतिक्रिया दिली. “सीपीआय (एम) ची आयएसएफशी युती आहे, मात्र तो पक्ष डाव्या पक्षांच्या आघाडीचा भाग नाही; त्यामुळे आयएसएफसारख्या छोट्या पक्षांसाठी आम्ही आमच्या जागा का सोडाव्या?”, असे ते म्हणाले.