शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीकविम्यावरून (२०२०-२१) सध्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरचे भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील व उस्मानाबादचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार कैलास पाटील यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. या लढाईने आता हिंसक वळण घेतले असून त्यातूनच शुक्रवारी एका निमआराम बसवर दगडफेक करण्यात आल्यानंतर उस्मानाबादमधील राजकारण तापले आहे. 

हेही वाचा- नगरच्या राजकीय आखाड्यात पाणी योजना मंजुरीच्या श्रेयवादाचे शड्डू

पीकविम्याच्या लढाईचा मुद्दा न्यायालयीन पातळीवरून सुरू झाला. राज्यात तेव्हा महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात हाेते. २०२०-२१ मध्ये उस्मानाबादमधील ३ लाख ५७ हजार शेतकऱ्यांनी पीकविम्यापाेटी ५१० काेटी रुपये बजाज अलाईन्ज जनरल इन्शुरन्स कंपनीकडे जमा केले हाेते. मात्र, कंपनीने केवळ ३ लाख ५७ हजारपैकी केवळ ५०० ते ६०० शेतकऱ्यांनाच ८५ काेटी रुपये पीकविम्याच्या नुकसान भरपाईपाेटी दिले हाेते. त्या मुद्यावरून आमदार राणा पाटील यांनी प्रशांत लाेमटे व राजेसाहेब पाटील या समर्थकांमार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एक जनहित याचिका दाखल केली. याचिकेवर ६ मे राेजी झालेल्या सुनावणीवेळी खंडपीठाने कंपनीने सहा आठवड्यात साेयाबीनच्या नुकसानीपाेटी उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे आदेश दिले. कंपनीने न दिल्यास राज्य शासनाने भरपाई करावी, असेही आदेशात म्हटले हाेते. पुढे राज्य शासनाने या निर्णयात सुधार करावा, यासाठी पुन्हा खंडपीठात धाव घेतली. तर कंपनीने खंडपीठाच्या निर्णयाला सर्वाेच्च न्यायालयात आव्हान दिले हाेते. दरम्यान, राज्यात सत्तांतर झाले. शिंदे-फडणवीस सरकार  आले. तत्पूर्वी राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीतील सारिपाटाच्या खेळामध्ये फडणवीस यांच्या जवळ वावरताना दिसून आले ते  विधानसभा निवडणुकीच्या ताेंडावर राष्ट्रवादीला साेडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेले राणा जगजितसिंह पाटील.

हेही वाचा- पश्चिम महाराष्ट्रातील नगदी पिकांवर पाणी

आमदार पाटील यांनीच महाविकास आघाडी सरकारला काेंडीत पकडण्यासाठी न्यायालयीन लढाई लढल्याची चर्चा हाेती. त्यात त्यांच्या बाजूने निकाल आला. दरम्यानच्या काळात पुन्हा सत्तांतर झाले. ल्यानंतर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार कैलास पाटील यांनी पीकविम्याचा मुद्दा हाती घेऊन लढाई सुरू केली आहे. मागील सहा दिवसांपासून आमदार पाटील यांनी उपाेषण सुरू केले आहे. त्यातूनच शुक्रवारी रात्री एका एसटीवर दगडफेक करण्यात आल्याने त्यांच्या आंदाेलनाने हिंसक वळण घेतले आहे. उस्मानाबादमध्ये कैलास पाटील व शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची जाेडी चर्चेत असते. आता ही जोडी आणि राणा जगजीत सिंह पाटील आमने-सामने आले आहेत.

Story img Loader